भंडारदरातून पाणीही सोडू न देण्याचा आदिवासी नेत्यांचा इशारा

जिल्हाधिकारी, जलसंपदाच्या कार्यकारी अभियंत्यास दिले निवेदन

अकोले: आगामी काळात भंडारदरा धरणातून पाणी सोडू देणार नाही. तसे करण्यास जे भाग पाडतील, त्यांचा आदिवासी शेतकरी जरूर बंदोबस्त करतील. आदिवासी विभागातील भंडारदरा धरणग्रस्त पाणलोट कृती समितीच्या आदिवासी नेत्यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व जल संपदाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांना भेटून निवेदनाद्वारे हा इशारा देण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भंडारदरा धरणातून मोठ्या प्रमाणातून जायकवाडीसाठी पाणी सोडले. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हिवाळ्यातच दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. उपसा सिंचन योजना बंद पडल्या आहेत. परिणामी पिके जळून गेली असून, पिण्याच्या पाण्यासाठी आता टॅंकरची गरज लागणार आहे. अशा स्थितीत लाभक्षेत्रातील लोक आमदार वैभव पिचड यांचे पुतळे जाळीत आहेत. या बाबीचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करीत असून, यापुढे भंडारदरा धरणातून थेंबभरही पाणी सोडू देणार नसल्याचे निवेदन आज भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी द्विवेदी व कार्यकारी अभियंता देशमुख यांना दिले आहे.

आज भंडारदरा धरणाच्या पाणलोटक्षेत्रातील रतनवाडी, साम्रद, शिंगणवाडी, उडदावणे, घाटघर, मुरशेत, मुतखेल, कोलटेंभे, पांजरे, बारी, जहागीरदारवाडी, पेंडशेत, शेंडी आदी गावांमधील कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची नगर येथे भेट घेतली. जयराम इदे, विजय भांगरे, प्रभाकर कोकाटे, संपत झडे, धोंडिबा सोंगाळ, बच्चू गांगड, पांडू खाडे, सुनील सारोक्ते, चिंधू झडे, नरहरी इदे, विलास बांडे, तुकाराम बांडे, सखाराम उंबरे, संतोष मुंढे, लालू भांगरे आदींचा यात समावेश होता.

धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी काढून घेण्यात आल्याने उपसा सिंचन योजनांचे उद्‌भव आटले आहेत. परिणामी पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या नजीकच्या काळात निर्माण होण्याची शक्‍यता आहे. उपसा सिंचन योजना बंद पडल्याने उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचमुळे भंडारदरा धरणातील शिल्लक पाणीसाठा पिण्यासाठी राखून ठेवावा. धरणासाठी आदिवासींच्या जमिनी गेल्या आहेत. या धरणात जमिनी बुडालेल्या कोणत्याही शेतकऱ्याचे पुनर्वसन झालेले नाही. मात्र त्याच लोकांना आज पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

यापुढील काळात आमदार पिचडांची कोणत्याही प्रकारची बदनामी आम्ही खपवून घेणार नाही. भंडारदरा धरणाचे थेंबभर पाणीही खाली जाऊ देणार नाही, ज्या शेतकऱ्यांची उभी पिके जळाली आहेत, त्यांना एकरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई शासनाने द्यावी, अशी मागणीही या शेतकऱ्यांनी यावेळी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)