बोपदेव घाट ठरतोय मृत्यूचा मार्ग

धोकादायक वळणांवर दरडी कोसळण्याची शक्‍यता


संरक्षक कठडे तुटलेले, लोखंडी जाळ्या बसविण्याचे काम ठप्प


वाहतुकीस होतोय अडथळा; छोट्या-मोठ्या अपघातांत वाढ

कोंढवा – कोंढवा-सासवड मार्गावरील नागमोडी वळणाचा व अतिशय अरुंद असा बोपदेव घाट सध्या वाहतुकीसाठी धोकादायक बनलाय. धोकादायक वळणे आणि ऊन, वारा, पावसामुळे ठिसूळ झालेल्या दरडी कोसळून अपघाताची शक्‍यता निर्माण झाली आहे. ही टांगती तलवार सतत घाटातून जाणाऱ्यांच्या डोक्‍यावर लटकत आहे. सुरक्षा कठडे तुटल्याने जीवघेणे अपघात घडत आहेत. सर्व परिस्थिती पाहता या घाटमार्गाचे तत्काळ रुंदीकरण, सुरक्षा कठडे उभारून धोकादायक दरडी हटविणे गरजेचे झाले आहे.

कोंढवा-येवलेवाडी-सासवड मार्गावरील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा अतिशय अरुंद असा नागमोडी वळणाचा बोपदेव घाट वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक झाला आहे. अनेकदा मागणी करून सुध्दा या घाटमार्गाचे रुंदीकरण व धोकादायक दरडी हटवून संरक्षक लोखंडी जाळ्या बसविण्याचे काम होत नाही. त्यामुळे या घाटमार्गात सतत छोटे-मोठे अपघात होवून वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत आहे. हा मार्ग मोठ्या वर्दळीचा असून या घाटातून तीर्थक्षेत्र श्री कानिफनाथ गढ, श्री क्षेत्र नारायणपुर, केतकावळे बालाजी, सासवड, महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरी, श्री क्षेत्र कोडीत, वीर, बारामती, फलटण, सातारा, भोर आदी ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची व भाविकांची अहोरात्र वर्दळ सुरू असते. अनेक नवखे वाहनचालक बेसावधपणे या घाटातून निसर्गसौदर्य पाहात जात असतात. अशावेळी दरड कोसळून भीषण अपघात होवून जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

या घाटरस्त्यावर धोकादायक वळणे असून सतत अवजड व वेगाने जाणारी वाहने दरीत कोसळून अपघात घडत असतात. तसेच, दरडींचे मोठमोठे दगड कोसळुन रस्त्यावर पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे या घाट रस्त्याचे रुंदीकरण करून धोकादायक दरडी हटवीण्याची मागणी वाहनचालक व नागरिकांनी केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)