ब्राझीलची ऍलिसनी सिल्वा बनणार जगातील सर्वात उंच नवरी

ब्राझीलमधील 20 वर्षीय युवती ऍलिसनी डिक्रूझ सिल्वा लवकरच विवाहबद्ध होणार आहे. तुम्ही म्हणाल, त्यात काय मोठेसे? जगभरात लाखो-करोडो मुली विवाहबद्ध होत असतात. पण ऍलिसनीची गोष्ट वेगळी आहे. तिने मुंडावळ्या बांधताच ती जगातील सर्वात उंच नवरी बनणार आहे. कारण ऍलिसनीची उंची आहे 6 फूट 8 इंच.

ताडमाड उंच असलेल्या ऍलिसनीचा हा प्रेमविवाह-लव्ह मॅरिज आहे. तिच्याशी विवाह करणारा तिचा प्रेमी फ्रॅंकिनाल्डो हा बांधकामाचा व्यवसाय करतो. कोठेतरी पहिल्या भेटीतच दोघांचे प्रेम जमले. गेली तीन वर्षे ते परस्परांना ओळखत असून गेले वर्षभर ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते; आणि आता त्यांनी विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला आहे.
6 फूट 8 इंच उंचीच्या ऍलिसनीचा होणारा पती तिच्याप्रमाणेच चांगला उंचापुरा असेल अशी तुमची कल्पना झाली असेल, तर ती चुकीची आहे. फ्रॅंकिनाल्डो हा ऍलिसनीपेक्षा 1 फूट 4 इंच बुटका आहे. मात्र त्याचे त्याला काहीही वाटत नाही. तिला पाहिले आणि तिच्या प्रेमात पडलो, अशी त्याची अवस्था आहे. ऍलिसनीही फ्रॅंकिनाल्डोसारखा पती मिळाला म्हणून मोठ्या खुशीत आहे.

सुरुवातीला इतर मुलींप्रमाणेच सर्वसामान्य असलेल्या ऍलिसनीची भरमसाठ उंची वाढण्याचे कारण आहे तिचे आजारपण. तिला पिट्युअरी ग्रंथीचा विकार असल्याने तिची उंची भरमसाठ वाढत गेली. आणि अखेर ती आता जगातील सर्वात उंच नवरी बनणार आहे. मात्र वाढलेल्या उंचीमुळे तिला मनात असूनही मॉडेलिंग करता आले नाही, याचे तिला थोडेसे वाईट वाटते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)