बॉर्डर… 

– धनंजय  
स्थळ – भारत-चीन बॉर्डर वेळ- चहा व पोहे घेण्याची
राजा विक्रम प्रसन्न मनाने आपल्या विमानात जाऊन बसला, सारे व्यवस्थित घेतले की नाही हे पाहिले, सीट बेल्ट बांधला व मनातल्या मनात नामस्मरण करून टेक ऑफसाठी तयार झाला.विमानही क्षणात झेपावले. राजा कुतुहलाने खिडकीबाहेर बघायला लागला.काही क्षणातचं एका भूभागावर दोन देशाचे झेंडे दिसले तसा राजा चपापला. राजाचा राग अनावर झाला पण लगेच रागावर नियंत्रण ठेवले (चिनी सैनिकांनी डोकलामवर नियंत्रण ठेवले तसे ) जिनपिंग या आपल्या बालमित्राचे स्मरण केले व सखा आठवताच रागाची जागा वात्सल्याने घेतली, व राजा गालातल्या गालात हसू लागला. राजा हसतो आहे हे दिसताच वेताळ खिडकीतून आत शिरला व शेजारी विराजमान झाला.
‘ये वेताळा, आता राजधानी येईपर्यंत तुझीच मला साथ आहे. तोवर तुला सहन करतो मी, विचार काय विचारायचे आहे.’

‘राजा, बरा आहेस ना? आज एकदम मुड मध्ये?’
‘वेताळा, माझा मुड चांगला ठेवायचा की नाही हे सर्वस्व तुझ्यावर अवलंबून आहे बरं. माझी मन की बात ऐकायची तयारी असेल तर मी मुड चांगला ठेवेन, डोकलामवर प्रश्‍न विचारलास तर तुझे काही खरे नाही हं .’
‘ओके, प्रयत्न करतो. राजा, निवडणुका कर्नाटकात आणि तू चीनमध्ये असे का ? हा प्रचाराचा कुठला नवा फंडा ?तू काढता पाय घेतो आहेस? की कॉंग्रेसची तुला दया आली व एखादे राज्य तरी राहुलला राहू द्यावे हा उदात्त हेतू की जिनपिंगला वॉर्निंग द्यायला की कर्नाटकनंतर चीन पुढले टार्गेट ? हा हा हा !’
‘ वेताळा, तुझा आय क्‍यू बिघडला आहे, स्वतःच्या जोकवर हसलास ना की तू हवा येऊ द्या मालिकेत काम करणारा वाटतोस. अरे वेताळा, मला वैश्‍विक नेत्याचा मान मिळाला आहे.म्हणजेच मी कृष्ण, कृष्णाचा अवतार मी. केवळ कर्नाटकची चिंता करून कसे चालेल मला ? चीनमधील सुदाम्याचे कसे चालले आहे, तो संकटात तर नाही ना, त्याला काय हवं नको हे नको का
बघायला ?’

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘आहाहा हा ! राजा तुझा हा आत्मविश्‍वासच मला खूप भावतो. अरे सुदाम्याला काय हवे असेल ते मिळण्यासाठी तो समर्थ आहे, बघितले नाही डोकलाममध्ये ….? ” वेताळ जीभ चावतो, तसा राजा लालबुंद होतो.
‘बरं ते जाऊ दे राजा , तू कृष्ण व तो सुदामा तर मग तो तुझ्याकडे यायला हवा ना, पुराणात त्याचे दाखले मिळतात. मग इथे नेमके उलटं का ?’
‘ वेताळा, ट्रेंड बदलणारा राजा आहे मी. मी नवा इतिहास लिहितो, मी फॅशन बदलतो. जुन्या गोष्टी मोडीत काढून नव्या गोष्टी करायची हौसच आहे मला ‘
‘राजा, खोड म्हणतात याला, सवयीचा अतिरेक म्हणजे खोड. बरं प्रयोजन काय? काय मिळवले ? काय गमावले सांगशील? ‘
‘ हे बघ, तो माझा बालमित्र आहे, आम्ही हिमालयात सोबत खेळलो, बागडलो, लपाछपी, लगोर, विटी दांडू, आट्यापाट्या हे सारे खेळलो. त्याला म्हणालो, मी राजा आहे , विश्‍वगुरू आहे, तुला काय हवे नको ते माग. शांतता, बंधुभाव, मैत्री …….’
‘ मग डोकलाम मागितले राजा ?’
‘खामोश, मला डिवचतोस? ‘
‘राजा, पण मला सांग की, ‘वाद’ पासून तर ‘वादा रहा’पर्यंतचा हा प्रवास रंजकच ना ? आणि पोह्यांऐवजी चहा ?’
‘चहाचे विश्‍वभर ब्रॅंडिंग करायचे ठरवलेय मी आणि वेताळा, सावध आता, लॅंडिंग होते आहे बरं. बांधलेला सीटबेल्ट सोडेपर्यंत तू दिसेनासा हो अन्यथा परिणामांना सामोरे जा.’
राजा विक्रमाचा पारा चढला आहे हे लक्षात येताच वेताळ सीटवरून उठतो व एक गिरकी घेऊन खिडकीबाहेर दिसेनासा होतो .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)