भंगारवाली आणि पैसेवाली

डॉ. न. म. जोशी 

यमुनाबाई एक भंगारवाली होती. भंगार गोळा करून, भंगारात कधी कधी ती रद्दीही घेत असे. पायाने अधू असूनही यमुनाबाई हातगाडी ढकलत चालवायच्या. पोटासाठी काहीतरी उद्योग करायला हवा ना? एकदा एका अरुंद गल्लीच्या तोंडाशी यमुनाबाई आली. तेव्हा समोरच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या एका सुशिक्षित श्रीमंत स्त्रीनं तिला बोलावलं, तिचं नाव कांताबाई. कांताबाईंनी घरातून भला मोठा पुठ्ठ्यांचा ढीग आणला, दोरीनं बांधलेला. तो ढीग त्यांनी दिवाणाखाली ठेवला होता.

“बाई, तुझ्याकडं वजनकाटा आहे का? वजन कसं करणार?’ कांताबाईंनी विचारलं.
“आणते बाई गाडीवरून. गाडी या बोळातनं येत नाही. मी काटा घेऊन येते. यमुनाबाईंची पाठ वळताच कांताबाईनं एक भली मोठी वीट त्या पुठ्यांच्या गठ्ठयात खुपसून लपवली. विटेमुळं वजन जास्त होणार होतं. कांताबाईला पैसे जास्त मिळणार होते. यमुनाबाईनं वजन केलं. वजनाप्रमाणे हिशेब करून कांताबाईला पैसे दिले आणि तो गठ्‌टा घेऊन यमुनाई बोळातून बाहेर गेली. कांताबाईच्या चेहऱ्यावर खुशी होती. विटेच्या वजनाचे पैसे तिला जास्त मिळाले होते.

कांताबाई खुशीतच घरात शिरली. एवढ्यात कांताबाईचा तरुण मुलगा यश ओरडतच आला.
“आई, या दिवाणाखालचा गठ्ठा कुठाय?’
“आताच मी भंगारवालीला घातला. ती गेली. पुढच्या रस्त्याला लागली असेल.’
“अरे देवा, आई कशाला ती रद्दी घातलीस?’ कपाळावर हात मारत यश म्हणाला.
“अरे झालं तरी काय? रद्दी तर घातली. खूप पैसे मिळाले,’ कांताबाई म्हणाल्या.
“खूप पैसे मिळाले? अगं आई, खूप पैसे गेले.’ यश किंचाळला. आणि तो धावतच बाहेर पडला… आणि बोळाच्या

तोंडाशीच भंगारवाल्या यमुनाबाईची गाठ पडली. यमुनाबाई कांताबाईच्या घराकडंच येत होती. यमुनाबाईच्या एका हातात ती वीट होती आणि एका हातात छोटी बॉक्‍स होती. भंगारवाल्या यमुनाबाईनं दोन्ही गोष्टी यशच्या हाती दिल्या. विट आणि बॉक्‍स? कसली होती बॉक्‍स? यशनं त्याच्या मित्राकडून घेतलेले पैसे होते. नोटा होत्या वीस हजारांच्या… त्याला आईला कळू द्यायचं नव्हतं…
“बाई ही तुमची वीट… ही तुमची पेटी…’

भंगारवालीनं पैसे जसेच्या तसे परत केले होते. कांताबाईचा चेहरा शरमेनं खजील झाला. यश आ वासून बघत होता. पैसेवाल्या कांताबाईपेक्षा भंगारवाली यमुनाबाई त्यादिवशी जास्त प्रामाणिक ठरली होती.

कथाबोध
माणूस कितीही शिकलेला असो, पैसेवाला असो, त्याचे मन सुसंस्कारित नसेल तर त्याच्यातील दुष्ट प्रवृत्ती, लोभ, विकार तोंड वर काढतातच. उलट ज्याचं मन संस्कारित आहे तो कोणत्याही परिस्थितीस आपल्या प्रामाणिकपणाचं सद्वर्तनाचं व्रत सोडत नाही. क्षुल्लक स्वार्थासाठी ही माणसं खोटं वागायला कमी करीत नाहीत आणि भंगारवाल्या यमुनाबाईंसारखी माणसं कोणत्याही लोभाला बळी न पडता, आपल्या कष्टमय जीवनातही सद्वर्तनाची साथ सोडत नाहीत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)