ब्रिगेडियर कुलदीप सिंग चंदपुरी यांचे निधन 

चंदीगढ – भारत-पाकिस्तानमध्ये 1971मध्ये झालेल्या युद्धातील विजयाचे शिल्पकार निवृत्त ब्रिगेडियर कुलदीप सिंग चंदपुरी यांचे आज निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. महावीरचक्राने सन्मानित करण्यात आलेल्या कुलदीप सिंग काही दिवसांपासून आजारी होते.

मोहाली येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज सकाळी 8.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. कुलदीप सिंग यांचा दुसरा मुलगा जर्मनीहून परतल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती हरदीप सिंग चंदपुरी यांनी दिली.

-Ads-

राजस्थान येथील लोगेंवाला सीमेवर पाकिस्तानकडून 5 आणि 6 डिसेंबर 1971 रोजी मध्यरात्री हल्ला करण्यात आला होता. यावेळी पंजाब तुकडीचे नेतृत्व कुलदीप सिंग यांनी केले होते. या युद्धात भारताच्या विजयाचे ते शिल्पकार ठरले. त्यांच्या योगदानामुळे महावीरचक्राने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

ब्रिगेडियर कुलदीप सिंग यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1940ला गुर्जर शीख कुटुंबात झाला होता. भारतातल्या पंजाबमध्ये त्यांचे कुटुंब वास्तव्याला होते. त्यांच्या जन्मानंतर कुटुंबीय बालाचौरमधल्या चांदपूरमध्ये वास्तव्याला गेले. 1962 मध्ये त्यांनी होशियारपूरमधल्या गव्हर्नमेंट कॉलेजमधून पदवी संपादन केली होती. त्यानंतर ते भारतीय लष्करात रूजू झाले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)