बेरोजगारीचा चक्रव्यूह (अग्रलेख)

गेल्याच आठवड्यात उत्तर भारतात एका युवकाने आपली जीवनयात्रा संपवली. स्पर्धा परीक्षा पास होऊन तब्बल 18 महिने झाले होते. लाखाच्या संख्येत परीक्षेला बसलेल्या व त्यात यशस्वी झालेल्या 800 मुलांत त्याचा समावेश होता. चांगल्या आयुष्याची स्वप्ने रंगवत असताना वास्तवाचे दाहक चटके बसण्यास सुरुवात झाली. सेवेत दाखल करून घेण्याचा फतवाच निघत नव्हता. प्रतीक्षा तरी किती करायची? फोन किती आणि कोणाकोणाला करायचे? 
प्रवेशासाठी, स्पर्धा परीक्षांसाठी आधार कार्डची आवश्‍यकता नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच दिला आहे. न्यायालयाच्या त्या निकालपत्रावरील शाईदेखील अद्याप वाळली नसेल. मात्र तरीही त्याला बायपास करण्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. रेल्वे भरती बोर्डातर्फे ग्रुप डी पदांसाठी घेण्यात येत असलेल्या परीक्षांच्या वेळी हा चमत्कार घडला आहे. केवळ आधारच नव्हे, वाहन परवाना, पॅन कार्ड अशी अन्य सरकारी ओळखपत्रे दाखवूनही दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देण्यात आले नसल्याची माहिती उघड झाली आहे.
या विद्यार्थ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. तेथेही त्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली व त्यांना हुसकावून लावण्यात आले. परीक्षा रेल्वेची होती. हुसकावून लावण्यात आलेले तरुण मराठी होते, असाही आरोप होत आहे. तो खराही असणार. रेल्वे याबाबतीत बदनाम आहे. कारण रेल्वे किंवा संपूर्ण रेल्वे विभाग देशभरातील सर्व रेल्वे स्थानकांसह रेल्वेमंत्र्यांच्या तीर्थरूपांची मालमत्ता असते, असे मानण्याची आपल्याकडे प्रथा आहे. अगदी मोजके सन्माननीय अपवाद सोडले तर आतापर्यंत आपल्याकडे या खात्याचा कारभार ज्या ज्या मंत्र्यांनी पाहिला त्यांनी त्यांनी याच परंपरेचे पाईक होण्याचा प्रयत्न केला. मंत्री ज्या राज्याचा त्याच भाषिक वर्तमानपत्रांत जाहिरात देण्यापासून आपल्याच प्रांतातल्या विद्यार्थ्यांनाच रेल्वेत हातपाय पसरायला कशी जागा मिळेल याची संबंधितांनी सोय पाहिली. त्यामुळे आता मराठी आहेत म्हणून या युवकांना डावलले असण्याची दाट शक्‍यता आहे व जर प्रामणिकपणे चौकशी झाली तर सत्य काय ते समोर येईल. पण प्रश्‍न केवळ रेल्वेचा नाही.
प्रश्‍न एकूणच नोकरी किंवा रोजगार मिळण्याचा आहे. तो मिळत नाहीये. मोठी स्वप्ने दाखवण्यात आली होती. लाखांच्या आणि कोटींच्या गप्पा झाल्या होत्या. मात्र काहीही हातात पडलेले नाही. पडण्याची शक्‍यताही धुसर झाली आहे. त्यामुळे तरूण हताश झाला आहे. त्याच्याभोवती आखण्यात आलेल्या चक्रव्यूहात तो पुरता अडकला आहे. हा चक्रव्यूह त्याला भेदायचा असेल तर त्याला आता प्राणपणाने लढावे लागणार आहे. त्यात यश मिळाले तर ठीक, अन्यथा प्राण द्यावे लागणार आहेत. म्हणजे हा जो लढा आहे, तो त्याच्या प्राणाशीच गाठ असणारा लढा आहे. एव्हाना त्याची सुरुवातही झाली आहे. गेल्याच आठवड्यात उत्तर भारतात एका युवकाने आपली जीवनयात्रा संपवली.
