भंगार गोळा करण्याच्या बहाण्याने घरफोडी; चौघांना अटक

पुणे- भंगार गोळा करण्याच्या बहाण्याने भरदिवसा कुलूपबंद बंगले हेरून घरफोडी करणाऱ्या तीन महिलांसह एका पुरुषाला अलंकार पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडे केलेल्या तपासात पुणे शहरातील 8 आणि ठाणे येथील 1 असे एकूण 9 गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून 14 लाख 29 हजारांचा ऐवज जप्त केला आहे.
अनु पवन आव्हाड (वय 25, रा. खराडी), प्रकाश अंबादास आव्हाड (वय 34), पुजा प्रकाश आव्हाड उर्फ पुजा दिलीप गुप्ता (वय 38) आणि अनिता कैलास बोर्डे (वय 42, सर्व रा. दिवा, ठाणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना गुन्ह्यात मदत करणारे 16 आणि 13 वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला शहरातील विविध भागांत फिरून बंद बंगल्यांची रेकी करीत असत. भंगार विकत घेत असल्याचा बहाणा करून बंगल्याच्या आवारात घुसायच्या. तसेच बंगल्यामध्ये कोणी आहे का? याची तपासणी करण्यासाठी आवाज देवून पिण्याचे पाणी मागत. त्यानंतर आतून प्रतिसाद आला नाही, तर आपला साथीदार आणि लहान मुलांना तेथे बोलावून घेत. बंगल्याचे पुढच्या दाराऐवजी मागच्या बाजूला असलेले किचनचे दार, खिडकीचे गज वाकवून त्यातून लहान मुलाला आत पाठवित. त्यानंतर तो मुलगा दरवाजा उघडून त्यांना आत घेत घरातील रोख रक्कम आणि दागिने चोरी केल्यानंतर आलेल्या मार्गाने सर्व जण पलायन करायचे. त्यामुळे बंगल्यात चोरी झाल्याचे बाहेरून कोणाला समजत नसे.
दरम्यान, आरोपी महिला कर्वेनगरमध्ये संशयितरीत्या फिरत असताना नागरिकांना दिसल्या आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर अलंकार पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी घरफोड्या केल्याची कबुली दिली. अलंकार पोलीस ठाणे 5, डेक्कन 2, शिवाजीनगर एक आणि ठाणे येथील नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 1 अशा 9 घरफोड्या उघडकीस आल्या आहेत. त्यांच्याकडून 331 ग्रॅम सोने आणि 7 किलो 532 ग्रॅम चांदी असा एकूण 14 लाख 29 हजार 162 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. आरोपी महिलांकडून चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या मुबारक उमर खान (वय 41, रा. गोवंडी, मुंबई) यालाही अटक केली आहे.
पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली, सहायक पोलीस आयुक्त बाजीराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेखा साळुंखे, विजयकुमार शिंदे, सहायक निरीक्षक संदीप बुवा, उपनिरीक्षक अंबरिश देशमुख, राजेंद्र सोनावणे तसेच पोलीस कर्मचारी नितीन कांबळे, उस्मान कल्याणी, बाबुलाल तांदळे, राजेंद्र लांडगे, श्रीकांत चव्हाण, योगेश बडगे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)