भयंकर दुःख सहन करणारा! (गुड फ्रायडे विशेष)

“आपल्या शेजाऱ्यावर प्रिती कर, आपल्या वैऱ्यांवरतीही प्रिती कर, अशी कायम प्रितीची शिकवण देणाऱ्या, प्रेमाचा संदेश देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताला त्या काळच्या ढोंगी धर्मसत्ता व जुलमी राजसत्तेच्या क्रोधाला व छळवणुकीला तोंड द्यावे लागून वधस्तंभावरचे मरण पत्करावे लागले. कारण प्रभू येशू ख्रिस्ताची सहिष्णुतेची शिकवण व क्रांतिकारी विचार त्यांच्या पचनी पडले नाहीत व आपली सत्ता तर या क्रांतिकारी विचारांनी उलथली जाणार नाही ना, या भयगंडाने निष्कलंक असणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताला गुन्हेगार ठरवून त्यांनी वधस्तंभावरील मरणाची शिक्षा दिली.

रेव्ह. आशाकांत रामटेके म्हणतात, “ज्या वाटेने येशू ख्रिस्ताला कॅलवरीच्या डोंगरापर्यंत म्हणजेच कवटी म्हटलेल्या जागेपर्यंत वधस्तंभावर खिळण्याकरता घेऊन गेले त्याला लॅटीनमध्ये “व्हाया डोलोरोसा’ असे म्हणतात. त्याचा अर्थ “भयंकर दुःख सहन करणाऱ्याची वाट’ असा होतो. प्रत्यक्षात प्रभू येशूला वधस्तंभावर इतके भयंकर दुःख सहन करायला लावले की दुःखाची जणू व्याख्याच बदलावी. तरीही प्रभू येशू आपल्या मारेकऱ्यांसाठी परमेश्‍वराकडे “हे बापा त्यांना क्षमा कर कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही’ अशी क्षमायाचना करतो. प्रभू येशूच्या या दुःख सहनाबद्दल यापूर्वीच पुढीलप्रमाणे भविष्य वर्तविण्यात आले होते.

“त्याचे हालहाल केले तरी ते त्याने सोसले, आपले तोंडसुद्धा उघडले नाही, वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला, त्याने आपले तोंड उघडले नाही. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्‍लेश त्याने वाहिले, तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले.’ प्रभू येशूला वधस्तंभावर खिळल्यानंतर सर्वत्र अंधार पडला. मंदिरातील पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला, भूमी कापली, खडक फुटले. जणू निसर्गालाही दयेचा पाझर फुटून “त्यांनी या अत्याचाराबद्दल आपला निषेध नोंदवला.’

आजही जगात पापाने अंधारलेली परिस्थिती आहे. अतिशय क्षुल्लक कारणास्तव माणूस माणसाचे मुडदे पाडतो आहे. वयाचे भान न राखता अत्याचार होत आहेत. ऐहिक जीवनातील दुष्कृत्यांनी, मोह लालसेने आमची हृदये पाषाणमय झाली आहेत. वैर, मत्सर, राग, कामातूरपणा, रंगेलपणा या आमच्या देह वासनेने चोहोकडे अंधारून आले आहे. मिशनरीवृत्ती, सेवाभावी वृत्ती, प्रेमळवृत्ती थंडावत चालली आहे. नाना प्रकारच्या विलासांचे व वासनांचे दास्य पत्करून आमची अंतःकरणे अस्वच्छ व पातकांनी बरबटलेलीआहेत. माणूस अस्वस्थ व भयभीत झाला आहे. हा सर्व जुना जीवितक्रम आम्ही सोडून देऊन करुणायुक्‍त हृदय, ममता, सौम्यता, क्षमाशीलता ही धारण करून नवा जीवितक्रम अंगिकारला पाहिजे.

प्रभू येशू म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. येशूला अनुसरणे म्हणजे पापाचा कायमचाच त्याग करून, पश्‍चाताप करून प्रभू येशूचा स्वीकार करणे. देहाची दुष्कर्मे टाकून देऊन प्रिती, आनंद, सहनशीलता, चांगुलपणा, विश्‍वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन ही आत्म्याची फळे धारण केली पाहिजेत. विचारवंत म्हणतात “आज एकविसाव्या शतकात थंडावलेली प्रिती दहशतवादी कृत्यांना जन्म देत आहे. जीवनाच्या वस्त्राला अश्रू-आक्रोश-उसासे यांची काळी किनार लागली आहे. अशा वेळेस येशू ख्रिस्तांचा शांततावादी, करुणावादी ध्येयवाद जगाला तिसऱ्या महायुद्धापासून वाचवणारा आहे. येशू ख्रिस्ताच्या समर्पित आयुष्याने संपूर्ण मानवी जगत प्रभावित आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
2 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)