भटक्‍या श्वान नियंत्रणासाठी कायदा बदल

नगरसेविका मंजुषा नागपुरे यांची मागणी

पुणे- शहरात भटक्‍या कुत्र्यांचा प्रश्‍न दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत असून, त्यामुळे परिस्थिती गंभीर होत आहे. याबाबत राज्यसरकारकडे पाठपुरावा करूनही तोडगा निघत नसल्याने, प्राणी कायद्यातच बदल करण्याची मागणी नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी केली आहे. तसे पत्रही नागपुरे यांनी केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री मनेका गांधी यांना पाठविले आहे.

भटक्‍या कुत्र्यांणी केलेल्या हल्ल्यात अनेक लहान मुलांसह नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. इतर शहरांप्रमाणे पुण्यातही भटक्‍या कुत्र्यांची समस्या वाढत असून, दररोज शहरातील 30 ते 35 नागरिकांना कुत्री चावण्याचे प्रकार घडत आहेत. शहरात सुमारे पाऊण ते एक लाखांच्या घरात भटकी कुत्री आहेत. गेल्या आठवड्यात पिंपरी-चिंचवड येथील पाच वर्षांच्या साहिल अन्सारी या पाच वर्षांच्या बालकाचा कुत्र्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. महापालिकेच्या मुख्यसभेतही भटक्‍या कुत्र्यांच्या समस्येवर चर्चा झाली. मात्र त्यातून तोडगा काहीच निघाला नाही. या पार्श्वभूमीवर नागपुरे यांनी केंद्रीय मंत्री गांधी यांना पत्र पाठवले आहे.

गेल्या वर्षी शहरात भटक्‍या कुत्र्यांची संख्या 40 हजार होती, असे महापालिका प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीत दिसून येते. मात्र प्रत्यक्षात ही संख्या लाखांच्या घरात आहे. महिन्याला शहरातील सुमारे 900 नागरिकांचा कुत्री चावा घेतात. शहराचा वाढत असलेला विस्तार आणि जागोजागी टाकण्यात येणारा कचरा यामुळे भटक्‍या कुत्र्यांची समस्या निर्माण झाली आहे. अशा भटक्‍या कुत्र्यांनी चावा घेतल्याने रेबीजचे पेशंटही वाढत आहेत. शहरातील अनेक कंपन्यांमध्ये रात्रपाळी असते.

काम संपवून घरी येणाऱ्या या कर्मचाऱ्यांवरही भटक्‍या कुत्र्यांनी हल्ला केल्याची प्रकरणे वाढत आहेत. केंद्रीय पातळीवरून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची आवश्‍यकता आहे. शहरातील महिला, लहान मुले यांच्याबरोबरच ज्येष्ठ नागरिक यांनाही भटक्‍या कुत्र्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सूचना द्याव्यात, अशी मागणी नागपुरे यांनी गांधी यांच्याकडे केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)