बैठकीला दांडी अन्‌ पाण्याच्या नावाखाली रास्तारोकोचे ढोंग

डिकसळ- कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत दांडी मारायची अन्‌ येथे पाण्याच्या नावाखाली रास्तारोको करायचा हा कसला प्रकार हा तर ढोंगीपणा असल्याचे शरसंधान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर नाव न घेता केला.
डाळज नं. 2 (ता. इंदापूर) येथे विविध विकासकामांचे उद्‌घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार दत्तात्रेय भरणे, डी. एन. जगताप, प्रताप पाटील, प्रवीण माने, आप्पासाहेब जगदाळे, जि. प. सदस्य हनुमंत बंडगर, अभिजीत तांबिले, महारुद्र पाटील, सरपंच ऍड. प्रदीप जगताप, अनिल भोसले, सुभाष जगताप, मनोहर हगारे, धनाजी थोरात, कुंभारगांवच्या सरपंच जयश्री धुमाळ यांच्यासह परिसरातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, पाण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर बसून काय उपयोग? दत्तात्रेय भरणे इंदापूरच्या पाण्याच्या नियोजनाच्या कालवा सल्लागार समितीत किती भांडत होता समितीच्या बैठकीत येवून भांडले पाहिजे आपल्या पदरात पाडून घेतले पाहिजे हे त्यांना कळायला पाहिजे. सध्याचे भाजपाच्या सरकारच्या काळात महागाई वाढली आहे. इंधनाचे दर गगनाला भिडले आहे. आई-बहिणींवर अन्याय अत्याच्यार, शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही, राज्यात शिक्षकांच्या लाखो जागा रिक्‍त आहेत, आरोग्याच्यापण अनेक समस्या भेडसावत आहेत. वीजेचा तुटवडा आहे, रुपयांचे मोठ्याप्रमाणावर अवमूल्यन झाले आहे, आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. पाच वर्षांच्या काळात पाच लाख कोटी कर्ज आत्ताच्या सरकारने राज्यावर करून ठेवले आहे. बुलेट ट्रेन सव्वा लाख कोटींची, समृद्धी मार्ग, राफेल विमान खरेदीत भ्रष्टाचार, हजारो कोटीचे कर्ज बुडवून विजय मल्ल्या, नीरव मोदी, चोक्‍सी पळून गेले. सत्ता मिळेल या आशेने काहीही गोष्टी या सरकारने मान्य केल्या, त्यामुळे आत्ता त्यांना अनेक आश्‍वासनांची पूर्तता करणे कठीण होत आहे. टॅंकर मुक्‍त महाराष्ट्र, जलयुक्त शिवार, या झाल्यात का? असा सवाल करीत हे सरकार शेतकरी विरोधात व उद्योगधार्जिणे आहेत अशी टीका पवार यांनी यावेळी केली.

  • मंत्री मी होते मग पाणी तुम्ही देत होता का?
    “आमच्या काळात किती पाणी मिळायचे’ या हर्षवर्धन पाटलांच्या वक्‍तव्याचा समाचार घेताना अजित पवार म्हणाले की, अजित पवार जलसंपदा खात्याचा मंत्री होते, त्यावेळी तुम्ही पाणी देत होता का? याला म्हणतात “आईजीच्या जीवावर बाईजी उदार’. वारे पट्टया ज्याने काम केले त्याला श्रेय द्यायला शिका अशी खरमरीत टीका यावेळी पवार यांनी पाटील यांच्यावर केली. आपल्यामुळे इंदापूरला पाण्याची अडचण नव्हती. मात्र, आत्ताच्या सरकारचे योग्य नियोजन नाही, पालकमंत्र्याचे लक्ष नाही यामुळे इंदापूर तालुक्‍यात पाणी वाटपाचा खेळखंडोबा झाला असल्याचा आरोप त्यांनी केला.
  • नुसत्या इमारती नको दर्जेदार शिक्षण हवे
    डाळज येथील शाळांच्या नुसत्या इमारती असून चालणार नाहीत तर त्यामध्ये दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे ही आमची भूमिका आहे. विकासकामे दर्जेदार झाली पाहिजेत अशा सूचना कंत्राटदारांना दिल्या आहेत. गावातील अतिक्रमणांच्या विषयाबाबत बोलताना सामजस्याने काम केले पाहिजे स्वाइन फ्ल्यूच्या साथीच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभाग, ग्रामपंचायतीने सतर्क राहण्याचा सल्ला अजित पवार यांनी दिला.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)