भटक्‍या कुत्र्यांवरुन सभागृहात राडा

 

पिंपरी – शहरातील भटकी कुत्री व डुकरांच्या उपद्रवाची चर्चा महासभेत सुरु असतानाच विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि भाजप नगरसेविका सीमा सावळे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. हा वाद चिघळला असतानाच सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनीही राष्ट्रवादीवर तोंडसुख घेतल्याने संतापलेल्या राष्ट्रवादीच्या सदस्यांनी महापौर व्यासपीठाकडे धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच, महापौर राहुल जाधव यांनी समयसुचकता दाखवत गेल्या महिनाभरात मृत पावलेल्या व्यक्तिंना श्रद्धांजलीचा प्रस्ताव ऐनवेळी मांडत सभा तहकूब केली. या प्रश्‍नावरून प्रशासनाला कोंडीत पकडण्याऐवजी राष्ट्रवादी-भाजपचे नगरसेवक आपआपसात भिडल्याचे यानिमित्ताने पहायला मिळाले.

-Ads-

पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी (दि. 19) आयोजित करण्यात आली होती. शहरातील “स्वाईन फ्ल्यू’चे बाधित व मृृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी सभागृहात सोडण्यासाठी एका पिशवीत कुत्र्यांची लहान पिले आणली होती. मात्र, ही बाब महापौर राहुल जाधव आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या लक्षात येताच, असा प्रकार न करण्याची विनंती केली. या विनंतीला मान देत, त्यांनी ही पिले कार्यकर्त्यामार्फत परत पाठविली. या घटनेमुळे सुरक्षा रक्षकांची एकच धावपळ उडाली. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्‍वास टाकला व सर्वसाधारण सभेला सुरुवात दुपारी दोन वाजता झाली.

साने यांच्या वर्तनावर भाजप नगरसेवकांनी यांनी तीव्र आक्षेप नोंदविला. आम्ही देखील आंदोलने केली. मात्र, त्याकरिता कोणत्याही मुक्‍या जनावराला वेठीस धरले नाही. हा राष्ट्रवादीचा प्रसिद्धीचा “स्टंट’ असल्याची टीका केली. हा प्रकार दुर्देवी आहे. राष्ट्रवादीने सभागृहाचे पावित्र्य राखावे. यामध्ये प्रशासनाची चूक असेल, तर अधिकाऱ्यांना जाब विचारा; मात्र त्याचा त्रास मुक्‍या जनावरांना का? असा सवाल उपस्थित केला. तर सीमा सावळे यांनी साने यांच्यावर पेटा कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली.
यावर राष्ट्रवादीच्या विनया तापकीर यांनी आमच्या प्रश्‍नांना वाचा फुटत नसल्यानेच अशा प्रकारचे आंदोलन करण्याची वेळ आल्याची बाजू मांडत प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध केला. भाजपचेच संदीप वाघेरे यांनी देखील प्रशासनाच्या बोटचेप्या भूमिकेवर सडकून टीका केली.

दरम्यान, विरोधी पक्षनेते दत्ता साने या विषयावर बोलत असताना सीमा सावळे यांनी मध्येच बोलत त्यांना अडथळा निर्माण केला. त्यावर चिडून सावळे यांना रोखा अशी मागणी साने यांनी महापौर राहुल जाधव यांच्याकडे केली. मात्र, सभागृहातील दोघांमधील शाब्दिक बाचाबाची वाढल्याने वाद विकोपाला गेला. शेवटी सभागृह नेते एकनाथ पवार यांना बोलण्याची संधी दिली. मात्र, त्यांनी देखील “सत्ता गेल्यावर राष्ट्रवादीने एवढे व्यथीत व्हावे’ असा टोला लगावला. गेली आठ-दहा दिवसांपासून राष्ट्रवादी प्रत्येक गोष्टीत राजकारण करत असल्याचे एकनाथ पवार यांनी राष्ट्रवादीवर तोंडसुख घेतले. यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौर व्यासपीठाकडे धाव घेतली. मात्र, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच, महापौर जाधव यांनी महिनाभरातील मृत व्यक्तिंना श्रद्धांजली वाहण्याचा प्रस्ताव मांडत, सभा दहा मिनिटांकरिता तहकूब केली. दहा मिनिटानंतर सभा सुरु झाल्यानंतर ही सभा 27 सप्टेंबर दुपारी दोन वाजेपर्यंत पुन्हा सभा तहकूब करण्यात आली.

डॉ. रॉय-साळवे जोडगळीला पुरस्कार द्या!
शहरात “स्वाईन फ्ल्यू’ने थैमान घातले असताना आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय आणि अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांना मात्र त्याचे काही देणे-घेणे नाही. या जोडगळीमुळेच “स्वाईन फ्ल्यू’चे रुग्ण दगावत आहेत. महापालिका आयुक्तांनी आदेश देऊनही हे अधिकारी त्याचे पालन करत नाहीत, असा आरोप करत त्यांच्या या कार्यक्षमतेबद्दल त्यांना महापालिकेने निष्क्रीयतेचा पुरस्कार द्यावा, अशी मागणी भाजपचे संदीप वाघेरे यांनी केली. तसेच पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे हे नावाप्रमाणेच “दगड’ असल्याची टीका त्यांनी केली.

प्रशासनावरही गुन्हा दाखल करा – कलाटे
सभागृहात कुत्र्याच्या पिलांवरुन वाद निर्माण झाला. त्यामुळे दत्ता साने यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी नक्कीच गुन्हा दाखल करा; मात्र गुन्हा दाखल करुन कोणाताही प्रश्‍न सुटणार नाही. मात्र, या परिस्थितीला कारणीभूत असणाऱ्या प्रशासनावर देखील गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)