भंगार दुचाकी विक्रीतून मिळाले चार लाख 6 हजार रुपये

अकोले – भंगार दुचाकी विक्रीतून चार लाख सहा हजार रुपयांचा महसूल शासनाला मिळवून देणारे काम अकोले पोलीस ठाण्याने नुकतेच केले. या उपक्रमाबद्दल शासनस्तरावर या विभागाचे कौतुक केले गेले.

अकोले पोलीस ठाण्याच्या आवारात आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासालगत गेली पाच वर्षे 125 दुचाक्‍या पडून होत्या. या दुचाक्‍यांमधून आपआपली वाहने ओळखून नेण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी जनतेला केले होते. त्यानुसार 19 व्यक्तींनी आपल्या दुचाक्‍या नेल्या होत्या. मात्र, उरलेल्या 96 दुचाक्‍या पडूनच होत्या. त्यांचे खत होण्यापेक्षा त्या भंगारात स्क्रॅपमध्ये विकण्याची वरिष्ठांची परवानगी शिळीमकर यांनी घेतली.

पोलीस ठाण्याच्या आवारात जिल्ह्यातील भंगार खरेदीदारांच्या उपस्थितीत हा व्यवहार पार पडला. तहसीलदार मुकेश कांबळे, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलीस निरीक्षक विकास काळे, नितीन बेंद्रे, आदींनी नंतर लिलावाची प्रक्रिया पार पाडण्याकामी कष्ट घेतले. विशेष बाब म्हणजे या लिलावाची बोली लावण्याचे काम निवृत्त तलाठी बाळासाहेब कोकणे यांनी पाहिले. त्यांची लिलाव बोली लावून एक, दोन, अडीच वाराची बोली सर्वांना भावणारी ठरली.
जिल्ह्यातील भंगार व्यापाऱ्यांचे तीन गटात विभाजन झाले होते. त्यामुळे साखळी केलेल्या व्यापाऱ्यांचा डाव शिळीमकर यांनी वेळीच ओळखला व लिलाव स्थगित ठेवण्याचे अधिकार आपण राखून ठेवले असल्याचे जाहीर केले. तेव्हा व्यापारी सावध झाले. बोली सव्वालाखावरून एकदम 3 लाख रुपयांवर गेली. वाढत्या स्पर्धेमुळे हे लिलाव एकदम गतीने चार लाख रुपयांचा अंक ओलांडून पुढे गेले. त्यानंतर हे लिलाव 4 लाख सहा हजार रुपयांवर थांबले. या गाड्या भंगार म्हणूनच विकल्या गेल्या आहेत. त्यांची दुरुस्ती करून मागील मार्गाने त्या रस्त्यावर आल्या तर संबंधितांवर कारवाईचे संकेत शिळीमकर यांनी दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)