बोगस पत्रकारांचा ग्रामीण भागात सुळसुळाट

नोंदणी नसलेल्या वेबसाइट, यू ट्यूब चॅनेलद्वारे पत्रकारिता

चाकण-पत्रकार, बातमीदार हा सर्वसामान्य जनतेची बाजू मांडणारा, भ्रष्ट राजकारणी आणि अधिकाऱ्यांची पोलखोल करणारा आणि समाजावरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा असतो, अशी सामान्य नागरिकांची भावना असते; मात्र काही भानगडबाज मंडळींनी पत्रकारितेची नावाखाली आपल्या तुंबड्या भरण्याचा घाट घातला आहे. सध्या जिल्ह्यातील काही ग्रामीण भागात खासगी वाहनांवर प्रेस लिहिलेले आणि ऑनलाइन मीडियाच्या नावाखाली कसलीही नोंदणी नसलेले काही स्वयंघोषित बोगस पत्रकार नागरिक आणि अधिकाऱ्यांमध्ये आपली छाप पाडण्यासाठी विविध उद्योग करीत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर प्रेस लिहून आम्ही ऑनलाइन मीडियाचे पत्रकार आहोत, असे प्रेस लिहिलेले ओळखपत्र घेऊन मोठ्या अविर्भावात फिरून नागरिकांसह शासकीय अधिकारी, राजकारणी मंडळी यांना त्रास देत असल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत.

दरम्यान, चाकण पोलिसांत अशाच एका बोगस पत्रकाराने चक्क खासगी रुग्णालयात आणि एका डॉक्‍टरच्या घरात शिरून ध्वनिचित्रफिती काढीत केलेल्या लाखो रुपयांच्या ब्लॅकमेलिंग प्रकरणी तक्रार नोंदविण्यात आली आहे. तत्पूर्वी आणखी एका प्रकरणात दोघांच्या वादातील समेट घडवून देण्याच्या नावाखाली एका बोगस पत्रकाराने लाखो रुपये उकळल्याचा प्रकारही समोर आला होता. याबाबत चाकण पोलिसांत तक्रार अर्ज देण्यात आला होता. ज्यांना पत्रकारितेबद्दल “ओ की ठो’ कळत नाही अशा काहींचा या क्षेत्राशी सुतरामही संबंध नाही अशा मंडळींनी पत्रकारितेच्या नावाखाली दुकानदारी सुरू केल्याचे आणि काही तथाकथित संघटनांशी सलगी करण्याचे प्रयत्न चालविल्याचे वास्तव चित्र दिसून येत आहे.

निवडणुकांच्या काळात तर या बोगस पत्रकारांचा सुळसुळाट खूपच मोठ्या प्रमाणात वाढला होता. ज्याप्रमाणे पावसाळ्यात कुत्र्यांच्या छत्र्या उगवतात, तसेच निवडणूक काळात बोगस पत्रकार पुन्हा एकदा उगवले आहेत. बोगस यू ट्यूब चॅनेलचे पत्रकार हे मोठ्या संख्येने निर्माण झाले आहेत. यू ट्यूब चॅनेलसाठी बातम्या करताना खूप मोठ्या प्रमाणावर पैसे उकळण्यात येत असल्याची चर्चा आहे. यू ट्यूब चॅनेलच्या क्षेत्रात नव्याने आलेले काही पत्रकार प्रलोभनाशिवाय काम करतात अशा मंडळीची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या एवढीच मर्यादित आहे. याशिवाय संकेतस्थळावर सामाजिक हिताच्या विषयांवर लिखाण करणारे आणि त्याचा सामाजिक हितासाठी प्रसार करणारेही आहेत. मात्र कोणत्याही वृत्तपत्रामध्ये काम न करणारे व केवळ संकेतस्थळांवर ‘लुटीचे अर्थशास्त्र’ राबविणारे बोगस पत्रकारही तयार झाले आहेत. वेगवेगळ्या संकेतस्थळ आणि ब्लॉगवर लिखाण करून सामान्य नागरिक, शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यावर आपला वचक राहावा म्हणून या बोगस पत्रकारांचा त्रास वाढला असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्या आहेत. अशा मंडळींचा अक्षरशः वैताग आल्याचे काही नागरिक, अधिकारी, राजकारणी सांगत आहेत. अशा मंडळींकडून काही जणांशी संधान साधून एखाद्याची ठरवून बदनामी करण्यासाठी “सुपारीबाज’ पत्रकारिताही उदयास आणली जात असून ती समाजासाठी मारक असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)