भगवान महावीरांचे प्रेरणादायी विचार

भगवान महावीरांच्या विचारांची आजही सर्व विश्‍वाला गरज आहे. त्यांचे प्रेरणादायी विचार आजच्या काळातही उपयोगी आहेत. भगवान महावीर यांच्या प्रेरणादायी विचारांची ओळख…

भगवान महावीर हे प्रेम आणि करुणा यांचे अवतार होते. जगातील सर्व प्राण्यांशी त्यांची मैत्री होती. त्यांनीच सर्वांत प्रथम गुलाम प्रथेचा विरोध केला. त्या काळात स्त्रीला स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा दिली. मानवाचे स्वातंत्र्य व मुक्‍ती हेच त्यांचे अंतिम ध्येय होते. भगवान महावीर जातीयवादाचे कट्टर विरोधक होते. ते म्हणत की, जन्माने कोणी महान होत नाही, तर आपल्या कर्माने व गुणांनी मनुष्य महान होतो. कर्मानेच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्‍य किंवा शूद्र बनतो.

त्या काळात स्त्रीला कोणताही अधिकार नव्हता. ही स्थिती बदलण्यासाठी महावीरांनी स्त्रियांना आपल्या संघामध्ये स्थान देऊन तिला प्रतिष्ठा, स्थान आणि स्वातंत्र्य दिले. जर पुरुष शास्त्र ऐकू शकतो, मोक्षास जाऊ शकतो तर स्त्री का जाऊ शकत नाही? तिच्यामध्येही पुरुषासारखा आत्मा आहे, प्राण आहे. स्त्री-पुरुषभेद हे मुक्‍तीमध्ये कदापि बाधक नाहीत.

भगवान महावीरांची शिकवण आजच्या अखिल जगातल्या हिंसात्मक घटना, अनीती, भ्रष्टाचार यांचा मुळासकट नायनाट करण्यासाठी उपयोगी पडते. ते अहिंसेचे पुजारी होते. पशूंची हत्या करण्यात एकेंद्रिय जीवन असणाऱ्या झाडे तोडण्यास मानवाचा शुद्ध रानटीपणा जबाबदार आहे. पर्यावरणावर भगवान महावीरांनी खूप लक्ष दिले. त्यांची आत्मानुभूती संवेदना इतकी व्यापक आणि सर्वस्पर्शी होती. त्यांनी पाहिले वनस्पतीमध्ये, पाण्यामध्येदेखील जीव आहेत.
सूक्ष्म जीव विज्ञानावर भगवान महावीरांचे स्वत:चे एक वैशिष्ट्यपूर्ण तत्त्वज्ञान आहे. भगवान महावीरांनी सृष्टीचे संतुलन बिघडू नये, मानवजातीने सुरक्षित, सुखी राहावे यासाठी झाडे तोडण्यास मनाई केली. ते म्हणत वृक्ष, वनस्पती हे सृष्टीचे सौंदर्य आहे. त्याच्याविना पृथ्वी एकाकी आणि उदास होईल.

व्यक्‍तिस्वातंत्र्याच्या कल्पनेचे हे बीज भगवान महावीरांनी केव्हाच ओळखले व मनामनातून रोवले. इतरांना जगण्याचा अधिकार आहे, हे केवढे महान तत्त्व! यामध्ये फार व्यापक अर्थ आहे जो शब्दांमध्ये बांधता येणार नाही. प्रत्येक आत्मा पूर्ण स्वतंत्र आहे. तो कोणाच्या अधीन नाही. पुरुषार्थाने आत्मा हा परमात्मा होतो. येथे अंधश्रद्धेला वाव नाही. आपणच आपले भाग्यविधाते! सुख-दु:ख कोणी देत नाही, कोणी घेत नाही. सदाचरणाने, त्यागाने, दानाने, इतरांना सुख देण्याने, माणुसकीने सुख मिळते तोच खरा धर्म. अशा एक ना अनेक विचारधारांचा उगम भगवान महावीरांच्या उपदेशात आहे. ज्याचा महासागर झाला आहे. यातून मानवजातीने भरभरून घ्यावयास हवे. ही काळाची गरज आहे. भगवान महावीरांचा उपदेश व त्यांची आजच्या काळातील उपयुक्‍तता या चर्चेचे सार मानव समाजाने अंत:करणात बिंबविले, रुजविले, फुलविले पाहिजे.

विश्‍वात्मक एकात्मतेसाठी निरातिशय, निर्भयतेसाठी आणि शांततामय सहजीवन जगण्यासाठी “जगा आणि जगू द्या’ असा दिव्य संदेश अखिल मानव जातीला विचारशुद्धतेने, आचारशुद्धतेने अधिकारवाणीने सर्वप्रथम देणारे भगवान महावीर हे या जगाच्या पाठीवरचे पहिले महामानव होत. अशा महान तीर्थंकर विभूती भगवान महावीरांना कोटी कोटी प्रणाम!

-प्रा. दीपक कांबळे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)