“बेस्ट सिटी’ची “वेस्ट सिटी’कडे वाटचाल

पिंपरी – मेट्रोमुळे शहरातील बीआरटीएसचा खेळखंडोबा झाला आहे. तर कचरा उचलणारे ठेकेदार कामगार कायद्यांचे पालन न करता प्रशासनाला वाकुल्या दाखवत आहेत. याशिवाय करदात्यांच्या पैशातून अव्वाच्या-सव्वा दराने बोऱ्हाडेवाडीतील गृहप्रकल्पाला भाजपने मंजुरी दिली आहे. त्यामुळे एकेकाळी “बेस्ट सिटी’ असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराचे “वेस्ट सिटी’कडे वाटचाल करत असल्याची तक्रार विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आयुक्तांकडे केली आहे. याप्रकरणी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

निगडी ते दापोडी या बी.आर.टी. मार्गावरील त्रुटी दूर करुन तो लवकरात लवकर कार्यान्वयीत करावा, असे उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. त्या अनुषंगाने बी.आर.टी. मार्गातील त्रुटी दूर करुन या मार्गावर वाहतूक सुरु करण्याचे प्रयत्न सुरु असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते मोरवाडी चौक येथे अचानक बॅरीकेटस्‌ लावून बी.आर.टी.च्या मार्गात मेट्रोचे काम सुरु करण्यात आले आहे. यापूर्वीच बी.आर.टी. कॉरिडॉरमध्ये मेट्रोचे काम करु नये, असे आदेश महापालिका प्रशासनाने मेट्रोला दिले असतानाही मेट्रोने बिनधास्तपणे बी.आर.टी. मार्गामध्ये काम चालू केले आहे. हा प्रकार नियोजन शून्य व ढिसाळ कारभाराचे दर्शन आहे. त्यामुळे नव्याने सुरु केलेले खोदकाम त्वरित थांबविण्याची मागणी साने यांनी केली आहे.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बोऱ्हाडेवाडी येथील गृहप्रकल्पाचा दर प्रति चौरस फूट 2500 रुपये, रावेत येथील गृह प्रकल्पाचा दर प्रति चौरस फूट 2799 रुपये, तर चऱ्होली येथील गृह प्रकल्पासाठी प्रति चौरस फूट 2846 रुपये मंजूर करण्यात आला आहे. वास्तविक पाहता पिंपरी-चिंचवड शहरात बांधकामाचा बाजारभावाप्रमाणे प्रतिचौरस फूटाचा भाव 1200 ते 1400 रुपये आहे. या दरामध्ये शहरात सर्वोत्तम बांधकाम होऊ शकते. मात्र या तीनही ठिकाणच्या गृहप्रकल्पांसाठी अव्वाच्या सव्वा असून यामध्ये कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराची शक्‍यता आहे. त्यामुळे या तीनही गृहप्रकल्पांच्या निविदा रद्द करण्याची मागणी केली आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यकाळात पिंपरी-चिंचवड शहराला स्वच्छतेचा “बेस्ट सिटी’ पुरस्कार मिळाला होता. परंतु, भाजपाच्या काळात झालेल्या दुर्लक्षामुळे या शहराची स्वच्छतेबाबत 43 क्रमांकावर घसरगुंडी झाली आहे. भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे शहरात सर्वत्र कचऱ्यांचे ढीग साचले आहेत. त्यामुळे कचऱ्याची समस्या बिकट होत चालली आहे. गेल्या वर्षी नियुक्त केलेल्या कचरा उचलणाऱ्या ठेकेदारांनी कामगारांचे चार महिन्यांचे वेतन थकविले आहे.

महापालिका कामगार कायद्यानुसार वेतन दिले जात असतानाही ठेकेदार कामगारांचे एटीएम कार्ड व पासबुक स्वत:कडे ठेवून, महिन्याला सात ते आठ हजारावर त्यांची बोळवण करत आहेत. कामगाराचा भविष्यनिर्वाह निधीही भरला जात नाही. एखादा दिवस कामगार कामावर गेला नाही तर भरमसाठ दंड करुन वेतनातून तो कपात केला जातो. त्यांना सुरक्षिततेची साधने बूट, ग्लोज हे वेळेवर पुरविले जात नाही, पुरविले तरी त्याचे पैसे कामगाराच्या वेतनातून कपात केले जातात. भर पावसात त्या गरीब महिला कामगार महापालिका भवनासमोर आंदोलन करीत आहेत. हे सर्व ठेकेदार भाजपाच्या पदाधिकाऱ्यांशी संबंधित आहेत. त्यामुळे सफाई कामगारानी आंदोलन मोडीत काढले जाते, असा आरोप साने यांनी केला.

“वेस्ट टू एनर्जी’ मलई खाण्यासाठी!
महापालिकेने “वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प मलई खाण्यासाठी मंजूर केल्याचा घाणाघात विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आहे. शहरात ठिकठिकाणी कचरा वेळेवर उचलला जात नसल्यामुळे साथीच्या आजारांनी नागरीक त्रस्त झाले आहेत. स्वाईन फ्लू, डेंग्यूचे रुग्ण शहरात आढळले असून सत्ताधारी मात्र याकडे कानाडोळा करत आहेत. येत्या पंधरा दिवसांत सत्ताधारी भाजपाने कचऱ्याबाबतच्या उपाययोजना न केल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा साने यांनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)