बेफामपणाला लगाम (अग्रलेख) 

जगात सध्या सगळीकडेच बेफाम नेतृत्वाची चलती आहे. प्रचंड बहुमतामुळे या सगळ्या नेत्यांना निरंकुश केल्याची स्थिती आहे. गेल्या दोन-चार वर्षांतील प्रमुख देशांच्या निवडणुका आणि तेथे सत्तेवर आलेल्यांची नावे आणि त्यांचा एककल्ली कारभार बघितला तर हा मुद्दा चटकन ध्यानात येतो. या अशा बेफाम नेत्यांच्या यादीत अर्थातच अग्रस्थानी आहेत ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. अध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून या महाशयांनी आपला कथित प्रखर राष्ट्रवाद पाजळत व टोकाची भूमिका घेत जे काही जाहीर केले वा करण्याचा प्रयत्न केला, त्याला धुडगूस असेच म्हणतात. भावनेच्या भरात आणि एखाद्या लाटेत मतदार काही वेळा बहकतात. मात्र, नंतर जोर ओसरतो तेव्हा मतदार स्वत:च असेसमेंट करतो. तेव्हा त्याला आपल्या काही चुका उमगतात. नंतर तो त्यात संधी मिळेल तेथे सुधारणा करू पाहतो. त्यामुळेच बदलत्या वातावरणाचे संकेत मिळू लागतात. त्यातूनच अमेरिकेतील मतदारही ट्रम्प यांच्यासारख्या लहरी प्रशासकाला आम्ही तुम्हाला निरंकुश होऊ देणार नाही, असा स्पष्ट इशारा देतात. त्या देशातल्या मध्यावधी निवडणुकांनी ते स्पष्ट केले आहे.

अमेरिकी कॉंग्रेसची सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह अर्थात प्रतिनिधी सभा अशी दोन सभागृहे आहेत. यातील वरिष्ठ सभागृह असलेल्या सिनेटमध्ये ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला बहुमत कायम ठेवण्यात यश आले आहे. मात्र, कनिष्ठ प्रतिनिधी सभागृहात डेमोक्रॅटिक पक्षाने बहुमत प्राप्त केले आहे. याचाच अर्थ आता ट्रम्प यांचा सुगीचा हंगाम आता संपला आहे. त्यांना दोन्ही सभागृहात पाशवी बहुमत होते. जनतेने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हिलरी क्‍लिंटन यांना नाकारून त्यांच्यावर विश्‍वास दर्शवला होता. त्यामुळे त्यांचा वारू चांगलाच उधळला होता. त्यांनी मनमानी पद्धतीने निर्णय घेण्यास सुरुवात केली होती. मात्र, त्यातही कोणतीही सुसूत्रता नव्हती. ट्रम्प आज बोलले त्यावर उद्या ठाम राहतीलच असे नाही, असे वातावरण त्यांनी अनेक प्रसंगात घेतलेल्या कोलांटउड्यांनी सिद्ध केले आहे.

भारतासारख्या अमेरिकेच्या प्रेमात पडू पाहणाऱ्या देशांनाही अर्थातच त्याचा फटका बसला. चांगल्या भवितव्याच्या आशेने अमेरिकेत जाऊ पाहणाऱ्या व तेथे संधीच्या शोधात असणाऱ्या असंख्य युवक-युवतींच्या आशांवर पाणी ओतणाऱ्या घोषणांचा धडाका ट्रम्प यांनी लावला होता. अमेरिका फर्स्ट हा त्यांनी निवडणुकीत दिलेला नारा. त्याला जागत त्यांनी अमेरिकेच्या हिताचीच पक्षी स्वहिताचीच टिमकी वाजवत, जगात अमेरिकेच्या आतापर्यंतच्या भक्‍कम पाठबळावर उभ्या असलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अस्तित्वालाच सुरूंग लावण्याचा सपाटा लावला. प्रत्येक गोष्ट पैशात तोलत, आम्ही एवढे पैसे का द्यायचे असा व्यवहार मांडत सगळ्यांची गेल्या काही काळापासून भंबेरी उडवली आहे. अमेरिका आज जगातील दादा आहे. तसा तो कालच नव्हे, तर जपानवर दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्ब टाकल्यापासूनच झाला होता. इराण-इराकपासून पॅलेस्टीन-इस्रायलपर्यंत आणि अगदी भारत-पाक- अफगाणपर्यंत कोणी सांगितले अथवा सांगितले नसतानाही त्या देशाने पोलीसगिरी केली. मात्र, त्या त्या वेळेचे अमेरिकेचे नेतृत्वही प्रगल्भ होते. बराक ओबामांसारख्या अध्यक्षांनी आपल्या आचरणाने, मर्यादाशील स्वभावाने आदराचे स्थान पटकावत अमेरिकेच्या लौकिकात भरच टाकली होती. त्याला ट्रम्प यांनी खीळ बसवली.

