बोपखेल पुलाचा मार्ग मोकळा

पिंपरी – बोपखेल ते खडकीला जोडणाऱ्या मुळा नदीवरील पुल बांधण्याचा आणि सार्वजनिक रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुल आणि रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया, कामाला सुरुवात करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. 15 दिवसात पुल आणि रस्त्याचे काम सुरु करण्याचा आदेश महापालिकेला देण्यात आला आहे.

महापालिका हद्दीतील बोपखेलचे नागरिक दापोडीतील सीएमईच्या हद्दीतील रस्त्याचा रहदारीसाठी वापर करीत होते. मात्र, बोपखेल गावासाठी दापोडी येथून सीएमई हद्दीतून जाणारा रस्ता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 13 मे 2015 रोजी बंद करण्यात आला होता. त्याविरोधात स्थानिक नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली. त्यामध्ये केंद्र सरकाराला प्रतिवादी करण्यात आले होते. या याचिकेवर आज (सोमवारी) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बोपखेल गावासाठी मुळा नदीवर पूल आणि रस्त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेला लष्कराच्या चार एकर जागेची आवश्‍यकता आहे. लष्कराने अगोदर या जागेचा मोबदला मागितला. जागा मोजणीनंतर बाजारभावानुसार 25 कोटी 81 लाख रुपये देण्यास महापालिका तयारी दर्शविली. त्यानंतर लष्कराने जागेच्या मोबदल्यात जागेचीच मागणी केली होती. महापालिका, राज्य सरकार जागेच्या मोबदल्यात लष्कराला जागा देण्यास देखील तयार आहे. याच्या अधिन राहून न्यायालयाने मुळा नदीवर बोपखेल आणि खडकीला जोणारा पूल उभारण्यास आणि सार्वजनिक रस्ता करण्यास परवानगी दिली. त्याची निविदा प्रक्रिया करुन 15 दिवसात कामाला सुरुवात करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे बोपखेलवासियांसाठी पुल आणि सार्वजनिक रस्त्याच्या कामाला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कार्यकारी अभियंता प्रमोद ओंबासे म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेला मुळा नदीवर बोपखेल आणि खडकीला जोणारा पूल उभारण्यास आणि रस्ता करण्यास परवनागी मिळाली आहे. पुलाच्या कामासाठी 2018-19 च्या महापालिकेच्या अर्थसंकल्पात आवश्‍यक खर्चाची तरतूदही केली. त्यामुळे कामाची निविदा काढणे शक्‍य होणार आहे. दोन आठवड्यात निविदा प्रक्रिया पुर्ण केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)