‘ब’ जीवनसत्व 

ब 3 किंवा निआसिन हे ब-गटातील महत्त्वाचे जीवनसत्व आहे. रक्‍ताभिसरणाचे काम सुरळीत चालू ठेवण्यासाठी निआसीनची गरज असते. कर्बोदके आणि प्रथिने यांच्या पचनासाठी निआसिन उपयोगी पडते. त्वचा निरोगी राखण्यासाठी, लैंगिक हार्मोन्सच्या निर्मितीसाठी निआसिनची गरज असते.

मांस, मासे, गायीच्या दुधात निआसिन जास्त प्रमाणात असते. तांदूळ, गहू, शेंगदाणे, सनफ्लॉवरच्या बिया, बदाम, हिरव्या पालेभाज्या, यीस्ट, धान्याचा कोंडा यात हा घटक असतो. म्हणून निआसीन पुरेशा प्रमाणात मिळवण्यासाठी भाकरी, पोळी करताना पिठे चाळून घेऊ नयेत. तसेच शेंगदाणे भाजून त्याचे कूट करताना शेंगदाण्याची साले काढून टाकू नयेत. भाजलेल्या शेंगदाण्यांचे सालासकट कूट करावे.

निआसिनच्या अभावामुळे चिडचिड वाढते, उदास वाटते, निद्रानाश डोकेदुखी, अपचन, रक्‍तक्षय ही लक्षणे दिसून येतात.
अन्न शिजवताना ह्या घटकाचा नाश होत नाही. परंतु भरपूर पाणी टाकून भाज्या शिजवल्या तर पाण्यातून ते वाया जाते. म्हणून भाज्या शिजवताना आवश्‍यक तेवढ्याच पाण्यात शिजवाव्यात. शिजवलेले पाणी टाकून देऊ नये आणि भाज्या प्रमाणापेक्षा जास्त शिजवू नयेत.

ब 5 – ब गटातील पाण्यात विरघळणारे हे जीवनसत्व पॅंटोथेनिक ऍसिड या नावाने ओळखले जाते. हे जीवनसत्व शरीरातील प्रत्येक महत्त्वाच्या कार्यात भाग घेते. मानसिक व शारीरिक ताणतणाव दूर करते. रोगप्रतिकारक शक्‍ती वाढवते. या जीवनसत्वामुळे उत्साह वाढतो. अकाली वार्धक्‍यापासून हे शरीराला दूर ठेवते.
यीस्ट, यकृत, अंडी यामध्ये हे भरपूर प्रमाणात असते. जवळजवळ सर्वच अन्नपदार्थात हा घटक असतो, परंतु अन्नपदार्थ टिकविण्यासाठी केली जाणारी प्रक्रिया, कॅफिन, झोपेच्या गोळ्या, दारू यांनी ते नष्ट होते. म्हणून प्रक्रिया केलेले हवाबंद डब्यातील अन्नपदार्थ आपल्या दैनंदिन आहारातून वर्ज्यच करावेत.

बी-6 म्हणजेच पायरिडॉक्‍झिन हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व. प्रथिने व स्निग्ध पदार्थ यांचे योग्य तऱ्हेने पचन होण्यासाठी याचा उपयोग होतो. मेंदूचे काम सुरळीत चालू राहण्यासाठी, मानसिक विकार व त्वचेचे विकार टाळण्यासाठी, रक्‍तातील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी, मधुमेह व हृदयविकार यांना प्रतिबंध करण्यासाठी या जीवनसत्वाची गरज असते.
गव्हाचा भरडा, सोयाबीन, अक्रोड, यीस्ट यांत ते असते. कच्च्या भाज्यांमध्ये असलेले याचे प्रमाण शिजवलेल्या अन्नावरील रासायनिक प्रक्रियेमुळे नष्ट होते. दारूमुळेही ते नष्ट होते.

बी-8 म्हणजेच बायोटिन हे पाण्यात विरघळणारे ब-गटातील जीवनसत्व आहे. केस निरोगी ठेवण्यासाठी व केसांच्या वाढीसाठी हे अतिशय आवश्‍यक आहे. त्यामुळे केस गळत नाहीत, तसेच अकाली पिकतही नाहीत. कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ यांच्या पचनासाठी बायोटिन आवश्‍यक असते.
तांदुळाचा भरडा, तांदुळाचे पीठ, तांदूळ, यीस्ट, शेंगदाण्याची चटणी यात बायोटिन भरपूर प्रमाणात असते.
बायोटिनच्या अभावामुळे शरीरास शिथिलपणा येतो. केस गळतात, डोक्‍यात कोंडा होतो. त्वचा तेलकट होते. अतिशय थकवा जाणवतो, रक्‍तक्षय होतो.

एकूणच ब गटातील जीवनसत्वांचा शरीरास पुरवठा होण्यासाठी भाज्या कमी पाण्यात, योग्य प्रमाणात शिजवाव्यात. कोंडायुक्‍त पिठांचा (पिठे न चाळता) वापर पोळी, भाकरीसारखे पदार्थ बनविण्यासाठी करावा. सोडा घालून कोणताही पदार्थ शिजवू नये. पॉलिश न केलेला हातसडीचा तांदूळ वापरावा.
ब-गटात आणखीही काही जीवनसत्वे आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)