बोटक्‍लबची दूरवस्था, नागरिकांचा हिरमोड

एम्प्रेस गार्डनचे संग्रहित छायाचित्र
  • प्रशासनाचे दुर्लक्ष ः धबधबा बंद, विद्युत संच ही उघडा

वाकड, (वार्ताहर) – थेरगावच्या निसर्गरम्य परिसरात सुमारे 60 एकरच्या विस्तीर्ण जागेवर कोट्यावधी रुपयांच्या खर्चाने बोटक्‍लब आणि उद्यान बनविण्यात आले आहे. परंतु या ठिकाणीही प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे बोटक्‍लबची दूरवस्था झाली आहे. या बोटक्‍लबचे सर्वांत मोठे वैशिष्टय असलेला कृत्रिम धबधबा सध्या बंद आहे. हा धबधबा पाहण्यासाठीच नागरीक येथे येत असतात, परंतु सध्या कोरड्या ठणठणीत पडलेल्या धबधब्याच्या जागेमध्ये नागरीक बसू आणि चालू लागले आहेत.

थेरगावची ग्रामदेवता तसेच ऐतिहासीक वारसा असणारे केजुदेवीचे मंदिर आणि त्याला लागूनच वर्ष भर तुडुंब वाहणारी पवना नदी या मुळे हा परिसर अत्यंत आल्हाददायक, शांत आणि निसर्ग़रम्य म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या ठिकाणी फिरायला येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त असते. थेरगाव येथील केजुदेवी मंदिर परिसर, बोटक्‍लब आणि गार्डनमध्ये मोठ्या संख्येने नागरीक येत असतात. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वचजण कृत्रिम धबधब्यात मनसोक्‍त भिजण्याचा आनंद घ्यायचे, परंतु गेल्या एक महिन्यांपासून हा धबधबा बंद असल्याचे स्थानिक नागरीक सांगत आहेत. आता येथे कोरड्या धबधब्याच्या दगडांवर बसून नागरीक सेल्फी काढत आहेत.

-Ads-

एकमेकांना खो देण्याचा खेळ
उद्यानात येऊन लहान मुले खेळत असतात, परंतु येथे मात्र पालिकेचे काही विभाग ऐकमेकांना खो देण्याचा खेळ खेळताना दिसत आहे. प्रत्येक विभाग दुसऱ्या विभागावर ढकलून धबधबा बंद असण्याचे वेग-वेगळी कारणे सांगत आहे. दैनिक प्रभातच्या वार्ताहराने बोटक्‍लबमध्ये जाऊन विचारले असता त्यांनी हा धबधबा विद्युत मोटारीमुळे बंद असल्याचे सांगितले. उद्यान व्यवस्थापन सांगत आहे की, आम्ही महानगरपालिका व संबधित अधिकाऱ्यांना सांगून थकलो पण त्यांच्याकडून काहीच दखल घेतली जात नाही. दुसरीकडे उद्यान विभाग सांगत आहे की, मोटर खराब झाली आहे आणि विद्युत विभाग लक्ष देत नसल्याने धबधबा बंद आहे. विद्युत विभाग म्हणतो की, मोटार व्यवस्थित आहे, राडा-रोडा व चिखल अडकल्यामुळे धबधबा सुरू नाही. सर्वात शेवटी वरिष्ठ अधिकारी सांगतात असे काहीच नाही, धबधबाच लीक आहे. अशा प्रकारे शेवटी स्थापत्य विभागाला खो दिला जात आहे.

उद्यान व्यवस्थापनाचे काम सनी वॉटर स्पोर्टसच्या वतीने करण्यात येत आहे. व्यवस्थापनाचे मत आहे की, धबधब्यासाठी पाणी ओढणारी मोटर आणि फुटबॉल खूप पूर्वी बसवला आहे. एकूणच कारंजे, विद्युत मोटर संबंधित साधनांची वेळच्या वेळी देखभाल होणे गरजेचे आहे. परंतु असे होत नाही, प्रशासन या बाबत उदासीन आहे. धबधबा लीक किंवा गाळ अथवा पालापाचोळ्याने भरलेला नाही. तो सध्या मोटर आणि फुटबॉलमुळे बंद आहे. याची लवकरात लवकर दुरुस्ती होणे गरजेचे आहे.

धोकादायक विद्युत संच
येथे लावण्यात आलेल्या विद्युत संचाचे झाकण तुटून खाली पडले आहे. विद्युत संचातील तारा उघड्या पडल्या आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांसाठी आणि विशेषतः लहान मुलांसाठी हा सर्वच प्रकार खूपच धोकदायक झाला असल्याचे दिसत आहे.

ओंगाळवाने प्रेम प्रदर्शन
पिंपरी चिंचवडमध्ये पाहण्यासारखी काही मोजकीच ठिकाणे आहेत, त्यापैकी बोटक्‍लबचा धबधबा सर्वांनाच आणि येथील परिसर विशेषतः पक्षीप्रेमींना नेहमीच आकर्षित करत असतो. आपल्या कुटुंबासोबत येथे येणाऱ्या नागरिकांना प्रेमी युगलाच्या ओंगळवाण्या प्रेम प्रदर्शनाचे दर्शन घडते. तक्रार करुनही हा प्रकार बंद होत नसल्याने स्थानिक नागरीक संताप व्यक्‍त करत आहेत. बोटक्‍लब आणि गार्डन प्रेमी युगलांचा अड्डा बनला आहे. या परिसराच्या आसतपास कित्येक महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळे प्रेमी युगलांना हा जवळचा आणि निवांत स्पॉट सापडला आहे. गार्डन व्यवस्थापन देखील वारंवार युगलांना समजावून वैतागले आहे. पोलिसांनी लक्ष घालावे, अशी ही मागणी होत आहे.

थेरगाव बोटक्‍लब येथील धबधबा लीकेज असल्याने सध्या बंद आहे. स्थापत्य विभागाला तशा सूचना दिल्या आहेत. लवकरच काम पूर्ण होऊन धबधबा सुरू होईल.
सुरेश साळुंके
मुख्य उद्यान अधिक्षक व वृक्ष अधिकारी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)