बेलभंडार

   शब्दवेध

“हे बघ तुझं म्हणणं खरं आसल तर “बेलभंडारा’ उचलून शपथ घे बघू.’ अशा पद्धतीनं खरंखोटं पडताळणीची पद्धत ग्रामीण भागात अजूनही आहे. यातील “बेलभंडार’ला धार्मिक महत्त्व आहे. बेल वृक्षाची पाने महादेवाला प्रिय आहेत. महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र वाहण्याचा नवस खेड्यात करतात. ती पाने एकत्र घेऊन बेलाचे पान बनते. ही तीन पाने म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे एकत्रीकरण असंही समजलं जातं. भंडार म्हणजे हळद, ग्रामीण भागात यात्रेत पालखीवर हळदीची उधळण करतात. त्यावेळी हळदीला भंडार असं म्हणतात.

हा भंडारा कपाळालाही लावला जातो. पण जेव्हा “बेलभंडार’ अशी संज्ञा येथे तेव्हा शंकराच्या पिंडीवर वाहिलेले बेलाचे पान हळद आणि फुले या सगळ्याच्या एकत्रीकरणाला “बेलभंडार’ म्हटलं जातं. पूर्वीच्या काळी एखादी मोहीम फत्ते करण्याची शपथ सरदार लोक राजाच्या समोर बेलभंडार उचलून घेत असत. बेलभंडार हा देवावर वाहिलेला असल्याने त्याचं पावित्र्य वाढतं. बेलभंडार उचलून शपथ घेतली की मग ध्येयापर्यंत पोहोचणे हाच त्यांचा निर्धार बनायचा. मोगल, आदिलशाहीच्या काळात या मुस्लीम बादशहांना पदरच्या हिंदू सरदाराबद्दल विश्‍वास वाटायचा नाही. अशावेळी ते सरदाराकडून टोपलीतला बेलभंडार उचलून एकनिष्ठपणाची शपथ घ्यायला लावायचे. मग त्यांना दगा होईल असे वाटायचे नाही.

खेड्यात या बेलभंडाऱ्याला विशेष महत्त्व आहे. महादेव ही कोपिष्ट देवता मानली जाते. त्याच्या पिंडीवरचा बेल उचललेवर खोटं वागणं याचा अर्थ प्रत्यक्ष महादेवाचा कोप ओढवून घेणं ग्रामीण माणूस अजूनही देवाला मानणारा आहे. त्यामुळे देवाचा कोप होणं ही भीतीची भावना त्याच्या मनात असतो. बेलभंडार उचलून खोटेपणा करायला तो धजावत नाही. बेलाचे झाड पवित्र मानले जाते. खेड्यात जिथं बेलाचं झाड असेल त्याखाली महादेवाच्या पिंडीची प्रतिष्ठापना करतात.

– डॉ. राजेंद्र माने


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)