बोपेगाव परिसरात वीज वितरणचा अनागोंदी कारभार

बोपेगाव ः रस्त्यावर लोंबकळणाऱ्या विद्युत तारा अपघाताला निमंत्रण देत आहेत.

वाकलेले विजेचे खांब, धोकादायक ट्रान्सफॉर्मर व लोंबकळणाऱ्या तारा
ओझर्डे, दि. 14 (वार्ताहर)- बोपेगाव, ता. वाई येथे मुख्य रहदारीच्या ठिकाणी असलेल्या विद्युत खांबाच्या तारा रस्त्यापासून दहा ते बारा फुटाच्या अंतरावर लोंबकळत आहेत. त्यामुळे अवजड वाहने जाताना त्या तारा वाहनांना चिकटण्याची भीती निर्माण झाली आहे. बऱ्याच ठिकाणी वीज वितरण विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे अनेक ठिकाणी जमिनीच्या दिशेने विद्युत तारा लोंबकळत असतात. तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्यांमध्ये अडकलेल्या आहेत. रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने वीज वितरणाने अशा विद्युत तारा जमिनीपासून वीस ते बावीस फुटाच्या अंतरावर कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे.
खासगीकरण झाल्यापासून वीज वितरणची प्रगती होण्याऐवजी अनेक त्रुटीच दिसून येत आहेत. संबंधित विभाग फक्त बिल वसुलीलाच अधिक प्राधान्य देत आहे. मात्र वारंवार होणारा खंडीत वीजपुरवठा कमी दाबाने होणार वीज पुरवठा, जागोजागी वाकलेले विजेचे खांब, सेफ्टी कव्हर नसलेले ट्रान्सफॉर्मर, खांबावरून लोंबकळणाऱ्या विद्युत तारा अशा अनेक समस्या असतानाही वीज वितरण कंपनीचे अधिकारी फारसे गंभीर नसल्याचे दिसून येते. विद्युत तारा पूर्णपणे लोंबकळत असतात. त्यामुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. सध्या या रहदारीच्या रस्त्याला गावातील ग्रामस्थ, जनावरे, मोटारसायकल, फोरव्हिलर या ठिकाणाहून वावरत असतात. अशा ठिकाणी लोंबकळणाऱ्या तारा यामुळे अपघाताची शक्‍यता निर्माण झाली आहे. यावर तात्काळ उपाययोजना न झाल्यास या परिसरातील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. दोन वर्षांपूर्वी गावच्या अन्य भागातील अशा विद्युत वाहिन्यामुळे शॉर्ट – सर्किट होऊन दुर्घटना घडल्या आहेत. यात उसासह अन्य पिकांचे जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. भविष्यात दुर्दैवाने या ठिकाणी दुर्घटना घडली तर जवाबदार वीज वितरणाचे कर्मचारी असतील अशी प्रतिक्रीया व्यक्त होत आहे.

 


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)