भरकटलेला स्रीवाद

सुचिता खल्लाळ

फेमिनिझमचे काळानुसार बदलत गेलेले स्वरुप आणि त्याचा समाजातील विविध घटकांनी घेतलेला सोयीनुसार फायदा यामुळे मूळ संकल्पना मागे पडली. काळाच्या रेट्यानूसार जसे स्त्रियांचे जीवनमान बदलत गेले तशी ही संकल्पनाही बदलत गेली, त्याविषयी केलेला उहापोह…

“फेमिनिझम’ हा शब्द हल्ली इतका चावून चोथा झालाय की तो वापरणा-यांची किळस यावी. “इझम’ ही गोष्ट आजकाल सोयीस्करपणे फोफावत नेली जातेय. ती जितकी फोफावते तितकी अस्ताव्यस्त होत जाते, रुजणे घडत नाही आणि तण माजावं तसं जमिनीचा सुपीकपणा तेवढा ओरबाडत सत्व शोषून टाकते , मग तो कोणताही इझम असो. उगमापाशी चळवळी जितक्‍या शुद्ध आणि सुस्पष्ट ध्येय असणा-या असतात, नंतरच्या प्रवाहात त्या प्रवाहपतित का होत जातात हा एक गंभीर असा अभ्यासाचा विषय आहे. व्यक्तिगत स्वार्थ, श्रेय लाटण्यासाठीच्या मारामाऱ्या,तत्त्वांशी तडजोडी, संकुचित व प्रांतीय निष्ठा, चमकोगिरीचा सोस, छुपे समांतर अनेकपदरी अजेंडे ही त्यापैकी काही कारणे.
फेमिनिझम त्याला अजिबात अपवाद नाही. हल्ली तथाकथित जाणत्या पुरोगामी बुद्धिवादी बायांनाही आपल्या बोलण्यात फेमिनिझमविषयी एकदोन तरी आवेशपूर्ण वाक्‍ये पेरल्याखेरीज आपण “मॉडर्न’ असल्याचं वाटत नसावं. जेवणातल्या तोंडी लावायच्या लोणच्यासारखं हे एक चटकदार चाटण, बोलण्यात चमचमीतपणाचा भपका आणणारं.
मूळ चळवळीच्या मुख्य धारेपासून तुटून विभक्त होणा-या अनेक उपमुख्य शाखा निर्माण करीत गेलं की नवविचारप्रवाह, उदारमतवाद, प्रयोगशील,बंडखोर, पुरोगामी वगैरे काहीतरी घडते आहे असा मस्त वैचारिक फील येत असावा. मग या अशा खास रोमॅन्टिक फीलसाठी म्हणून कोणत्याही पक्ष,संघटना,चळवळीचे पुढे जाऊन अनेक नवनवीन शाखा, उपशाखा व विचारप्रवाहात विभक्तीकरण होण्याची प्रक्रिया अखंड चालूच असते. या “फील’ च्या भरात आपण नेमके कोठून, कोठे, कशासाठी, का निघालो होतो हे मात्र सोयीस्करपणे विसरण्याची सोय असते. नवा प्रवाह, नवे मुखवटे, नवे रस्ते, नवे झेंडे, नवे तत्त्वज्ञान. चळवळ मुडपली जाते, जुन्या मुडपेवरून आलटूनपालटून नवी घडी घालून दिमाखात खिशात बसवली जाते. मागील पानावरून पुढे चालू…
आपल्याकडे एकतर कितीतरी वर्षे फेमिनिझम म्हणजे काय हे ठावूक नव्हते. स्त्रीला काही स्वतंत्र अस्तित्व,अस्मिता वगैरे वगैरे गोष्टी असतात हे कोणत्याच बाईच्या अथवा बाप्याच्या गावीही नव्हते. मग अशातच पाश्‍चात्यांच्या इतर प्रवाहांच्या प्रभावासोबतच “स्त्रीवाद’ नावाचा गोंडस शब्द आम्हाला ठाऊक झाला. मग आम्ही तितक्‍याच भाबड्या आणि बावळट चेहऱ्याने स्त्रीवाद म्हणजे जगातल्या तमाम पुरुषांना विरोध करणे असे समजून बांगड्या मागे करून आणि पदर खोचून निव्वळ पुरुषांना