“ब्रेक्‍झिट’नंतरच्या संबंधांसाठी ट्रम्प लंडनमध्ये

लंडन – युरोपियन संघातून ब्रिटन बाहेर पडल्यानंतर अमेरिकेबरोबरचे संबंध सर्वसाधारण रहावेत, यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज लंडनमध्ये दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान ते ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. मात्र ट्रम्प यांच्या वादग्रस्त धोरणांच्याविरोधात लंडनमध्ये मोठी निदर्शने केली जाण्याची तयारीही झाली आहे.

ट्रम्प यांनी काही काही मुस्लिम देशांमधील नागरिकांवर घातलेली प्रवेशबंदी, अमेरिका आणि मेक्‍सिकोच्या सीमेवर शरणार्थींच्या मुलांना ताब्यात घेणे आणि युरोपियन संघावर पोलाद आणि ऍल्युमिनियमच्या निर्यातीवर लागू केलेले आयात शुल्क आदी निर्णयांच्याविरोधात सार्वत्रिक असंतोष निर्माण झाला आहे. ब्रिटननेही या निर्णयांवर टीका केली होती. या अप्रिय निर्णयांमुळेच लंडनमध्ये ट्रम्प यांच्याविरोधात निदर्शनांची जुळवाजुळव सुरू झाली आहे.

त्यातच “ब्रेक्‍झिट’बाबतच्या धोरणांवरून ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांना त्यांच्याच पक्षातून विरोध व्हायला लागला आहे. ब्रिटनच्या मंत्रिमंडळातील दोन वरिष्ठ मंत्र्यांनी नुकताच राजीनमा दिला आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी पदावर कायम रहायचे की नाही याचा निर्णय जनतेवरच अवलंबून असतो, असे सूचक विधान ट्रम्प यांनी केले होते. त्यामुळे राजकीयदृष्ट्या अस्थिर असलेल्या वातावरणात ब्रिटन असतानाच ट्रम्प यांची ही भेट होते आहे.

“ब्रेक्‍झिट’ आणि नंतर अमेरिका आणि ब्रिटनमधील व्यापार आणि सुरक्षा संबंधांबाबतही ट्रम्प आणि मे यांच्यात चर्चा अपेक्षित आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)