भंगार बसेसच्या जीवावर उड्या किती दिवस?

नव्यांची प्रतिक्षाच : पीएमपीच्या ताफ्यात 165 बसेस आयुर्मान संपलेल्या

– गणेश राख

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – पीएमपी प्रशासनाने वेळोवेळी नव्या बसेस खरेदी करण्याची गरज होती. मात्र, 2012 ते 2017 या पाच वर्षांत फक्‍त 12 नव्या बसेस ताफ्यात आल्या. यामुळे जुन्या बसेसची संख्या वाढत आहे. नियमानुसार सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील बसेस 12 वर्षांनंतर “स्क्रॅप’ करणे आवश्‍यक आहे. मात्र, नव्या बसेस उपलब्ध नसल्याने पीएमपीला जुन्या बसेस भंगारात काढणे परवडणारे नाही. याचमुळे आज जवळपास 200 जुन्या बसेसच्या जीवावर प्रशासन किती दिवस उड्या मारणार, असा प्रश्‍न आहे.

पीएमपीच्या ताफ्यात जुन्या बसेसचा भरणा वाढत आहे. अनेक वर्षांपासून वेळोवेळी नव्या बसेस ताफ्यात दाखल न झाल्याचा हा परिणाम असून सध्या 1,400 पैकी तब्बल 165 बसेस आयुर्मान संपलेल्या आहेत. तर, 190 बसेस जास्त कालावधीच्या झाल्या आहेत. या बसेसच्या देखभाल दुरुस्तीसाठी प्रशासनाला मोठा भार सहन करावा लागत असून ब्रेकडाऊनचे प्रमाणही याच बसेसचे जास्त आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता जुन्या बसेसबद्दल काहीतरी ठोस निर्णय प्रशासनाला घ्यावा लागणार आहे.

पीएमपीच्या ताफ्यात स्वतःच्या आणि भाडेतत्वावरील मिळून एकूण 2 हजार 33 बसेस आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत विचार करता साधारणपणे 3 हजार बसेसची आवश्‍यकता असल्याचे निरीक्षण “सीआयआरटी’ संस्थेने नोंदवले होते. मात्र, सध्या ही संख्या जवळपास 1 हजाराने कमी आहे. यातही अनेक बसेस जुन्या झाल्याने रस्त्यावरच बस बंद पडणे, देखभाल-दुरुस्तीचा वाढता खर्च, कमी “अव्हरेज’ देणे, जास्त इंधनाचा वापर या सर्वांमुळे जुन्या बसेस हाताळणे प्रशासनालाही कठीण जात आहे. दिवसेंदिवस या बसेसचा खर्च वाढत असल्याचे प्रशासनाच्या आकडेवारीवरून दिसून येते.

नव्या बसेस वेळेवर दाखल होणार का?
पीएमपी ताफ्यात 400 सीएनजी आणि 150 ई -बसेस खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. दोन्ही बसेसबाबत निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून तांत्रिक तपासणी सुरू आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन वर्षाच्या सुरूवातीला ताफ्यात नव्या बसेस दाखल करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. मात्र, कासवगतीने सुरू असलेली प्रक्रिया पाहता नव्या बसेस वेळेत दाखल होणार का? असा प्रश्‍न आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)