बोंडारवाडी प्रश्‍न चघळला जाणार की निकालात निघणार?

जावली राजकीय वार्तापत्र भाग -2
प्रसाद शेटे
मेढा, दि. 24 – निवडणुकी तोंडावर आल्या की राजकारण्यांना विकासकामांच्या आश्वासनांचा पेव फुटतो. मग जाहीरनाम्यात दरवर्षी तेच प्रश्न, तीच आश्वासन यांचीच भर असते. जावळी तालुक्‍यातील महत्वाकांक्षी आणि बहुचर्चित बोंडारवाडी धरण प्रकल्प हासुद्धा त्यातलाच भाग असून अनेक वर्ष प्रलंबित असलेला हा प्रश्न अनेक मातब्बर नेते मंडळींनी बोंडारवाडी धरण हे केवळ निवडणुका आणि जाहीरनाम्यापुरते मर्यादित ठेवले आहे. मेढा विभागासाठी 54 गावासाठी बोंडारवाडी धरण हा महत्वाचा प्रश्न आहे.
गेल्या अनेक वर्षापासून बोंडारवाडी धरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी खर तर धरण कृती समितीचा मोठा लढा आहे. बोंडारवाडी धरण कृती समितीचा लोकशाही मार्गाने पाठपुरावा सुरू होता धरणासाठी कृती समिती शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करीत होती. मे महिन्याच्या दरम्यान कृती समितीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे जाहीर केले होते. मात्र जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी एक महिन्यात प्रशासकीय मान्यता देणार असल्याचे आश्वासन दिल्याने मोर्चा स्थगित केला होता. केळघर विभागात पावसाळ्यात सगळ्यात जास्त प्रमाणत पाऊस पडतो, उन्हाळ्यात मात्र अनेक गावात पाणी टंचाईची भीषणता जाणवते. या विभागात तीव्र उतारामुळे पाणी साठून राहत नाही. त्यामुळे या विभागातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी बोंडारवाडी धरणा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी आवश्‍यक असल्याने खासदार उदयनराजेंनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर हा मुद्दा लावून धरत गेल्या आठवड्यात बोंडारवाडी प्रकल्प जागेची पहाणी केली होती.
यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनीसुद्धा या प्रश्नावर आवाज उठवला होता. धरण प्रकल्पाला तत्काळ मंजुरी देऊन धरणाच्या कामासाठी निधी मंजूर करावा, या मागणीसाठी आमदारांनी गेल्या महिन्यात राज्यसरकार विरोधात शड्डू ठोकला. या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आ. शिवेंद्रराजे यांनी लक्षवेधी वेशभूषा करून विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर अनोखे आंदोलन केले होते व सरकारने मागण्या तातडीने मान्य कराव्यात अन्यथा उरमोडी आणि कण्हेर धरणातील पाणी खाली जाऊ देणार नाही, असा सज्जड इशाराही शिवेंद्रराजे यांनी राज्य सरकारला दिला होता. परंतु, धरणाचा मुद्दा केवळ निवडणुकापुरताच मर्यादित आहे का? असा प्रश्न सामन्य नागरिकांना पडत आहे. आमदार साहेबांनी आघाडीच्या काळात सुद्धा फक्त एकदाच अजित पवारांसोबत बैठक घेऊन हा मुद्दा तात्पुरता ऐरणीवर आणला होता. परंतु त्या काळात आमदार साहेबांना बोंडारवाडी धरणाचा मुद्दा साधा पाटबंधारे खात्यातूनही बाहेर काढता आला न्हवता असा आरोपही कृती समितीच्या काही सदस्यांनी केला होता. लोकप्रतिनीधीना जर निवडणुकीपुरते धरणाचे मुद्दे काढून श्रेय लाटायचे असेल तर त्यांनी महू-हातगेघर धरणाचे अपयश पचवायचीसुद्धा लोकप्रतिनिधींनी तयारी ठेवावी अशा प्रतिक्रिया सर्वसामन्यांतून उमटत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)