अध्यक्षपदाला न शोभणारे वर्तन आणि वक्‍तव्ये करत त्यांनी प्रसारमाध्यमांनाही अंगावर घेतले. त्यांच्या व्यक्‍तिगत चारित्र्यावर शिंतोडे उडवणारे व लांच्छनास्पद प्रकारही समोर आले. मात्र, या सगळ्याला राष्ट्रवादाचे वेष्टन घालत आणि अमेरिका हिताचा मुलामा देत आपला दुय्यम मालही ट्रम्प यांनी बेमालूमपणे खपवला. त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर व त्याला रशियाने लावलेल्या कथित हातभाराबद्दलही ट्रम्प संशयाच्या भोवऱ्यात होते व आहेत. त्यांच्यावर महाभियोग चालवण्याच्या चर्चाही झडत आहेत. या सगळ्याच्या पार्श्‍वभूमीवर त्यांना मध्यावधी निवडणुकांच्या अनुषंगाने काहीसा लगाम घालण्याचे काम अमेरिकी मतदाराने केले आहे. आपली धोरणे आता त्यांना बेधडकपणे राबवता येणार नाहीत. कॉंग्रेसमध्ये त्यांच्या प्रत्येक निर्णयाची समीक्षा केली जाईल व डेमोक्रॅटिक पक्षाचे पर्यायाने प्रतिनिधींच्या शंकांचे त्यांना समाधान करत संतुलन साधावे लागेल. त्यांची व्यक्‍तिगत संपत्ती, त्यांचे खासगी उद्योग आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्याशी असलेल्या कथित मैत्रीबाबत चौकशी केली जाण्याचा दबावही कॉंग्रेसमधील बदलत्या समीकरणांमुळे त्यांना झेलावा लागू शकतो. एखादी व्यक्‍ती स्वत:च्या प्रेमात पडली की तिला आपणच सर्वश्रेष्ठ आणि आपण सांगतो तेच योग्य असे भास वरचेवर होऊ लागतात.

अशा व्यक्‍ती आपला वैयक्‍तिक निर्णय हाच सर्व राष्ट्राचा निर्णय आहे व आपली पसंत- नापसंत हा जनमताचा कौल असल्याचे गृहीत धरून मग बेफाम वागू लागतात. जे ट्रम्प यांच्या आतापर्यंतच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत अमेरिकेबरोबरच संपूर्ण जगाने अनुभवले. विदेशी वंशाचे नागरिक, अमेरिकेत येऊ पाहणारे अन्य देशीय लोक यांच्याबाबत त्यांनी घेतलेला अत्यंत आक्रमक पवित्रा सगळ्यांना ज्ञात आहे. मात्र, आपण जसा विचार करतो, तसा विचार सगळी अमेरिका करत नाही हे त्यांना आता कदाचित उमगले असावे. अमेरिकेची लोकशाहीवादी आणि आपले हित साधूनही सर्वसमावेशकता जपणारा देश अशी प्रतिमा आहे व त्याचा तेथील प्रत्येक नागरिकाला असलेला अभिमान सातत्याने दृगोच्चर होत असतो. त्याला छेद दिला जाऊ शकत नाही. आम्ही तसे होऊ देणार नाही, हेच त्या देशाच्या मतदारांनी निवडणुकांच्या माध्यमातून अधोरेखित केले. यातून ट्रम्प व जगभरातील इतरही तत्सम नेत्यांनी
बोध घ्यावा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)