बैलांची वाजत-गाजत मिरवणूक

निगडी – शेतात प्रचंड कष्ट करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्‍त करणारा सण बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरीकरणात शेत नांगरणारे बैल आता दिसेनासे झाले आहेत. परंतु अद्यापही काही शेतकऱ्यांनी आपले बैल आणि आपली परंपरा अजूनही जतन करून ठेवली आहे. निगडी गावठाण येथील भानुदास काळभोर यांनी बैलपोळ्यानिमित्त बैलांना अतिशय आकर्षक सजवले व बैलजोडीची येथील माता अमृतानंदमयी मठापासून निगडी गावठाणापर्यंत वाजत-गाजत मिरवणूक काढली. मिरवणुकीनंतर कुटुंबातील महिलांनी बैल जोडीचे पूजन केले. पुरण-पोळीचा नैवेद्य व धान्य बैलांना खाऊ घातले. काळभोर कुटुंबीय व परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

तळवडे येथे बैलपोळा उत्साहात
निगडी – सध्या तळवडेगाव शहराचा भाग बनला असून येथे शेतीचे प्रमाण कमी झाले आहे. परिसरात मोठ-मोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे शेतीक्षेत्र कमी झाले आहे. तसेच शेतीशी निगडीत जनावरांचे प्रमाणही घटले आहे. तरीही काही शेतीकरी मात्र अजूनही पारंपरिक शेती व्यवसाय टिकवून आहेत. तसेच शेतीशी निगडीत असलेले सण-उत्सव मोठ्या उत्साहाने करत आहेत.

-Ads-

वर्षभर मालकांसोबत शेतात राबून काबाडकष्ट करणाऱ्या बैलाचे कौतुक तसेच लाड करण्याचा दिवस म्हणजे बैलपोळा हा सण. भाद्रपद आमावास्येच्या दिवशी बळीराजा आणि बैल यांच्या प्रेमाचे प्रतीक असा बैलपोळा साजरा केला जातो. बैलांना सकाळपासूनच नित्याच्या दैनंदिन कामापासून आराम देण्यात आला. बैलांना नदीवर, ओढ्यात नेऊन आंघोळ घालण्यात आली, बैलाच्या खांद्याची हळद व तुपाने मालिश करण्यात आली, तसेच सर्वांगावर गेरुचे तसेच विविध रंगाचे ठिपक देणे, शिंगांना बेगड, सोनेरी लावणे तसेच डोक्‍याला बाशिंग बांधणे, पाठीवर नक्षिकाम केलेली झुल चढवणे, गळ्यात कवड्याच्या व घुंगुरांच्या माळा बांधणे, नवी वेसण, नवा कासरा, पायात करदोड्याचे तोडे बांधून बैलांना सजवण्यात आले होते.
सायंकाळच्या सुमारास सजवलेल्या देखण्या बैलांची वाजंत्र्यांच्या ताफ्यात सनई, ढोल, ताशे, डफ, हलगी यासारख्या पारंपारिक वाद्यांच्या आवाजाच्या तालावर बैलांची मिरवणूक काढून ग्राम प्रदक्षिणा करण्यात आली. तळवडे गावठाणात असलेल्या मंदिरासमोर बैलांना उभे करुन देवदर्शन करवले गेले. बैलांना उदंड आयुष्य लाभू दे, शेतीत भरघोस पीक येऊ दे, असे साकडे ग्रामदैवताला यावेळी घालण्यात आले. त्यानंतर घरी आलेल्या बैलांची गृहलक्ष्मीने दृष्ट काढून बैलांना गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य भरवला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)