स्पर्धा परीक्षा पास होऊन तब्बल 18 महिने झाले होते. लाखाच्या संख्येत परीक्षेला बसलेल्या व त्यात यशस्वी झालेल्या 800 मुलांत त्याचा समावेश होता. चांगल्या आयुष्याची स्वप्ने रंगवत असताना वास्तवाचे दाहक चटके बसण्यास सुरुवात झाली. सेवेत दाखल करून घेण्याचा फतवाच निघत नव्हता. प्रतीक्षा तरी किती करायची? फोन किती आणि कोणाकोणाला करायचे? तो खचला. त्याने मृत्यूला कवटाळले. असे हजारो सुमीत मृत्यूच्या अंधारात गायब होत आहेत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या वेळीही काही युवकांनी जीवनयात्रा संपवली. तेवढ्यापुरती चर्चा झाली. सरकारने मदत जाहीर केली. विषय संपला.
खरेच मदत मिळाली का, त्या कुटुंबांचे काय, याच्या खोलात जायला कोणाला वेळ नाही. प्रत्येक जण आपल्या रोजच्या लढाईत जुंपलेला आहे. “शिक्षणाची पंढरी’ म्हणून राज्यात पुण्याचा लौकीक आहे. लाखो मुले रोज पुण्यात शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी दाखल होत आहेत. विदर्भ, मराठवाडा, खान्देश सगळीकडचीच मुले आहेत. पोरगं पुण्यात शिकून मोठा साहेब होईल आणि गरिबी दूर करेल अशी पालकांना भाबडी आशा. पोटाला चिमटा घेऊन पदरमोड करून त्याला पुण्याच्या गाडीत बसवतात. तोही घरच्या स्थितीची जाण ठेवून कधी शिकवण्या तर कधी चौकीदारी करत रात्र जागून आपल्या शिक्षणाची बिकट वाट धैर्याने चालण्याचा प्रयत्न करतोय. परीक्षा जाहीर कधी होणार, झाली तर पास कसे होणार, त्याच्या पुढच्या टप्प्याची तयारी व नंतर जाईनिंगची प्रतीक्षा. यातले काहीही त्याच्या हातात नाही. त्याने फक्त कष्ट घ्यायचे. पुढचे मायबाप सरकार बघणार. त्यांना फुरसत मिळेल तेव्हा जाहिराती निघणार व भरती होणार. जास्त आदळ आपट कराल तर भजे आणि पकोडे तळण्याचा सल्ला आहे. रोजगार मागू नका, रोजगार देणारे व्हा, असे जाहीर करणारे व डोळे दिपवणारे इव्हेंट आहेतच. ते पाहिले तरी मन भरून येते. क्षणभर वाटते, बघा किती प्रगती होतेय.
भारताने मानवरहित यान पाठवले, जगात भारताचा दबदबा वाढला. भारत मोठी अर्थसत्ता होतोय आणि हे युवक कुठे नोकऱ्या आणि रोजगाराचे जुनाट पालुपद धरून बसले आहेत. ताटात काही पडो न पडो, स्वप्ने मोठी असली पाहिजे. आपण दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे स्वप्न दाखवले आहे. काही लाख लोकांनाही अद्याप तो मिळाला नाही. पण आपले स्वप्न तर मोठे आहे ना? रुपया घसरतो आहे. पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर आले आहे. पण हे सगळे फुटकळ आहे. आपण पेट्रोल भरतोच आहे ना? शिवाय हे सगळे बघायचे की पाकिस्तानकडे बघायचे? त्यामुळे रोजगाराची अपेक्षा करू नका. तुम्ही पास व्हायचे तेव्हा व्हाल, अगोदर परीक्षेला तरी बसता येते का ते पाहा. आणि मुळातच नोकरी हवीच कशाला? भजे-पकोड्याचा व्यवसाय का नाही करत, शेवटी तोही एक स्वयंरोजगार आहेच की. हा बहुमोल सल्ला कधी आचरणात आणणार? एकंदरीतच बेरोजगारांची परिस्थिती “मुकी बिचारी कुणी हाका’ अशीच झाली आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)