बेलापूर-परळी रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण प्रगतिपथावर

खासदार लोखंडे यांच्या शिष्टमंडळास आश्‍वासन

नेवासा – बेलापूर-परळी रेल्वेमार्गाचे सर्वेक्षणाचे काम प्रगतिपथावर असून, फेब्रुवारी 2018 पर्यंत सर्वेक्षण पूर्ण करत या मार्गास मंजुरी दिली जाईल, असे आश्‍वासन रेल्वे मंत्रालयाचे प्रशासकीय अधिकारी तसेच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे स्वीय सहायक विजय पिंगळे यांनी खासदार सदाशिव लोखंडे व शिष्टमंडळाला दिले.

खा. लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली बेलापूर-परळी रेल्वे प्रवासी सेवा संस्थेची बैठक दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंत्री प्रभू यांचे स्वीय सहायक विजय पिंगळे व अन्य अधिकारी उपस्थित होते. बेलापूर-परळी या मार्गाचा सर्व्हे बेलापूर, नेवासा, शेवगाव, गेवराई, बीड, परळी असा होणे अपेक्षित असताना तो शेवगावपासून पाथर्डी, राजुरी, रायमोहमार्गे बीड असा करण्यात आला. केलेला सर्व्हे चुकीचा असल्याने, तसेच डोंगराळ भागातून जात असल्याने न परवडणारा सर्व्हे रिपोर्ट रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला होता. या विरोधात सेवा संस्थेने हरकत घेऊन 4 जुलै रोजी सोलापूर विभागीय कार्यालयासमोर उपोषण केले होते.
यासंदर्भात खा. लोखंडे यांनी दिल्ली येथे रेल्वे भवनमध्ये बैठक घेतली. यावेळी सेवा संस्थेचे सचिव रितेश भंडारी, निसार सय्यद, यशवंत एरंडे, गणेश मोढवे, शिवाजी दिशागत, आदी उपस्थित होते. बैठकीत पिंगळे यांनी फेब्रुवारीच्या अगोदर सर्व्हे पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, तसेच सर्व्हे पूर्ण होताच या मार्गाला मंजुरी देऊ, असे आश्‍वासन दिले. नगर जिल्ह्यात रेल्वेचे जाळे नसल्याची खंत पिंगळे यांनी व्यक्त केली.

यावेळी या मार्गाचे सर्वेक्षण करणारे अधिकारी खरे व अन्य सहकारी उपस्थित होते. काही महत्त्वाच्या कागदपत्रांच्या प्रती पिंगळे यांनी सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून घेतल्या, तसेच हा मार्ग तातडीने सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन खा. लोखंडे व सेवा संस्थेच्या वतीने देण्यात आले.

गेली 2 पिढ्यांपासून या मार्गाचा प्रश्‍न प्रलंबित आहे. मी व खासदार दिलीप गांधी एकत्र येऊन तातडीने हा प्रश्न मार्गी लावून जनतेचे स्वप्न साकार करणार आहोत.
खासदार सदाशिव लोखंडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)