बोंडअळी नुकसानीपोटी राहुरीला 13 कोटी मिळणार

राहुरी- बोंडअळीमुळे कपाशीच्या झालेल्या नुकसान भरपाईपोटी तालुक्‍याला 13 कोटी 3 लाख रुपये मिळणार आहेत. 2017-18 या चालू खरीप हंगामातील नुकसानीची ही भरपाई असल्याचे कृषी विभागाने सांगितले. बोंडअळीमुळे कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. उसाखालोखाल नगदी पीक म्हणून समजल्या जाणाऱ्या कपाशी पिकाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी असलेला घास हिरावला. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

शासकीय नियमानुसार 33 टक्‍क्‍यांच्यावर नुकसान झालेल्या पिकांचे संयुक्‍त पंचनामे शासकीय पातळीवरून करण्यात आले होते. शासनाने जाहीर केलेल्या प्रतिहेक्‍टरी 13 हजार 500 नुकसान भरपाईपोटी तालुक्‍याला रक्कम मिळणार आहे.

तालुक्‍यात 10 हजार 222 हेक्‍टर क्षेत्रावरील कपाशी पीक बोंडअळीने बाधित झाले होते. राज्य शासनाच्या निकषानुसार 33 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान असलेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार तालुक्‍यातील 15 हजार 407 शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे कृषी, महसूल व ग्रामसेवक यांच्या पथकामार्फत करण्यात आले होते. पंचनाम्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता. शासनाने पंचनामे व त्यावर देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईसाठी 23 फेब्रुवारी 2018 च्या पीककापणी प्रयोगाचा आधार घेतला होता. त्यात अनेक प्रकारच्या जाचक अटी असल्याने हे निकष पूर्ण करण्यासाठी शेतकरी हैराण झाले होते. हे निकष बदलण्यासाठी शेतकऱ्यांकडून वेळोवेळी मागण्या होत होत्या. शेतकरी मोर्चानंतर यात नवीन सुधारणा करण्यात आली. त्यानुसार तालुक्‍यातील शेतकरी या नुकसान भरपाईसाठी पात्र ठरले आहेत. तालुक्‍यातील 15 हजार 407 शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्यात आले होते. त्यातील 9 हजार 652 शेतकरी या नुकसान भरपाईसाठी पात्र ठरले आहेत. प्रतिहेक्‍टरी 13 हजार 500 रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)