भय इथले संपायचे तर… (भाग- १)

खेळांमध्ये अथवा अन्य क्षेत्रांमध्ये तरुणींनी-महिलांनी धवल कामगिरी केल्यानंतर स्रीशक्‍तीचा गौरव केला जात असला तरी आजही समाजात स्री असुरक्षितच आहे हे वास्तव नाकारता येणार नाही. अलीकडील काळात घडलेल्या घटना पाहिल्यास सार्वजनिक ठिकाणीच नव्हे तर घरामध्येही महिला सुरक्षित नाहीत याची प्रचिती येते. याच्या मुळाशी पुरुषप्रधान मानसिकता
आहेच; पण त्याचबरोबर कायद्यांची योग्य अंमलबजावणी न झाल्यामुळे त्यांचा कमी होत चाललेला धाक हेदेखील कारण आहे. त्यामुळे ही परिस्थिती बदलण्यासाठी एकच उपाय न योजता सर्वंकष उपाययोजना करायला हवी.

सध्या समाजात स्त्रीशक्‍तीचा गौरव किंवा उदोउदो मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. याकडे पाहिल्यास समाजातील स्त्रियांची स्थिती बदलली असल्याचे, तिचे जगणे सुखकर आणि सुरक्षित झाल्याचे चित्र डोळ्यासमोर येऊ शकते. मात्र, भोवताली घडणाऱ्या घटना पाहिल्या की भ्रमनिरास झाल्याशिवाय राहात नाही. ग्रामीण भागातील कौटुंबिक अत्याचाराच्या, बलात्काराच्या, विनयभंगाच्या घटना आजही कमी होण्याचे नाव घेत नाहीयेत, हे एनसीआरबीच्या आकडेवारीमधून दिसून येतच असते. मात्र, महानगरेही महिलांसाठी सुरक्षित राहिलेली नाहीत हे ताज्या काही घटनांमधून दिसून येते.

काही दिवसांपूर्वी मुंबईतील लोकलमध्ये एका महिलेला मारहाण करून तिचा विनयभंग करण्यात आला. दुसरीकडे नालासोपाऱ्यातील एका अल्पवयीन मुलीने अब्रू वाचवण्यासाठी चौथ्या मजल्यावरून उडी मारली. असाच प्रकार पिंपरी-चिंचवडमधील रहाटणे फाटा येथे घडला. याच दरम्यान एका कॅबचालकाने तरुणीसोबत अश्‍लील कृत्य केल्याचा प्रकार घडला. दुसरीकडे पुण्यातीलच एका कंपनीत वरिष्ठांनी महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली.

या घटनांचा लसावि काढल्यास सार्वजनिक ठिकाणीच नव्हे तर घरातही स्त्रिया सुरक्षित नसल्याचे दिसते. एकीकडे स्त्री कुठेही कमी नाही, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कर्तृत्व गाजवते असे दिसत असताना या घटना घडतात याचे मूळ पुरुषप्रधान संस्कृतीत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण तांत्रिकदृष्ट्या आधुनिक होत चाललो असलो, राहणीमान-जीवनशैली उंचावली असली तरी वैचारिक पातळी किंवा मानसिकता याबाबत आपण
अजूनही मागासच आहोत. तिथे मात्र आधुनिकता दिसत नाही

अॅड. रमा सरोदे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)