“बेबी टॅंक’ला लागली गळती

पिंपरी – आकुर्डी प्राधिकरण येथील छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलावाच्या बेबी टॅंकला गळती लागली असून गेल्या अनेक दिवसांपासून या तलावाचा बेबी टॅंक बंद ठेवण्यात आला आहे. तसेच येथील दुरुस्तीची अनेक कामे बाकी असून तलावाची दूरवस्था झाली आहे.

विशेष म्हणजे हा जलतरण तलाव दुरुस्त करण्यासाठी 17 मार्च ते 23 एप्रिलपर्यंत ऐन उन्हाळ्याच्या हंगामात बंद ठेवण्यात आला होता. तरीही आजवर अनेक कामे अर्धवट ठेवण्यात आली असल्याचे दिसून आले. येथील पुरुषांच्या स्वच्छतागृहातील ड्रेनेज लाईन ब्लॉक झाल्याने स्वच्छतागृहातच पाणी साठून रहात आहे. तसेच येथील स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून या तलावाची तलाव परिसरातील व स्वच्छतागृहाची नियमीत स्वच्छता केली जात नाही, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे.

या जलतरण तलावात एकावेळी 100 लोक पोहू शकतील एवढी क्षमता आहे. मात्र सध्या उन्हाळ्याचा हंगाम असल्याने येथे एका बॅचसाठी 200-250 जलतरणप्रेमी हजेरी लावत आहेत. मात्र येथे केवळ 2 जीवरक्षक व एकच सुरक्षारक्षक कामकाज पाहत असल्याचे दिसून आले. उन्हाळ्याचा हंगाम असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून गर्दीमुळे येथील व्यवस्थापनावर कामाचा ताण येत आहे. त्यामुळे येथे आणखी 2 जीव रक्षक व एका सुरक्षा रक्षकाची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले.

बेबी टॅंकच्या तळाला गळती लागली असल्यामुळे बेबी टॅंक बंद ठेवण्याची वेळ व्यवस्थापनावर आली आहे. मात्र त्यामुळे येथे येणाऱ्या लहान मुलांची चांगलीच कुंचबना होत आहे. तसेच या जलतरण तलावाची स्वच्छता, पाणी शुद्धीकरण ठेकेदाराकडून नियमीत केले जात नसल्याची तक्रारही काही नागरिकांनी केली आहे. तसेच या तलावातील पाण्यावर मोठ्या प्रमाणात कचरा तरंगत असल्याचा आढळून आला. मागच्या महिन्यात तलाव बंद असताना ठेकेदाराने या तलावातील 3 ते 6 फुट खोलीपर्यंतच्या फरश्‍या दुरुस्तीचे काम केले आहे. मात्र त्यापुढील 6 ते 16 फुटापर्यंतच्या फुटलेल्या फरश्‍या ठेकेदराने आजही बदलल्या नाहीत. त्यामुळे फुटलेल्या फरश्‍या कापल्याने अनेक जण जखमी होत असल्याचे समोर आले आहे. तलाव बंद ठेवूनही ठेकेदाराने दुरुस्तीची कामे पुर्ण का केली नाहीत असा सवाल नागरिक करत आहेत. तसेच येथील जीव रक्षकांच्या खोलीच्या काचाही फुटल्या आहेत.

नागरिकांच्या मागण्या
– 2 जीव रक्षक, एक सुरक्षा रक्षक नेमावा
– “बेबी टॅंक’ची त्वरीत दुरुस्ती करावी
– पिण्याच्या पाण्याची सोय करावी
– जीव रक्षकांसाठी बांबू व रिंगा देण्यात याव्यात
– स्वच्छतागृह व तलावाची नियमीत स्वच्छता करावी
– महिला, लहान मुलांसाठी स्वतंत्र बॅच वाढवावी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)