बोगस अहवालाद्वारे निधी लाटण्याला “चाप’

विद्यापीठात खास यंत्रणा : 20 टक्‍के महाविद्यालयांकडून असे प्रकार

– डॉ. राजू गुरव

पुणे – पुणे विभागातील तब्बल 20 टक्‍के वरिष्ठ महाविद्यालये राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) कार्यक्रम व्यवस्थीत राबवित नाहीत. कार्यक्रमांची प्रत्यक्षात अंमलबजावणी न करता बोगस अहवाल सादर करून ही महाविद्यालये निधी लाटण्याचेच एककलमी कार्य करत असतात. आता या प्रकाराला चालू वर्षात “चाप’ बसविण्यासाठी विद्यापीठाकडून खास यंत्रणाच उभारण्यात येणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत पुणे, अहमदनगर, नाशिक या विभागांतील वरिष्ठ महाविद्यालयांचा समावेश करण्यात येतो. अनुदानित 167 तर विनाअनुदानित 314 अशा एकूण 481 महाविद्यालयांना विद्यापीठांने राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे युनिट चालू ठेवण्यासाठी मान्यता दिलेली आहे. एप्रिल 2016 पासून “एनएसएस’ ही केंद्र शासीत योजना झाली असून यासाठी केंद्राकडून महाविद्यालयांना शंभर टक्‍के निधी देण्यात येत असतो. यासाठी नियमित कार्यक्रम व विशेष शिबीर कार्यक्रम असे दोन टप्पे करण्यात आले आहेत. यातील नियमित कार्यक्रमांसाठी प्रती विद्यार्थी 250 रुपये तर विशेष शिबिरांसाठी प्रती विद्यार्थी 450 रुपये याप्रमाणे निधी दरवर्षी वाटप करण्यात येतो. 2010-11 या वर्षापासून निधीचे हे सुधारित दर लागू करण्यात आले आहेत.

या योजनेसाठी पुणे विद्यापीठाच्या कार्यकक्षेतील महाविद्यालयांमधील 47 हजार 600 विद्यार्थ्यांना शासनाकडून थेट निधी येतो. तसेच विद्यापीठाकडून 10 हजार विद्यार्थ्यांचा निधी वाटप केला जातो. याप्रमाणे एकूण 57 हजार 600 विद्यार्थ्यांचा निधी महाविद्यालयांना दिला जातो.

विद्यापीठाकडून महाविद्यालयांना नियमित व विशेष शिबिरासाठीचा कार्यक्रम राबविण्याबाबतचा आराखडा दरवर्षी देण्यात येतो. मात्र बहुसंख्य महाविद्यालयांकडून योजनेचे कार्यक्रमच प्रत्यक्षात नीट राबविण्यात येत नसल्याचे आढळून येते. कार्यक्रम न राबविता घेतल्याचा दिखावा करून अहवाल महाविद्यालयांकडून तयार केले जातात. यात विविध खर्चांची बिले, विद्यार्थ्यांचे उपस्थिती पत्रक, मानधन बिले व इतर अहवाल आदींचा समावेश असतो. याचा लेखा परीक्षण अहवालही तयार केला जातो. विद्यापीठाकडून त्या अहवालांना मंजूरी देऊन महाविद्यालयांना निधीही अदा केला जातो. केवळ निधी मिळविण्यातच महाविद्यालये मग्न असल्याचे चित्रही अनेकदा स्पष्ट पहायला मिळते.

2016 मध्ये योजनेचे कार्यक्रम राबविण्यात बोगसपणा करणाऱ्या पाच महाविद्यालयांचे “एनएसएस’चे युनिट बंद करण्याची कारवाई विद्यापीठाकडून करण्यात आली होती. यात नाशिकमधील दोन, अहमदनगरमधील दोन, पुण्यातील एका महाविद्यालयाचा समावेश होता. बोगसपणा करणाऱ्या महाविद्यालयांची संख्याही वाढू लागली आहे. चालू शैक्षणिक वर्षातही खोटे अहवाल खरे दाखवून निधी लाटणाऱ्या महाविद्यालयांना आता लगाम घालण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती विद्यापीठातून मिळाली आहे.

कठोर कारवाई करणार
विविध महाविद्यालयांच्या “एनएसएस’च्या कार्यक्रमांना आता अधिकारी, पदाधिकाऱ्यांचे खास तपासणी पथकच अचानक भेटी देणार आहे. यात कुलगुरु, प्र-कुलगुरु, कुलसचिव, सहायक कुलसचिव, उपकुलसचिव, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, सिनेट सदस्य आदींचा समावेश असणार आहे. जिल्हा समन्वयकांवरही दुसऱ्या जिल्ह्यांची जबाबदारी देऊन विभाग समन्वयकांवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. लेखा परीक्षण अहवालाचीही कसून तपासणी करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. बोगसपणा करणाऱ्या व तपासणीत दोषी आढळणाऱ्या महाविद्यालयांतील “एनएसएस’चे युनिट कायमस्वरुपी बंद करण्याची कठोर कारवाई करण्यासाठी विशेष यंत्रणाच यंदा राबविण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठातील अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)