विरोधासाठी विरोध करण्यात धन्यता मानत राहिलो. नंतर स्त्रीवाद अधिक कडवा होत जाऊन आम्ही “स्ट्रॉंग वूमन’ची नवी परिभाषा मांडली. मग नंतर स्वतःला जरा उदात्त करून घेण्याचा मोठेपणा दाखवत लिंगसमभाव म्हणजे फेमिनिझम असे म्हणालो. पुढे मग सामाजिक स्वायत्तता, शोषणमुक्त समता अशी बिरुदं लावून चळवळीला आणखी नवा मुखवटा चढवला. रॅडिकल फेमिनिझम, लिबरल फेमिनिझम, लोकल फेमिनिझम, मार्क्‍सिस्ट फेमिनिझम अशा वेगवेगळ्या नावाखाली वेगळ्या चुली मांडल्या. चळवळ फोफावली, प्रवाह वाढले, गट वाढले पण बाई जिथल्या तिथंच राहिली.
जेव्हा ती पुरेशा आरोग्यसेवेअभावी प्रसूतीवेदनेने विव्हळत होती तेव्हा आम्ही रॅडिकल विचारसरणीचे झेंडे नाचवत तिच्या पुरुषाला हुडकत बसलो. जेव्हा ती अल्पभूधारक बापाच्या किंवा नव-याच्या शेतावर ढोरासारखं राबत होती तेव्हा आम्ही तिच्या डोमेस्टिक कष्टाची गोळाबेरीज आणि शोषणमूल्य यांचे आकडे जुळवत मार्क्‍सवादी फेमिनिझमची व्याख्या करत राहिलो. पण जेव्हा तीच बाई वस्तुकरणाच्या साजि-या रूपड्यात स्वतःचं विनिमय मूल्य ठरवायला लागली तेव्हा आम्ही तिथे मार्क्‍सिस्ट फेमिनिझम गुंडाळून ठेवत “माय बॉडी माय चॉईस’ म्हणत ‘सेक्‍स पॉझिटिव्ह फेमिनिझम’ चा नवाच सूर आळवला. लगेचच या काठावरून त्या काठावर टूणकन उडी मारत थेट “लैंगिक साम्यवाद’ वगैरेची ही भाषा बोलायला लागलो.
आम्ही भडकता आणि चिघळता ठेवला फेमिनिझम आमच्या भाषणांतून, परिसंवादांतून, षंढ कथाकवितांतून, चटपटीत खुमासदार कादंब-यांच्या कथानकातून. प्रश्न मिटवले नाहीत की सोडवले नाहीत, फक्त हवा देत गेलो. कारण आम्हाला फोफावायचा होता इझम. आमच्या संकुचित अस्मितांचा तोंडवळा देऊन. मग आम्हीच ओरडलोही प्रसंगी सोयीस्करपणे असहिष्णुता, अभिव्यक्तीस्वातंत्र्य, अराजक वगैरे मुद्‌द्‌यांवर, सालाबादप्रमाणे, बरं असतं आपली “पुरोगामी’ वगैरे इमेज मेंटेन करण्यासाठी अधुनमधून असा सूर लावणं जमलं पाहिजे हेही. झटपट ग्लॅमर मिळवण्यासाठी. चटकदार गोष्टीही मोठ्यांच्या नावावर खपवता आल्या की आपणही मोठं होत जातो लवकर लवकर. एकदा का एखाद्या गोष्टीचे विनिमयमूल्य मान्य केले की भांडवलीकरण, बाजारपेठ, अर्थकारण, नफातोटा, व्यापारीकरण, जाहिरातबाजी अशा अनेक गोष्टी आपसूक येणारंच. योनीचे वस्तुकरण, मग संमतीसह का असेना, ही संकल्पनाच तमाम शोषणमुक्त स्त्रीवादी तत्त्वज्ञानाला काळिमा फासणारी आहे. अशा मताचे समर्थन करणाऱ्या तथाकथित फेमिनिस्ट बायांना अथवा कोणालाही “बाई’ या विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकार उरत नाही. शोषण सहन करायचे नाही, हा सूर घेऊन निघालेली ही चळवळ कोठे जाऊन पोचते आहे हा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

