बोऱ्हाडेवाडीत पंतप्रधान आवास योजनेचा पहिला गृहप्रकल्प

पिंपरी – महापालिकेने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 9 हजारहून अधिक घरे बांधण्याच्या कार्यवाहीला वेग दिला आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागातील 10 ठिकाणी ही घरे बांधण्याचे नियोजन आहे. या योजनेचा पहिला नारळ मोशीतील बोऱ्हाडेवाडीत फोडला जाणार आहे. याठिकाणी 123 कोटी 78 लाखांचा खर्च करून एकूण 1288 घरे उभारण्यात येणार आहेत. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी याबाबतचा अंतिम प्रस्ताव तयार केला आहे.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहराच्या वेगवेगळ्या भागातील 10 ठिकाणी एकूण 9 हजार 458 सदनिका बांधण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार चऱ्होली येथे 1442 (खर्च 150 कोटी 32 लाख), रावेतमध्ये 934 (खर्च 91 कोटी 6 लाख), डुडुळगावमध्ये 896, दिघीत 840, मोशीतील बोऱ्हाडेवाडीमध्ये 1288 ( खर्च 135 कोटी 90 लाख), वडमुखवाडीत 1400, चिखलीमध्ये 1400, पिंपरीत 300, पिंपरीतच आणखी 200 आणि आकुर्डीमध्ये 500 घरे उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. महापालिकेने या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून आधी राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला. राज्य सरकारच्या तांत्रिक समितीने नोव्हेंबर 2017 मध्ये महापालिकेच्या प्रकल्प अहवालांना मंजुरी देऊन ते केंद्र सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविले होते. केंद्रानेही महापालिकेच्या प्रकल्प अहवालांना मंजुरी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानंतर महापालिकेने बोऱ्हाडेवाडी येथे 1 हजार 288 घरे बांधण्याच्या प्रकल्पासाठी 110 कोटी 13 लाख 70 हजार 762 रुपयांची निविदा प्रसिद्ध केली. या कामासाठी तीन ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यातील मे. एस. जे. कॉन्ट्रॅक्‍टस या ठेकेदाराची इतर दोन ठेकेदारापेक्षा कमी दराची, पण महापालिकेच्या निविदा दरापेक्षा 24 कोटी 23 लाख 1 हजार 568 रुपये जादा दराची निविदा प्राप्त झाली आहे. त्यामुळे आयुक्त हर्डीकर यांनी या ठेकेदाराला 19 जून 2018 रोजी चौथ्यांदा पत्र पाठवून ठेकेदाराला दर कमी करण्याची विनंती केली. त्यानुसार या ठेकेदाराने 123 कोटी 78 लाख 37 हजार 894 रुपयांत हे काम करण्याची अंतिम तयारी दर्शविली आहे.

स्थायी समितीसमोर लवकरच प्रस्ताव
राज्य सरकारच्या एसएसआरच्या दरानुसार तसेच जीएसटी, टेस्टिंग चार्जेस, आरसीसी डिझाईन, सिमेंट व स्टीलच्या दरातील फरक आणि रॉयल्टी शुल्कासह बोऱ्हाडेवाडी येथे 1 हजार 288 घरे बांधण्याच्या कामाची किंमत 121 कोटी 19 लाख 3 हजार 165 रुपये होत आहे. ठेकेदाराने 123 कोटी 78 लाख 37 हजार 894 रुपये दर सादर केले आहेत. त्यामुळे या कामासाठी 2 कोटी 59 लाख 34 हजार 728 रुपये म्हणजे 2.14 टक्के जादा खर्च येणार आहे. त्यानुसार मे. एस. जे. कॉन्ट्रॅक्‍टस या ठेकेदाराची 123 कोटी 78 लाख 37 हजार 894 रुपयांची निविदा स्वीकारण्यास आयुक्त हर्डीकर यांनी 22 जून 2018 रोजी मान्यता दिली आहे. आता या खर्चाला स्थायी समितीची मंजुरी घेण्यात येणार आहे. त्यानंतर बोऱ्हाडेवाडी येथे 1288 घरे बांधण्याचा नारळ फोडण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)