‘बैठकांना उपस्थित रहा, अन्यथा कारवाईला सामोरे जा’

पुणे – वारंवार सूचना देऊनही महापालिकेचे विभागप्रमुख विशेष समित्यांना उपस्थित राहत नाहीत. तसेच प्रशासनाच्या निषेधार्थ सभा तहकूब करतात, ही बाब प्रशासकीय कामकाजासाठी योग्य बाब नसल्याने या पुढे विशेष समित्यांना अनुपस्थित राहणाऱ्या विभाग प्रमुख अथवा त्यांनी नियुक्त केलेल्या दुय्यम अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे आदेश महापालिका आयुक्तांनी शुक्रवारी दिली आहे.

शुक्रवारी झालेल्या शहर सुधारणा समितीच्या बैठकीस अधिकारी उपस्थित नसल्याने, शहर सुधारणा समिती अध्यक्ष सुशील मेंगडे यांनी महापालिका आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली. त्याची गंभीर दखल घेत आयुक्तांनी हे आदेश तातडीने काढले आहेत. महापालिकेच्या विशेष समित्यांमध्ये महिला आणि बालकल्याण समिती, शहर सुधारणा समिती, विधी समिती, क्रीडा समिती तसेच नाव समितीचा समावेश आहे. या समित्यांच्या बैठका 15 दिवसातून एकदा होतात. या बैठकांमध्ये शहरातील वेगवेगळ्या धोरणांचे विषय असतात. तसेच सभासदांचे प्रस्ताव असतात, अनेकदा सभासदांना या प्रस्तावांची माहिती हवी असते. मात्र, अधिकारीच या बैठकांना उपस्थित राहत नसल्याने नगरसेवकांना माहिती मिळत नाही. परिणामी या समित्यांच्या बैठकांमध्ये अधिकारी येत नसल्याने प्रशासनाच्या निषेधार्थ सभा तहकूब करून ठराव करतात. त्यामुळे प्रशासनावर नामुष्कीची वेळ येते. त्यामुळे या प्रकाराची गंभीर दखल घेऊन महापालिका आयुक्तांनी थेट कार्यालयीन आदेश काढूनच अधिकाऱ्यांना शिस्तभंगाची कारवाई करण्याचा सज्जड दम भरला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)