बेनझीर भुट्टो हत्याप्रकरण: दोन पोलीस अधिकाऱ्यांना १७ वर्षांचा तुरुंगवास; मुशर्रफ फरार घोषित

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो हत्या प्रकरणाचा निकाल गुरूवारी पाकिस्तान दहशतवाद विरोधी न्यायालयाकडून देण्यात आला. न्यायाधीश असगर खान यांनी न्यायालयामध्ये हा निर्णय जाहीर केला. यावेळी न्यायालयाने माजी रावळपिंडीचे सीपीओ सौद अझीझ आणि माजी रावळ टाउनचे एस. पी. खुर्रम शहजाद यांना दोषी ठरवत 17 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांना प्रत्येकी पाकिस्तानी पाच लाख रुपये दंडही देण्याचा आदेश दिला. अन्य पाच जणांची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात आरोपी असणारे पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना न्यायालयाने फरार घोषित केले व त्यांची संपत्ती जप्त करण्याचेही आदेशही दिले.

२७ डिसेंबर २००७ रोजी झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचा मृत्यू झाला होता. बेनझीर भुट्टो निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी रावळपिंडीत आल्या असताना त्यांच्यावर गोळीबार आणि ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणी लगेचच खटला दाखल झाला होता. आज न्यायालयाने या खटल्याचा अंतिम निकाल दिला. तेहरिक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेचे पाच दहशतवादी आणि दोन पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या साक्षीच्या आधारे न्यायालयाने हा निकाल दिला. बेनझीर भुट्टो यांच्या हत्येनंतर काही दिवसांतच रफाकत हुसेन, हुसेन गुल, शेर झमान, ऐतियाज शाह, अब्दुल रशिद या पाचजणांना संशयित म्हणून अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस प्रमुख सौद अझिझ आणि वरिष्ठ पोलीस अधिक्षक खुरर्म शहजाद यांचाही आरोपींमध्ये समावेश होता. भुट्टो यांच्या जाहीर सभेच्यावेळी बंदोबस्ताचे नियोजन करण्यात या दोन अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या दोघांना सुरूवातीला अटक करण्यात आली होती. मात्र, २०११ मध्ये दोघांना जामिनावर सोडण्यात आले होते. त्यामुळे आजच्या निकालावर या सगळ्यांचे भवितव्य अवलंबून होते. मात्र, न्यायालयाने दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना दोषी ठरवत त्यांना १७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)