बेशिस्तांमुळे पर्यावरणपूरक प्रकल्पाला गालबोट

सायकलींची मोडतोड, जाळपोळीच्या घटना

– गणेश राख 

पुणे – स्मार्ट सिटी अंतर्गत सुुरू केलेल्या सायकल योजनेला नागरिकांकडूनच हरताळ फासला जात आहे. गेल्या काही दिवसांत बेशिस्त नागरिकांकडून सायकलींची मोडतोड, जाळपोळीचे प्रकार वाढत असून यामुळे पर्यावरणपूरक प्रकल्पाला गालबोट लागत आहे.

महापालिका आणि स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात स्मार्ट सायकल योजना राबविण्यात येत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानंतर शहरातील इतर भागांतही नाममात्र दरात सेवा सुरू करण्यात आली. पर्यावरणपूरक योजनेला सर्व घटकांचा चांगला प्रतिसाद मिळत असतानाच सायकलींचा गैरवापर होत असल्याचे समोर येत आहे. सायकलवरून डबलसीट जाण्याचा प्रयत्न करणे, वापर झाल्यानंतर इतरत्र सायकल फेकणे, जीपीएस यंत्रणेची तोडफोड, सायकल स्टॅन्ड खराब करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. शहरातील बहुतांश भागांत अशा प्रकारे सायकलींची दुरवस्था करण्यात आली आहे. तर काही भागातील महाभागांनी त्या पेटवून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन महिन्यांपूर्वी कोथरुड परिसरातील कचराकुंडीत पाच सायकल जाळण्यात आल्या होत्या. स्थानिक नागरिकाने यासंदर्भात तक्रार केल्यानंतर हा प्रकार समोर आला. सार्वजनिक ठिकाणी सर्वांना वापरण्यासाठी उपलब्ध करुन दिलेल्या सायकलींवर लक्ष ठेवण्यास प्रशासनालाही मर्यादा येत आहेत. यामुळे नागरिाकांनीच त्या आपल्या समजावून सांभाळल्या तर योजना सुरू राहू शकते. अन्यथा सरकारी वाहनांप्रमाणे त्याच्याकडे पाहिल्यास त्याची नासधूस होऊन पर्यावरणपूरक प्रकल्प गुंडाळला जाण्याची भीती आहे.

सायकल ट्रॅक नाहीच
शहरात उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सायकलींसाठी स्वतंत्र सायकल ट्रक सोडाच, पण आहे तेथेदेखील सायकल चालवणे कठीण जात आहे. नागरिकांनी पार्क केलेली वाहने, अनधिकृत हातगाड्या यामुळे सायकलचालकांना जागा उपलब्ध राहत नाही. यामुळे काही नागरिकांच्या चुकांमुळे इतरांना योजनेचा लाभ घेणे अवघड जात असल्याचे दिसून येत आहे.

ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद नाही
या सायकलींना ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. मोबाइलवरुन ऍप डाऊनलोड करणे आणि यानंतर सायकल अक्‍टिव्हेट करणे ज्येष्ठां अडचणीचे जात असल्याने सायकलींचा लाभ मिळत नसल्याचे दिसून येत आहेत. दरम्यान, काही ज्येष्ठांना ही प्रक्रिया करणे जमत असले, तरी सायकलींची मोडतोड, जीपीएस यंत्रणेत बिघाड, स्टॅन्डवर सायकल नसणे या सर्व प्रकारामुळे ज्येष्ठ नागरिकांना सायकली वापरण्यास मर्यादा येत असल्याचे दिसून येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)