लैंगिक साम्यवाद अवतरणे म्हणजे लग्नसंस्था, कुटुंबसंस्था, समाजव्यवस्था यांना तिलांजली देणे. खरंतर ग्रीक राजकीय विचारवंत “प्लेटो’ याने आपल्या “रिपब्लिक’ या ग्रंथात आदर्श राज्य संकल्पनेतंर्गत “कुटुंबाचा साम्यवाद’ ही संकल्पना शतकांपूर्वी मांडली होती, त्यात लैंगिक साम्यवाद अनुस्यूत होता. “रवींद्र रुक्‍मिणी पंढरीनाथ’ यांच्या “खेळघर’ नावाच्या कादंबरीत साम्यवादी विचारसरणीच्या मुद्‌द्‌याला धरून असा एकत्र कुटुंबव्यवस्थेचा प्रयोग कथानकात वर्णिला आहे. पण ती मांडणी जोशीबाईंच्या मांडणीपेक्षा खुपच उदात्त अशा सामाजिक, वैचारिक उंचीवरून केलेली आहे. विषयवस्तू आणि लावून धरलेले तत्त्व यात विरोधाभास जाणवणा-या अनेक जागा सापडतात. कित्येकदा सभोवतीच्या परिसराचे पाल्हाळिक वर्णन नाहक निरसपणे लांबवत नेले आहे. भाषिक अंगाने विवेचन ओघवते व पोत नैसर्गिक वाटत नाही. कथानक अमेरिकेतील आहे असे न वाटणाऱ्या अनेक मर्यादा मांडणीत सुटून गेल्या आहेत. कोणत्यातरी परकीय भाषेतले अनुवादित पुस्तकच आपण वाचतोय असे राहून राहून वाटण्याइतपत जिवंतपणा नसलेली व कृत्रिम वाक्‍यरचना आली आहे.

आजकाल काहीतरी भडक आणि उत्ताण लिहून आपण समाजप्रवर्तक बोल्ड लेखिका आहोत असे भासवण्याची टूम निघाली आहे, वाचकही असे आंबटशौकीन लेखन मिटक्‍या मारत वाचणे पसंत करतात. लिहायचे ते लिहावे बापुडे लिहिणा-यांनी नाहीतरी अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली उलट्या मनगटावर तेल लावून दर नव्या दिवशी होणारा शिमगा नवा नाहीच आपल्याला ; पण रा.धों सारख्या विभूतींचे नाव घेऊन “महाराष्ट्र फाऊंडेशन’ लाटताना मनोगतात (आणि मलपृष्ठावरही) आपण समाजप्रबोधन वगैरे करून बायांना आत्मनिर्भरतेचा प्रवास दिशांकित करतो आहोत, असा आविर्भाव मात्र आणू नये. फारफारतर लैंगिक शिक्षणाचा व प्रयोगांचा प्रसार करणारे आणि कोणा अमेरिकेतील चित्रकाराच्या जीवनाशी साधर्म्य असणारे पुस्तक म्हणून हे ठीक आहे. पण असल्या चुकीच्या फेमिनिझमच्या नावाखाली वैचारिक विकृती मात्र प्रसृत करू नये. पण फेमिनिझमचा डंका वाजवणा-या अशा तोतया फेमिनिस्टांना वेळीच आवर घातला नाही तर समाजस्वास्थ्य नक्कीच कोलमडेल, तसे ते आधीच कोलमडलेलेही आहे.
“वूमन इज मोअर दॅन व्हजायना युटेरस’ , या वाक्‍याच्या फुलस्टॉपनंतरच्या दुसऱ्या वाक्‍यापासुन खरा फेमिनिझम सुरू होतो, तो तसा व्हावा,व्हायलाच हवा. पण बाईला पुन्हा पुन्हा गर्भाशयापुरतंच सीमित करून बाईच्या आत्मनिर्भरतेचे झेंडे नाचवणाऱ्या या तोतया फेमिनिस्टांना काय म्हणावं, हा ही प्रश्नच. आणि आपण त्यांना पुरस्कारांनी , लोकप्रियतेच्या मानांकनांनी प्रमाणित करतोय हे तर आणखीच विषण्ण करणारं . अशा धारणांचं, अशा नेतृत्वांचं, अशा चळवळींचं वेळीच पूनर्मूल्यांकन झालं नाही तर वाटा भरकटत जातील आणि प्रश्न जिथल्या तिथंच तुंबून राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)