ब्लडप्रेशर अर्थात रक्‍तदाब

डॉ. दीप्ती पोतदार 

रक्‍तदाब कमी करण्यासाठी अन्नातील मीठाचे प्रमाण कमी करावे. वजनावर नियंत्रण ठेवावे. योग्य मार्गदर्शनाने व्यायाम करावा.सिगारेट, दारूचे व्यसन असलेल्यांनी ते त्वरित सोडावे. व्यवस्थित झोप घ्यावी. 

रक्‍तदाब ही तक्रार आजच्या धावपळीच्या जीवनशैलीची सामान्य बाब होऊ पाहते आहे. आधुनिकतेच्या नावाखाली शरीराची कमी झालेली हालचाल आणि सहन न होणारा मानसिक ताण याचे प्रमाण वाढत जात आहे. परिणामी शरीराला कायमस्वरूपी काही तक्रारी चिकटून राहतात त्यापैकी एक म्हणजे ब्लडप्रेशर. लवकर समजून न येणाऱ्या या तक्रारीमागे बरेच दिवस किंवा महिने असतात. हळूहळू वाढत जाऊन आपले रूप दाखवणाऱ्या या तक्रारीला वैद्यकीय भाषेत सायलेंट किलर अशी उपाधी दिली जाते. बऱ्याच वेळा शरीर, शारीरिक आणि मानसिक ताणाची वाढती लक्षणे दर्शवित असते त्याकडे वेळीच लक्ष पुरविल्यास पुढील गंभीर परिस्थिती थोपवता येते. रक्‍तदाब ही कोणती व्याधी नसून कोणत्या तरी एका आजाराचे ते केवळ लक्षण आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रक्‍तदाब हा दोन प्रकारात गणला जातो. सर्वश्रुत असणारा “उच्च रक्‍तदाब’ अर्थात “हाय ब्लडप्रेशर’ आणि दुसरा “निम्न रक्‍तदाब” अर्थात “लो ब्लडप्रेशर’. सर्वसाधारणपणे 120 ते 130 ही वरची पातळी मानली जाते तर 80 ते 90 ही खालची पातळी मानली जाते. रक्‍तदाब हा व्यक्‍तीच्या वयानुसार, कामाच्या स्वरुपानुसार तसेच अल्प प्रमाणात अनुवंशिकतेवर अवलंबून असतो. रक्‍तदाबाची वरची पातळी ही आपले वय अधिक 100 हा आकडा नॉर्मल धरला जातो. तसेच खालच्या पातळीसाठी 90 पर्यंतची पातळी सामान्य धरली जाते. उदा. वय वर्षे 45 असणाऱ्या व्यक्‍तींसाठी 140 ते 150 ही वरची पातळी सामान्य मानली जाते. असे असता या वयासाठी 160 या पातळीच्यावर रक्‍तदाब गेल्यास तसेच खालची पातळी 100 पेक्षा अधिक असल्यास त्या व्यक्‍तीस उच्च रक्‍तदाब असण्याची शक्‍यता असते.

निम्न रक्‍तदाबामध्ये वरची पातळी ही 110 आणि खालची पातळी 70 पेक्षा खाली असू नये. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उच्च रक्‍तदाब हा त्वरीत खाली आणता येतो. मात्र निम्न रक्‍तदाब त्वरित वाढविणे ही अतिशय अवघड गोष्ट आहे.
रक्‍तदाब वाढण्यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत. वर नमूद केल्याप्रमाणे रक्‍तदाबामागे एखादा दुसरा रोग दडलेला असतो. अशावेळी ही तक्रार दीर्घकाळ टिकून राहणारी असते. परंतु काही परिस्थितीत काही काळापुरता रक्‍तदाब वाढलेला आढळतो. जसे अचानक बसलेला मानसिक धक्‍का, भीती, गर्भारपण इतकेच नाही तर आता आपला रक्‍तदाब मोजला जाणार या भीतीने देखील काही व्यक्‍तींचा रक्‍तदाब वाढलेला आढळतो.

याशिवाय शरिरांतर्गत असलेल्या काही आजारात रक्‍तदाब वाढतो. यात लक्ष द्यावे लागते ते म्हणजे मूत्रपिंडाच्या आजारांवर. मूत्रपिंडाला आतून सुज येणे, पाण्याचे फुगे तयार होणे (पॉलिसिस्टिक किडनी डिसिज) अशा आजारात रक्‍तदाब वाढतो. याचबरोबर मूत्रपिंडांना होणाऱ्या रक्‍तपुरवठ्यात काही दोष येऊ लागल्यास देखील मूत्रपिंडावरील ताण वाढून रक्‍तदाब वाढतो.

रक्‍तदाब वाढण्यामागे दुसरी महत्त्वाची शंका येते ती म्हणजे शरीरभर रक्‍ताचा पुरवठा करणाऱ्या प्रत्यक्ष रक्‍तवाहिन्यात दोष निर्माण झाल्यास त्याचा परिणाम रक्‍तदाबावर होतो. उदा. रक्‍तवाहिन्यांना काठिण्य येणे. याव्यतिरिक्‍त शरीरातील कार्य सुरळीतपणे चालू असण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या संप्रेरकांमध्ये बिघाड झाल्यास रक्‍तदाब वाढलेला आढळतो. यात थायरॉईड या ग्रंथीला विशेष महत्त्व आहे. कोणत्याही कारणाने मेंदूभोवती असणारा दाब वाढल्यास त्याचे प्रत्यंतर रक्‍तदाब वाढण्यात होते. याशिवाय इतरही काही कारणे आहेत ज्यामुळे रक्‍तदाब वाढू शकतो.

