बेशिस्त बसचालकांची होणार झाडाझडती

राज्यभर तपासणी मोहीम : दोषींचे होणार निलंबन

पुणे – मद्यप्राशन करून बस चालविणे, गुटखा अथवा तंबाखू केबिनमध्येच थुंकणे, मोबाइलवर बोलणे, हेडफोन लावणे वाहकांशी गप्पा मारणे आता बसचालकांना चांगलेच महागात पडणार आहे. अशा चालकांवर नजर ठेवण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे, अशा चालकांना चाप लावण्यासाठी राज्यभर तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
साध्या वेषातील अधिकारी एसटी बसमध्ये बसून चालक आणि वाहकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणार आहेत. संबंधित चालकांनी कर्तव्यावर असताना गैरप्रकार केल्यास त्यांचे निलबंन करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला असून त्यासंबंधीचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काही महिन्यांपूर्वी पुणे ते कोल्हापूर प्रवासादरम्यान रात्रीच्या सुमारास शिवशाही बसने प्रवास करताना संबधित बसचा चालक वारंवार मोबाइलवर बोलत असताना एका प्रवाशाच्या निदर्शनास आले होते. त्याची गंभीर दखल घेऊन या प्रवाशाने थेट राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी संपर्क साधून त्यांना हा प्रकार सांगितला होता. रावते यांनी तातडीने संबंधित विभाग नियंत्रकाशी संपर्क साधून कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर असे प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांना रावते यांनीच दिले होते.

त्यानुसार महामंडळाच्या वतीने अशा प्रकारची कारवाई सुरू करण्यात आली असून येत्या 19 जानेवारीपर्यंत ही कारवाई सुरू राहणार आहे. त्याशिवाय या कारवाईत सातत्य राहवे, यासाठी अचानकपणे ही कारवाई सुरू राहणार आहे. एकाचवेळी आणि एकाच दिवशी राज्याच्या सर्व आगारांमध्ये आणि बसेसमध्ये ही कारवाई सुरू राहणार आहे. त्यासाठी खास पथकांची नेमणूक करण्यात आली असून त्यांना कारवाईचे विशेष अधिकार देण्यात आले आहेत. त्यामध्ये संबंधित वाहक आणि चालक दोषी आढळल्यास त्यांचा अहवाल संबंधित विभागीय नियत्रकांना सादर करुन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना या पथकांना देण्यात आल्या आहेत.

रात्रीच्या सुमारास वाहन चालविताना व्यसनाची सवय अनेकांना आहे. ते प्रवाशांच्यादृष्टीने धोक्‍याचेच आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, ही कारवाईआधी महामंडळाने या चालकांमध्ये जागृती करुन त्यांची मानसिकता बदलण्यासाठी प्राधान्य देण्याची गरज आहे. त्यातूनच महामंडळ आणि कामगारांमधील संबंध अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.
– उल्हास बढे, स्वारगेट डेपो सचिव, एसटी कामगार सेना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)