बोगस अर्ज प्रक्रियेविरोधात फिर्याद दाखल करणार : आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड, दि. 24 (प्रतिनिधी) -राजकीय हितशत्रूंनी निवडणूक आयोगाच्या ऑनलाईन पद्धतीचा गैरवापर करून मलकापूरातील काँगे्रसच्या संभाव्य उमेदवारांची व मतदारांची नावे वगळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संगणकाचा गैरवापर करून नागरीकांच्या मतदानाचा हक्क हिरावून घेणार्‍या प्रवृत्ती विरोधात लोकप्रतिनिधी या नात्याने मी स्वत: पोलीस ठाण्यात फिर्याद देणार आहे. तसेच सोमवारी अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित करणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
येथील पाटण कॉलनीतील निवासस्थानी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कॉग्रेसचे कराड दक्षिण तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, शहराध्यक्ष राजेंद्र उर्फ आप्पा माने, सौ. मनिषा चांदे, राजेंद्र यादव, दिग्विजय शिंदे उपस्थित होते. आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राष्ट्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादीमध्ये नावे समाविष्ट करण्याबाबत व वगळण्याबाबत ऑनलाईन सुरूवात केली आहे. नागरीकांना एनव्हीएसपी या संकेतस्थळावर जावून आपला अर्ज दाखल करता येतो. नागरीकांच्या सोयीसाठी निवडणूक आयोगाने ऑनलाईन पद्धत सुरू केली आहे. मात्र कराड दक्षिणमधील विशेषतः मलकापूरमधील नागरिकांची नावे वगळण्याबाबत ज्यांचा काही संबध नाही. त्यांनी संकेतस्थळावरून अर्ज केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुमारे 1 हजारहून अधिक नावे कमी करण्याचे अर्ज दाखल झाले असल्याची माहिती मिळत आहे. मलकापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत कॉग्रेसला अडचणीत आणण्यासाठी काही राजकीय हितशत्रूंनी खोटया पद्धतीने बनावट नाव वापरून अर्ज केले आहेत. ज्या कोणी ऑनलाईन अर्ज केले आहेत. त्यांनी कोणत्या संगणकाचा वापर केला आहे. याची माहिती मिळू शकणार आहे. राजकीय हेतूने प्रेरित होवून हेतू पुरस्पर हे अर्ज केले गेेले आहेत. निवडणूक आयोगाने अशा बनावट दाखल झालेल्या अर्जासंबधी संगणकाचा आयपी अ‍ॅड्रेस शोधून गुन्हा दाखल केला पाहिजे. ज्या कोणी याचा गैरफायदा केला आहे. त्यांचा बोलवता धनी कोण आहे, याचीही सखोल चौकशी व्हावी. या प्रकरणी सोमवारी अधिवेशनात हा मुद्दा आपण उपस्थित करणार असल्याचे सुतोवाच आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
मतदारांची नावे वगळण्याचा प्रकार हा लोकशाहीसाठी घातक आहे. तंत्रज्ञानाचा गैरवापर करून सत्ता जिंकण्यासाठी जर असा प्रकार होत असेल तर ही गंभीर बाब आहे. हा प्रश्न एकटया कराड पुरता मर्यादित नाही तर राज्यात सुमारे 10 लाखांहून अधिक नावे मतदार यादीतून कमी झाली आहेत. याचाही शोध घेणे गरजेचे आहे. मलकापूरातील कॉग्रेस संभाव्य उमेदवारांची नावे वगळण्याचा व नागरीकांच्या मतदानाचा हक्क हिरावून घेण्याचा ज्यांनी कोणी घाट बांधला आहे. त्यांच्यावर कायदेशीर मार्गाने गुन्हा दाखल करणार असल्याचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)