तात्पुरता रक्‍तदाब वाढल्यास त्याचा शरीरावर कोणताही गंभीर परिणाम होत नाही. परंतु सतत उच्च रक्‍तदाब राहिल्यास मात्र शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर त्याचा परिणाम होतो. हृदयाचा आकार वाढणे, हृदयशुल अर्थात हृदयाच्या भागात दुखणे सुरू होणे, हृदयाला रक्‍तपुरवठा करणाऱ्या रक्‍तवाहिन्यांमध्ये दुष्परिणाम होणे. हे उच्च रक्‍तदाबामुळे हृदयावर होणारे परिणाम होत. उच्च रक्‍तदाबामुळे मूत्रपिंडाच्या कार्यात बाधा निर्माण होते. तसेच अति उच्च रक्‍तदाबामुळे मेंदू भोवतीच्या रक्‍तवाहिन्यांमध्ये रक्‍तस्त्राव होण्याची शक्‍यता असते. तसेच उच्चरक्‍तदाबाचा ताण डोळ्यातील रक्‍तवाहिन्यावर देखील होतो. रक्‍तदाब नियंत्रणाअभावी डोळ्यात रक्‍तस्त्राव होऊन गंभीर दृष्टी अधू होण्याची शक्‍यता असते.

रक्‍तदाब वाढण्यामागची कारणे कोणती? रक्‍तदाब वाढल्यामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम देखील आपण समजून घेतले. मात्र रक्‍तदाब वाढला आहे हे लक्षात येणे सर्वात महत्त्वाचे आहे. यासाठी रक्‍तदाब वाढल्यास साधारण कोणती लक्षणे दिसून येतील ते ध्यानात घेऊ. बऱ्याच वेळा रक्‍तदाब वाढल्यास डोकेदुखीची तक्रार सकाळच्या वेळी सुरू होते. डोके जड होणे, अस्वस्थ वाटणे अशा तक्रारी सुरू होतात. काही वेळा नाकातून रक्‍त येऊ लागते. वैद्यकीयदृष्ट्या पाहता ही एक चांगली आणि नैसर्गिक गोष्ट आहे. यात रक्‍तस्त्राव झाल्याने रक्‍तवाहिन्यांवरील दाब कमी होऊन रक्‍तदाब कमी होण्यास मदत होते. असे असले तरी वैद्यकीय सल्ला हा केव्हाही महत्त्वाचा.

रक्‍तदाब वाढलेल्या रुग्णाच्या लक्षणांवरून नेमका कोणत्याही अवयवाच्या कार्यात बिघाड आल्याने रक्‍तदाब वाढला आहे याचा अंदाज बांधता येतो. रक्‍तदाब हा हृदयाशी संबंधित असल्यास दम, धाप लागणे, छातीत डाव्या बाजूस कळा येणे अशा तक्रारी सुरू होतात. मूत्रपिंडाच्या कार्यात बिघाड होऊन रक्‍तदाब वाढला असल्यास लघवीवाटे रक्‍त जाणे, वारंवार लघवीला होणे, रात्रीतून लघवीसाठी उठावे लागणे अशी लक्षणे संभवतात. मेंदूभोवती दाब वाढून रक्‍तदाब वाढत असल्यास डोकेदुखीबरोबर उलट्या होणे, भोवळ येणे अशा तक्रारी असू शकतात. तर डोळ्याला अंधुक दिसणे किंवा अचानक नजर कमजोर होणे या तक्रारी रक्‍तदाबाचा डोळ्यांचा असणारा संबंध दर्शवितात. याशिवाय वजनात होणारा बदल, घाम येणे, अशक्‍तपणा, अकारण सांधेदुखी अशी अनेक लक्षणे रक्‍तदाब वाढल्याचे दर्शवितात. येथे एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, अशी लक्षणे इतरही काही आजारामुळे असू शकतात. म्हणूनच योग्यवेळी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्‍यक आहे.

वर नमूद केलेली लक्षणे दिसून येताच वेळ न दवडता वैद्यकीय सल्ला घेतल्यास जीवनशैलीमध्ये काही बदल घडवून रक्‍तदाब कमी करता येण्याची शक्‍यता असते. याकरिता अन्नातील मीठाचे प्रमाण कमी करावे. वजनावर नियंत्रण ठेवावे. यासाठी योग्य मार्गदर्शनाखाली व्यायाम प्रकार सुरू करावा. आजच्या जीवनशैलीत बऱ्याच व्यक्‍तींना असणारे सिगारेट, दारूचे व्यसन पूर्णपणे बंद करावे. यामुळे रक्‍तवाहिन्यांमधील काठिण्य वाढते. कामाच्या व्यापामुळे जेवणाच्या बदललेल्या सवयी पुन्हा सुधाराव्या. व्यवस्थित झोप घ्यावी. मेडिटेशन, ध्यान, योग यासारख्या शरीर व मन हलके करण्याच्या गोष्टी शिकून घेऊन त्यांचा रोजच्या दिनचर्येत अवलंब कराव्या. तसेच डॉक्‍टरांच्या सल्ल्याने आवश्‍यक असल्यास औषधे सुरू करावी. या सर्व गोष्टी पाळल्यास निश्‍चितच रक्‍तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)