एकास अटक मृतदेहाचा तपास सुरू

नवी मुंबई: पाच दिवसांपासून बेपत्ता असलेले एका खासगी बॅंकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांची हत्या झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. त्याने संघवी यांची हत्या झाली असल्याची पोलीस तपासात माहिती दिली आहे. मात्र, संघवी यांच्या मृतदेह अद्याप सापडला नसून पोलीस मृतदेहाचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव उघड केले नाही. ही हत्या करण्यामागे नेमके काय कारण होते हे समोर आलेले नाही. आरोपी सतत आपला जबाब बदलत असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु असून इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

सिद्धार्थ संघवी हे मलबार हिल परिसरात कुटुंबासमवेत राहतात. बुधवारी रात्री ते ऑफिस सुटल्यानंतर लोअर परळवरुन मलबार हिलकडे, घराकडे निघाले होते. ऑफिसमधून बाहेर पडताना वॉचमनने त्यांना पाहिलेही होते. मात्र ते घरापर्यंत काही पोहोचलेच नाहीत.

ते घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांना फोन लावून चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा फोन बंद होता. रात्रभर शोध घेवूनही ते न सापडल्याने कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता शुक्रवारी सकाळी सिद्धार्थ यांची कार नवी मुंबईतील कोपरखैराणे परिसरात आढळली. या गाडीत रक्ताचे डाग होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)