बेनझीर भुट्टो हत्या प्रकरणी मुशर्रफ फरारी घोषित

अन्य दोन पोलिस अधिकारीही संशयावरून ताब्यात

इस्लामाबाद- पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान दिवंगत बेनझीर भुट्टो यांच्या हत्येप्रकरणी पाकिस्तानचे माजी अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांना दहशतवाद विरोधी न्यायालयाने फरार घोषित केले आहे. मुशर्रफ यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेशही या न्यायालयाने दिले आहेत.

अन्य दोन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना 17 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बेनझीर भुट्टो यांच्या हत्येनंतर सुमारे 10 वर्षांनंतर ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
बेनझीर भुट्टो यांच्या हत्येनंतर 2008 साली हा खटला सुरु झाला. तर प्रांतिय तपास संस्थेने केलेल्या फेरतपासाच्या आधारे मुशर्रफ यांना 2009 साली आरोपी केले गेले होते.

पाकिस्तान पीपल्स पार्टी पक्षाच्या अध्यक्षा आणि दोन वेळेला पंतप्रधान राहिलेल्या बेनझीर भुट्टो यांची 27 डिसेंबर 2007 रोजी रावळपिंडीतील लियाकत बाग भागात सभेदरम्यान गोळीबार आणि बॉम्बस्फोटाद्वारे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी तपास आणि खटल्यामध्ये खूपवेळा अडथळे आले होते.

या प्रकरणी दहशतवाद विरोधी न्यायालयाने मुशर्रफ यांना फरार आरोपी घोषित करून म्मुशर्रफ यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले. गेल्यावर्षापासून मुशर्रफ यांना वैद्यकीय उपचारांसाठी देशाबाहेर जाण्याची परवानगी दिली गेली होती. तेंव्हापासून मुशर्रफ दुबईमध्येच आहेत.

रावळपिंडीचे माजी सीपीओ सौद अझिझ आणि रावळ टाऊनचे माजी पोलिस अधिक्षक खुर्रम शहझाद हे 17 वर्षांपासून जामीनावर होते. मात्र संशयाच्या आधारे त्यांना अटक करण्यात आली, आणि प्रत्येकी 15 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. “तेहरीक ए तालिबान पाकिस्तान’च्या पाच संशयितांना मात्र पुराव्याच्या अभावी निर्दोष मुक्‍त करण्यात आले. आजच्या सुनावणीच्यावेळी मुशर्रफ वगळता अन्य सर्व आरोपी कोर्टात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)