बोगस पुरंदर विद्यापीठाच्या संस्थापकाचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.के.कऱ्हाडे यांचा आदेश


खोट्या पदव्या देऊन अनेक विद्यार्थी, शासनाची फसवणूक प्रकरण

पुणे- बोगस पुरंदर विद्यापीठ सुरू करून खोट्या पदव्या देऊन अनेक विद्यार्थ्यांची आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणात संस्थापकाचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.के.कऱ्हाळे यांनी हा आदेश दिला आहे.
दादासाहेब गुलाबराव जगताप (वय 45, रा. सासवड) असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. याबाबत उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. विजय पांडुरंग नारखेडे यांनी सासवड पोलिसात फिर्याद दिली आहे. विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) आणि सरकारची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता पुरंदर विद्यापीठ सुरू करण्यात आल्याचे उघड झाले. उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने 8 मार्च 2018 रोजी अनधिकृत संस्था, अनधिकृत अभ्यास पाठ्यक्रम प्रतिबंधक कायद्यानुसार जगताप आणि त्याच्या सहकाऱ्यांना कथित शैक्षणिक संस्थेत चालवित असलेले अभ्यासक्रम, पाठ्यक्रम तात्काळ बंद करण्याचा आदेश दिला. त्यानंतर 9 मार्च 2018 रोजी जगताप आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सर्व अभ्यासक्रम बंद करत असल्याचे लेखी स्वरूपात दिले. यापुढे अशी कोणतीही चुक होणार नाही, असा उल्लेख या पत्रात आहे. त्यानंतर अनाधिकृत संस्था, अनाधिकृत पाठ्यक्रम प्रतिबंधक कायद्यानुसार शिक्षण सहसंचाकलांनी 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तो दंड अद्यापपर्यंत भरलेला नाही. अनाधिकृत विद्यापीठ, अभ्यासक्रम चालवून पैसे घेऊन खोट्या पदव्या देऊन जगताप याने अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणात याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. बोगस विद्यापीठ चालवून त्याने शासन, अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे. अनेक विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क स्वरूपात रक्कम स्वीकारली आहे. ती रक्कम कोठे आहे, याचा तपास करून जप्त करण्यसाठी, शिक्षण सहसंचालकांनी ठोठावलेला 5 लाख दंड त्याने अद्याप भरलेला नाही. नक्की किती विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे, याचा शोध घेण्यासाठी अटक करून पोलिसांनी त्याच्याकडे तपास करणे गरजेचे आहे. यासाठी त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळावा, असा युक्तीवाद ऍड. बोंबटकर यांनी केला. हा युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने जगताप याचा जामीन फेटाळला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)