भंडारदरा पाणलोटातील रतनवाडीला 16 इंच पाऊस

संग्रहित छायाचित्र

पिंपळगाव खांड धरण “ओव्हरफ्लो’च्या मार्गावर

अकोले – तालुक्‍याच्या पश्‍चिम भागाला आर्द्रा नक्षत्राच्या पावसाने सोमवारी रात्री व मंगळवारी झोडपून काढले. भंडारदरा धरणाच्या पाणलोटात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. रतनवाडी येथे 24 तासांत तब्बल 16 इंच (400 मिलीमीटर) पावसाची नोंद झाली. हरिश्‍चंद्रगडाच्या पायथ्याला मुसळधार वृष्टी होत आहे. त्याने मुळा नदीच्या प्रवाहात वाढ झाली आहे. याचा परिणाम पिंपळगाव खांड धरण “ओव्हरफ्लो’च्या मार्गावर आहे.
तालुक्‍यात सोमवारी रात्री व मंगळवारी जोरदार पाऊस झाला. यामुळे पश्‍चिम भागातील स्थिती मात्र जनजीवन विस्कळीत करणारी राहिली. या भागात पावसाबरोबरच थंडगार वारे वाहण्याने जनावरे व सामान्य जनजीवन गारठून गेले होते. भंडारदरा धरणाच्या पाणलोटात मोडणाऱ्या पांजरे, रतनवाडी गावांमध्ये पावसाची सोमवारी रात्री आणि आज दिवसभर जोरदार वृष्टी होत राहिली. परिणामी, आज या धरणात नवीन 221 दलघफू पाण्याची आवक झाली. मात्र, मुळा, निळवंडे व आढळा या प्रमुख धरणांत नवीन पाण्याची आवक झाली नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुळा धरणाच्या पाणलोटात जोरदार वृष्टी होत आहे. त्यामुळे मुळा नदी दुथडी वाहू लागली आहे. त्याचा परिणाम पिंपळगाव खांड या धरणात सुमारे 500 ते 525 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली आहे. आज या धरणाला सहायक अभियंता रामनाथ आरोटे, कनिष्ठ अभियंता नानासाहेब खर्डे यांनी भेट दिली. शिवाय, या धरणाच्या पाणलोटातील असणारे घोटी-शिळवंडी, कोथळे, देवहंडी ही छोटी धरणे रात्रीतून “ओव्हरफ्लो’ होतील, असा प्राथमिक अंदाज सहायक अभियंता आरोटे यांनी व्यक्‍त केला.

15 जुलैपर्यंतच धरणे भरण्याची शक्‍यता…
अकोले तालुक्‍यात मॉन्सून सक्रिय झाला आहे. अशीच स्थिती राहिली तर सर्वच धरणे 15 जुलैपर्यंत पूर्ण क्षमतेने भरतील, असा प्राथमिक अंदाज आहे. आर्द्राच्या पहिल्याच चरणात कोतूळ येथील पूल पाण्याखाली गेल्याने कोतूळला जाणारी सर्व वाहतूक आता पांगरी, धामणगाव पाट मार्गे वळविण्यात आली आहे. हा पूल पाण्याखाली गेल्याने आणि हे पाणी किमान सहा महिने तरी पुलावर राहणार असल्याने या भागातील जनतेला होडीचा प्रवास आणि तोही जीवघेणा करावा लागणार आहे.

धरण पाणीसाठा, 24 तासातील पाऊस नोंद
भंडारदरा धरणात 2 हजार 989, निळवंडेत 655, मुळा धरणात 4 हजार 749 दलघफू पाणीसाठे शिलकी आहेत. आढळा धरणात नवीन पाणी जमा होत नसल्याने या धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. या धरणात आज सकाळी 174 दलघफू पाणीसाठा शिलकी होता. 24 तासातील पाऊस नोंद पुढीलप्रमाणे : मिलीमीटरमध्ये – भंडारदरा -187, वाकी-135, पांजरे-221, रतनवाडी-400, घाटघर -105, निळवंडे -59, अकोले 87, कोतूळ -23.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)