भंडारा डोंगरावर पशू-पक्ष्यांसाठी पाणवठा

संत तुकाराम ज्ञानपीठ आणि ज्ञानोबा कराळे ग्रंथालयातर्फे सोय

तळेगाव-दाभाडे – सध्या सूर्य आग ओकत आहे. रणरणत्या उन्हात पाणी ही सर्वांत मोठी गरज आहे. मनुष्य कोणत्या ना कोणत्या प्रकारे पाण्याची व्यवस्था करत असतो; परंतु पशू-पक्ष्यांची वणवण मात्र वाढते. भंडारा डोंगराचा परिसर देखील उन्हाने रखरखीत झाला आहे. येथील पशू-पक्ष्यांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.

वन्य पशू-पक्ष्यांना डोंगरावरच पाणी मिळावे, यासाठी संत तुकाराम ज्ञानपीठ आणि ज्ञानोबा कराळे पा. ग्रंथालय तर्फे श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर पाणवठा करण्यात आला आहे. भंडारा डोंगर आणि आसपासचा परिसर पूर्वी झाडे-झुडपे आणि वनाने वेढला होता. किती जरी कडक उन्हाळा असला तरी पशू-पक्ष्यांना खाद्य आणि पाणी मिळत होते. परंतु मनुष्याच्या महत्त्वाकांक्षी हस्तक्षेपाने झाडे कमी झाली.

पाण्याचे लहान-लहान स्रोत मिटले. सगळीकडेच पर्यावरणाची क्षती झाल्याने तापमानही दिवसें-दिवस वाढू लागले. यामुळे परिसरात आता पाण्याचे दुर्भिक्ष आहे. भंडारा डोंगर आणि परिसरात मोर, ससे, माकड, चिमण्या, पशू, पक्षी, साप हे वन्यजीव आहेत. उन्हाळ्यामध्ये त्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. वन्य जीवांची मोठी हाल-अपेष्टा होते. प्रसंगी त्यांना प्राणासही मुकावे लागते.

भूतदया गायी पशूंचे पालन।
तान्हेल्या जीवन वनामाजी।।
भंडारा डोंगर म्हणजे जगद्‌गुरूर श्री संत तुकोबारायांच्या अखंड हरिनामाने वंदनीय झालेले तीर्थस्थानच होय. याच डोंगरावर तुकोबारायांनी अभंगवाणीतून उपदेश केला की, भूतदया गायी पशूंचे पालन। तान्हेल्या जीवन वनामाजी।।
म्हणजेच जे जंगलामध्ये पाण्यावाचून तहानलेले आहेत, त्यांना पाणी पाजणे हा धर्म आहे. त्याच उपदेशानुसार संत तुकाराम ज्ञानपीठ आणि ज्ञानोबा कराळे पा. ग्रंथालयाने पाणवठा केला. त्यासाठी भंडारा डोंगरचे विश्वस्त रामभाऊ कराळे-पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष अजय महाराज बारस्कर, प्राचार्य विठ्ठलराव गुंड, मिटकरी, पोपट चव्हाण, ठाकूर, सुधीर कराळे, अनिकेत अवचर आणि डोंगरावरील वारकरी यांनी श्रमदान केले.

प्रत्येकाने घराजवळ पाखरांसाठी पाणी व अन्नधान्य ठेवावे, तसेच जवळपासच्या जंगलांमध्ये अशा प्रकारचे पाणवठे करावेत, असे आवाहन भंडारा डोंगर ट्रस्टचे विश्वस्त रामभाऊ कराळे-पाटील आणि संत तुकाराम ज्ञानपीठने केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)