ब्राम्हण व ब्राम्हणेतर लेखकांकडून इतिहासाचा विनयभंग

श्रीपाल सबनीस यांचा आरोप : 20 व्या ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन

सातारा, दि.4 (प्रतिनिधी)- छ.शिवाजी महाराजांचा वाचलेला इतिहास आज दिसून येत नाही. समाजा-समाजामध्ये फुट पडताना दिसून येत आहे. प्रत्येकाने महाराजांची वाटणी करून घेतली आहे. ब्राम्हणांनी लिहीलेला आणि त्यास ब्राम्हणेतर लेखकांकडून दिलेल्या उत्तरामुळे वैचारिक प्रवाहात बदल व त्याच बरोबर इतिहासाचा विनयभंग देखील होत आहे, असा आरोप ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

20 व्या सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. त्यावेळी खा.उदयनराजे भोसले, प्रा. वि. ना लांडगे, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, प्रा. यशवंत पाटणे, शिरीष चिटणीस, प्रदीप कांबळे, सुनीता कदम, सुनीताराजे पवार, उपशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, डॉ. राजेंद्र माने आदी. उपस्थित होते.

पुढे बोलताना सबनीस म्हणाले, महाराजांचा विवेकनिष्ठ व खरा इतिहास समाजासमोर नेण्याची खऱ्या अर्थाने आज आवश्‍यकता आहे. शेतीतील भाजीच्या देठाला पण हात लागता कामा नये, असे महाराजांनी सांगितले होते. मात्र, आज शेतकरी मरतोय तेव्हा सरकार नेमके काय करतंय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. समाजात घडणाऱ्या अनुचित घटना व मनुष्यांमध्ये वाढते पशुत्व रोखण्याची जबाबदारी राजकारण्यांवर आहे. मात्र, धर्म आणि राजकारणाच्या नावाखाली सर्वसामान्य माणूस होरपळला जात आहे. अशावेळी ग्रंथ निवडण्याचे काम मनुष्यालाच करावे लागणार आहे. कारण, ग्रंथाला कोणतीही जात आणि धर्म नाही. सर्व धर्मग्रंथ येथील ग्रंथमहोत्सवातील स्टॉल्समध्ये शेजारी-शेजारी ठेवण्यात आल्याचे दिसून येतील. ग्रंथ हे मित्र तर आहेतच त्याचबरोबर आई व बाबा आहेत. परंतु इंटरनेटच्या जगात ग्रंथसंस्कृती मागे पडताना जेव्हा दिसून येते तेव्हा युवकांना मागदर्शन करणे गरजेचे आहे. इंटरनेट म्हणजे केवळ माहितीचा स्त्रोत आहे. त्यातून ग्रंथाप्रमाणे परिपुर्ण ज्ञान मिळणार नाही, हे युवकांनी लक्षात घेतले पाहिजे.

खा.उदयनराजे भोसले म्हणाले, महाराजांनी कधी ही जाती भेद केला नाही. त्यांनी केला असता तर स्वराज्याची निर्मिती होवू शकली नसती. मात्र, र्दुदैवाने आज समाजाचा वापर स्वार्थासाठी करण्यात आल्यामुळे व्यक्ती केंद्रित विचार करण्यात येत आहे. अशावेळी महापुरूषांचे विचार पुन्हा एकदा वाचण्याची वेळ आली आहे आणि केवळ वाचून मर्यादित न राहता आचरण देखील केले पाहिजे. समाजात अशाच प्रकारे जाती-पातीचे राजकारण सुरू राहिले तर अमेरिके प्रमाणे भारताची राज्या- राज्यांमध्ये विभागणी होण्यास वेळ लागणार नाही. त्यासाठी वाचनातून वैचारिक व्यापकता वाढविणे गरजेचे आहे. व्यापकता वाढविल्यास देश महासत्ता होण्यास वेळ लागणार नाही, असे खा.उदयनराजे यांनी सांगितले.
यशवंत पाटणे म्हणाले, कास पठारावर ज्या प्रमाणे फुलांचा उत्सव होतो. त्याप्रमाणे ग्रंथ महोत्सवाच्या निमित्ताने शब्द फुलांचा महोत्सव आयोजित करण्यात आला. आज धर्मद्वेषामुळे वातावरण दूषित होत आहे. अशावेळी समाजाला मार्गदर्शन करण्याचे काम साहित्यिकाला करावे लागणार आहे. लेखक संस्कृतीचे देणे लागतो व ती संस्कृती संवर्धित करण्याची जबाबादारी त्यांना घ्यावी लागणार आहे.

नियोजन चुकल्याची कबूली
ग्रंथ महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाला वाचकांची उपस्थिती नगण्य होती. तर दरवर्षीप्रमाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी- विद्यार्थीनीना निमंत्रित करण्यात आले होते. या विद्यार्थ्यांची देखील उपस्थिती अल्प प्रमाणात होती. त्यामुळे ग्रंथ महोत्सव समितीचे कार्यवाह प्रा.यशवंत पाटणे यांनी आपल्या मनोगतात नियोजन चुकल्याची कबूली दिली. अधिकाधिक विद्यार्थी कार्यक्रमाला कसे येतील, यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांशी बोलणे झाल्याचे पाटणे यांनी सबनीस यांना सांगितले. मात्र, सबनीस यांच्यासारखे ज्येष्ठ साहित्यकांना ऐकण्यासाठी लोकांनी कार्यक्रमाला येणे गरजेचे होते, अशी अपेक्षावजा खंत पाटणे यांनी व्यक्त केली.

पडसाद साहित्यातून उतरायला हवेत
समाजाचे दु:ख लेखकाने मांडले पाहिजे. मात्र, आपल्याच समाजाविषयी मांडलेले दु:खाविषयी प्रश्‍न उपस्थित केले जातात असे सांगून शिरीष चिटणीस यांनी अमेरिकेतील एका पत्रकाराची गोष्ट सांगितली. अमेरिकेत वर्णभेद असताना एका गोऱ्या रंगाच्या पत्रकाराने डॉक्‍टरांकडून काळा रंग करून घेतला. त्यानंतर सहा दिवस अनेक भागाचा दौरा केला आणि त्यानंतर त्याने एका मॅगेझिनमध्ये त्या वर्णभेदाचे वास्तववादी दु:ख समाजासमोर मांडले. त्यानंतर सरकारला खडबडून जाग आली, असे चिटणीस यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)