बेशिस्त फोगाट भगिनींची राष्ट्रीय शिबीरातून हकालपट्टी 

नवी दिल्ली – आगामी आशियाई क्रीडास्पर्धेसाठी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय शिबिराला कोणतीही पूर्वसूचना न देता अनुपस्थित राहिल्यामुळे गीता, बबिता, रितू आणि संगीता या फोगाट भगिनींना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असून त्यांचा आशियाई स्पर्धेसाठी विचार करण्यात येणार नसल्याचे वृत्त आहे. याबद्दल स्पष्टीकरण देताना बबीता फोगाटने आपण जायबंदी असल्याने शिबिरात सहभागी होणार नसल्याचे म्हटले आहे. आशियाई खेळांसाठी लखनौ येथे 10 ते 25 मे दरम्यान शिबीर सुरू आहे. या शिबिरातील खेळाडूंना आशियाई स्पर्धेत भारताकडून खेळण्याची संधी मिळणार आहे. मात्र फोगाट भगिनींना या स्पर्धांमध्ये सहभागी होता येणार नाही, असे महासंघाच्या अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे फोगट भगिनींना आता आशियाई खेळांमध्येदेखील भारताचे प्रतिनिधित्व करता येणार नाही. हे आशियाई खेळ यंदाच्या ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान जकार्ता आणि पालेमबंग येथे होणार आहेत.

फोगाट भगिनींना त्यांच्या बेशिस्तपणा आणि नखऱ्यांमुळे शिबिरातून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवल्याचे कुस्ती महासंघाकडून सांगितले जात आहे. सध्या सुरू असलेल्या शिबिरात कोणतीही पूर्वसूचना न देता अनुपस्थित राहिल्यामुळे कुस्ती महासंघाने ही कडक कारवाई केली आहे. यापूर्वी बेशिस्तपणाच्या तक्रारी येऊनही गीता आणि बबिता यांच्या बाबतीत महासंघ नरमाईची भूमिका घेतो, असे म्हटले जात होते. मात्र आता तसे न करता महासंघाने चारही भगिनींची शिबिरातून हकालपट्टी केली आहे. या चौघींना त्यांच्या या वागणुकीबाबत कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. दरम्यान, आपण दुखापतग्रस्त असल्याने शिबिरात सहभागी होऊ शकलो नसल्याचे बबीताने सांगितले आहे. मात्र गीता आणि इतर दोघींच्या अनुपस्थितीबाबत काहीही कल्पना नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)