भयांकित मौन…(प्रभात ब्लॉग)

आपली प्रश्न विचारण्याची क्षमता संपणं घातक असतं, आणि त्याहून घातक असतं चकार शब्दही न उमटू देता मौन राहणं. आणखी एक असहाय आरोळी एका कोवळ्या कळीची, भयकंप करणारी. निषेधाची नुसती व्हर्चुअल प्रतिक्रिया नोंदवून काहीच फरक न पडण्याच्या या काळात कवी आणि परमेश्वर खरोखरंच जिवंत आहेत का याची खातरजमा करण्याची वेळ आली आहे. खुप काही नासून-नासवून झाल्यानंतर येणारा पुढचा ध्वस्त काळ हे मुळीच विचारणार नाही की तेव्हाच्या या वासनांधांना फाशी दिली होती की जन्मठेप. जी कुस्करली गेली ती हिंदू होती की मुस्लीम ; पण येता काळ हे मात्र नक्कीच विचारेल की बगीचा एवढा नासधूस झाला, तेव्हा हे सारं होताना त्या काळातले कवी काय करत होते ???…

असिफासाठी…

कशी निचेश्ट निजली आहेस या बेवारस पाचोळ्यावर

ऐक ना,
यानंतर मी तुला कदापि सांगणार नाही
महिलासक्षमीकरण स्त्रीमुक्ती वगैरेच्या पांचट गोष्टी
आई म्हणून किंवा बाई म्हणूनही…

चंद्रावरच्या आणि मंगळावरच्या झेंड्याखालीही मोठ्यानं वाच्यता करता येणार नाहीत
अशा काही गोष्टी याक्षणी
जिभाळी लागल्यासारख्या किती तीव्र दाबानं वाहतायंत
माझ्या गच्च दाबल्या ओठांआत हे कसं सांगू मी
तुझ्या थंडगार लाकूड झालेल्या छिन्नविछिन्न देहाला ?
शरीरशास्त्रही न कळण्याच्या वयात मीतरी तुला काय सांगणार होते वाटा बहकवणार्या रानचकव्यांपासून सावधपणाच्या गोष्टी ?

लांडग्याची फितरत असण्याच्या या मौसमात
नाही नोंदवता येत बये
ओलीकच्ची सुगी वरपून नेल्याच्या फिर्यादी
पंचायतीत अथवा हॅशटॅगच्या आभासी भिंतीवर अथवा निषेधाचा काळा डीपी लावून
व्हर्चुअल नौटंकीने किंवा मेणबत्त्यांचे माॅडर्न मोर्चे काढून नसतात शमत लेकीबाळींच्या तळव्यांखालचे लालइंगळ विस्तव
हरेक योनी ‘मी टू’ ची फिर्यादी असल्यावर
षडविकाराच्या या तुडूंब अवकाशात न्यायाचा तराजू पेलणारं मनगट आणि नियत शोधायची तरी कुठं ?

तुझ्या हरेक किंकाळीवर उमटला होता सत्याचा अपलाप
जो होता तुझ्याइतकाच असहाय आणि न्यूड
सांग ना,
तुझं कल्पांतांचं रडं ऐकून कसा कळवळला नाही परमेश्वर ?
मंदिराच्या ओणव्या अधाशी गाभार्यानं कसे टिपले
लाईव्ह अश्लील भोगवटे एकदा दोनदा तीनदा पुन्हा पुन्हा…
या गोष्टीला आता खरंच काय अर्थ उरतो
की ते मंदिर
घुमटाकार मशीद होतं की शुभ्र फ्राॅक ल्यालेल्या मदर मेरीचं चर्च होतं की करकटेवरल्या विठ्ठलाचं देऊळ ?
पण जर तू म्हणालीस की त्याक्षणी मला थुंकावंसं वाटलं होतं गाभार्यातल्या कथित परमेश्वरावर
तर मात्र तुझ्या या इच्छेला नक्कीच अर्थ असेल
तू जरूर थुंकावंसं
गप्प राहणार्‍या परमेश्वरावर आणि नुसत्याच शब्दाळ कविता लिहिणार्या कवीवर
आणि कविता न कळू शकलेल्या कोणत्याही असंवेदनशील व्यक्तीवर…
तू करावीस निर्भत्सना बलात्कार्यांइतकीच बघे असणार्‍यांचीही
आणि
जगातल्या सगळ्या तळपत्या योनी एकवटून
द्यावेस
सतीचे मंत्रभारित कडाडते शाप,
की भविष्यातला हरेक परमेश्वर,कवी षंढ निपजेल !…

सुचिता खल्लाळ, नांदेड

लेखिका या नामांकित शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून त्या लेखिका आणि कवयित्री आहेत. 
(डिसक्लेमर –  सदर लेखात व्यक्त करण्यात आलेली मते ही लेखिकेची वैयक्तिक मते असून त्याच्याशी दैनिक प्रभातचे व्यवस्थापन सहमत असेलच असे नाही. )


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)