“बोगस ज्येष्ठांना’ एसटी लावणार चाप

सवलतीच्या पास योजनेतील “झोल’ थांबविण्यासाठी “स्मार्ट कार्ड’ देणार

– नाना साळुंके

पुणे – एसटी महामंडळाच्या वतीने दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी-विद्यार्थींनीसाठी देण्यात येणाऱ्या सवलतीच्या पास योजनेत मोठ्या प्रमाणात “झोल’ होत असल्याची बाब उघडकीस आली आहे. सवलतीच्या पाससाठी ज्येष्ठ नागरिकांचे वय 65 वर्षे बंधनकारक असतानाही चाळीशीतील बहुतांशी प्रवासी बनावट कागदपत्रांच्या आधारे या योजनेचा लाभ लाटत आहेत. त्यामुळे महामंडळाला वर्षाकाठी कोट्यावधी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.

ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या पाससाठी दिली जाणारे कार्डे अधिक “स्मार्ट’ करण्यासाठी महामंडळाने प्रयत्न सुरू केले असून या प्रवाशांना यापुढील कालावधीत “स्मार्ट कार्ड’ देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याची तातडीने अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे. ही स्मार्ट कार्ड थेट लाभार्थीच्या आधारकार्डाला जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे चोरी तत्काळ पकडणे शक्‍य होणार आहे.

राज्यभरातील ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात प्रवास करता यावा, वयाची 65 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांसाठी एसटी महामंडळाने पास योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार या प्रवाशांना प्रवासाच्या तिकिटात निम्म्याने सूट देण्यात येत आहे. त्यानुसार ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विद्यार्थी-विद्यार्थीनी या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. या योजनेचा लाभ घेणे शक्‍य व्हावे, यासाठी त्यांना पूर्वी ओळखपत्र बंधनकारक होते. मात्र, ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांना त्यासाठी लागणारी कागदपत्रे जमा करताना दमछाक करावी लागत असल्याने ही अट रद्द करण्यात आली होती. त्यामुळे ती शिथील करुन केवळ मतदान ओळखपत्रांच्या आधारावर ही सवलत देण्याचा निर्णय महामंडळाच्या वतीने घेण्यात आला होता.

मात्र, राज्यभरातील बहुतांशी नागरिकांच्या मतदान ओळखपत्रावर त्यांची वये ही चुकीची आणि जास्त लागली आहेत. हीच संधी साधून चाळिशीतले आणि पन्नाशीच्या आतील बहुतांशी प्रवासी या योजनेचा लाभ घेत असल्याचे उघडकीस आले होते. विशेष म्हणजे, काही महाभाग प्रवाशांनी तर एजंटांना हाताशी धरुन हवी तशी मतदान ओळखपत्रे तयार करुन घेतली होती. त्यातूनच या एजंटगिरीला चांगलेच पेव फुटले होते; त्याचा त्रास महामंडळाला आणि विशेषत: वाहकांना सहन करावा लागत होता. त्यामाध्यमातून महामंडळाला महिन्याकाठी किमान वीस ते पंचवीस कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत होता.
याची महामंडळाने गंभीर दखल घेतली आहे. त्यासाठी या ज्येष्ठ नागरिकांना तसेच दिव्यांग आणि विद्यार्थी-विद्यार्थीनींना यापुढील काळात ओळखपत्र नव्हे, तर “स्मार्ट कार्ड’ देण्यात येणार आहे. या स्मार्ट कार्डला थेट आधारकार्ड जोडण्यात येणार आहे. त्यामुळे या कार्डाच्या माध्यमातून संबधित प्रवाशाची कुंडलीच महामंडळाकडे तयार असणार आहे. या कुंडलीमुळे ज्या प्रवाशाची वयाची 65 वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांनाच या सवलत योजनेच्या माध्यमातून प्रवास करणे शक्‍य होणार आहे. परिणामी, यातील घोटाळा थांबला जाणार आहे, असेही महामंडळाने म्हटले आहे.

…आता थेट फौजदारी कारवाई
बनावट ओळखपत्रांचा सर्वाधिक त्रास हा वाहकांना सहन करावा लागत होता. ही ओळखपत्रे बनावट असल्याची माहिती असतानाही आणि प्रवास करणारा प्रवासी हा चाळिशीतला आहे, हे दिसत असतानाही या वाहकांना त्यांना सवलतीचा लाभ देणे बंधनकारक झाले होते. या प्रकारांमुळे अनेक वाहक त्रस्त झाले होते. त्याबाबत त्यांनी वरिष्ठांकडे तक्रारीही केल्या होत्या. त्याचीच दखल घेऊन ही “स्मार्ट कार्ड’ अंमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता तर अशा पद्धतीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगलीच चपराक बसणार आहे, कारण असे प्रवासी आढळल्यास त्यांच्यावर थेट फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

महामंडळाने नव्याने आणलेल्या “स्मार्ट कार्ड’ मुळे अशा प्रवाशांना लगाम घालणे शक्‍य होणार आहे. या प्रवाशांमुळे महामंडळाला वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागत होता. आता हा तोटा भरुन काढणे शक्‍य होणार आहे. त्याशिवाय खऱ्या लाभार्थींना त्याचा लाभ घेता येणार आहे.
– दिवाकर रावते, परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)