बेडर आणि समाजनिष्ठ लढवय्या

– प्रा. दीपक कांबळे

  • बेरड समाजाच्या उन्नतीसाठी स्वतःला वाहून घेणाऱ्या आणि समाजातील देवदासीच्या प्रथेच्या निर्मूलनासाठी सामाजिक प्रबोधनाची चळवळ उभी करणाऱ्या डॉ. भीमराव गस्ती यांचे नुकतेच निधन झाले. स्वत:साठी जगणारे अनेक असतात, मात्र गस्ती हे समाजासाठी जगले. अवहेलनेत आयुष्य घालवाव्या लागणाऱ्या समाजाच्या मनात गस्तींनी अग्नी चेतवला. शंभर टक्के समाजसेवक असणारे डॉ. गस्ती हे तेवढ्याच ताकदीने असामान्य साहित्यिक होते. त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न अनेकांनी केला, पण ते कुणाच्याही जाळ्यात अडकले नाहीत. “मी सर्वांचा आहे, पुरागामित्वाच्या बुरख्याआड जातीय डबकी नकोत,’ ही भूमिका त्यांनी जीवनभर जपली.

डॉ. भीमराव गस्ती मूळचे बेळगावजवळच्या यमनापूर खेड्यातले. अंधश्रद्धा आणि रूढी-परंपरांनी जखडलेल्या बेडर समाजात जन्मलेल्या डॉ. गस्ती यांनी गावच्या शाळेतच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतले. पुढे एम. एस्सी. इलेक्‍ट्रॉनिक्‍स ही पदव्युत्तर पदवी मिळवल्यावर रशियाची राजधानी मॉस्कोच्या पेट्रिक लुुमुंबा विद्यापीठातून त्यांनी याच विषयाची डॉक्‍टरेटही संपादन केली. हैद्राबाद येथील डी. आर. डी. ओ.मध्ये त्यांना ज्येष्ठ शास्त्रज्ञाची नोकरीही मिळाली होती. सुट्टीत गावी परतल्यावर बेळगावजवळच्या सुतकट्टी घाटात झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात त्या परिसरातल्या बेरड समाजातल्या 20 निरपराध्यांना कर्नाटक पोलिसांनी अटक केली. त्यांचा अनन्वित छळ केला. या अन्यायाने पेटून उठलेल्या गस्तींनी न्यायासाठी झुंज दिली. मोर्चे काढले, आंदोलने केली. या घटनेने त्यांचे जीवनच बदललले. पुढे खरे गुन्हेगार सापडले आणि गस्ती यांच्या आंदोलनामुळे निरपराध्यांना न्यायही मिळाला.

डॉ. गस्ती यांनी बेरड समाजाच्या उन्नतीसाठी स्वतःला वाहून घेतले. त्यांनी गावातच आपल्या समाजातल्या मुलीसाठी वसतिगृह सुरू केले. समाजातली देवदासीच्या प्रथेचे निर्मूलन व्हावे यासाठी सामाजिक प्रबोधनाची चळवळ सुरू केली. शेकडो देवदासींचे विवाह केले. “बेरड’ या आपल्या आत्मचरित्रात त्यांनी या समाजाच्या व्यथा, वेदना आणि होणाऱ्या छळाचेच चित्रण केले आहे. त्यांचे हे आत्मचरित्र खूप गाजले. त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरवही झाला.

डॉ. गस्ती यांनी सामाजिक विटंबना, उपेक्षा सोसल्या आहेत; पण त्याचा त्यांनी कधीही डांगोरा पिटला नाही. सामाजिक समन्वयाची भूमिका घेऊन ते एकाकीपणे समाजसेवा करीत राहिले. आपल्या आणि आपल्या पिढीच्या वाट्याला जे दु:ख आले, ते युवा पिढीच्या वाट्याला येऊ नये, त्यांचे जीवन उज्ज्वल व्हावे यासाठी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा “शिका आणि शहाणे व्हा, हक्कासाठी लढत रहा!’ हा मूलमंत्र त्यांनी स्वीकारला. आपल्या समाजातल्या मुलांनीही शिकावे, यासाठी त्यांनी सारा कर्नाटक पिंजून काढला. कर्नाटकातल्या साठ हजार देवदासींना सन्मानाने जगता यावे, यासाठी राज्य सरकारकडून विविध योजनाही त्यांनी मंजूर करून घेतल्या. मात्र, आपल्या कामाचा गवगवा त्यांनी कधीही केला नाही.
डॉ. गस्ती यांचे व्यक्तिमत्त्व आणि वक्तृत्वही खूप साधे होते; पण त्यांचे संघटनकौशल्य मात्र खूपच प्रभावी होते. सामाजिक सुधारणांना प्रारंभी झालेल्या विरोधाचे, त्यांनी भक्कम पाठिंब्यात रूपांतर करण्यात यश मिळवले. त्यांची लेखणी मात्र धारदार होती. कर्नाटकात ते फिरत असत तेव्हा बेडर समाजाच्या बोली भाषेतच संवाद साधत आणि त्यांना आपले करून घेत. संघर्षापेक्षा समन्वयाचा मार्ग स्वीकारून त्यांनी केलेल्या आदर्श कार्याचा पुण्यनगरीने गौरव केला, ही बाबही प्रशंसनीय ठरावी. त्यांच्या सामाजिक कार्याला व्यापक प्रतिसाद मिळणे, हे त्यांचे खरे यश होय.

गस्तींचा जन्म बेरड समाजातला. गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या आणि क्षुल्लक गुन्ह्यासाठी पोलिसांचा अमानुष मार खावा लागणारा हा समाज. त्यांच्या 14 नातेवाईकांना पोलिसांच्या निर्घृण मारहाणीत जीव गमवावा लागला होता. अत्यंत विपरीत परिस्थितीत गस्तींचं शिक्षण झालं. शिक्षणाची परंपरा नव्हती, पण वडिलांनी शिक्षण द्यायचं ठरवलं आणि गस्तींनी त्या संधीचं सोनं केलं. शाळेत आणि समाजातही अस्पृश्‍यता इतकी पराकोटीची होती की शाळेच्या वाटेवर विहिरीपाशी कुणीतरी केलेली विष्ठा मास्तरांच्या सांगण्यावरून गस्तींना स्वत:च्या हाताने उचलावी लागली आणि घाण झालेल्या हातांवर कुणी पाणीही घालावयास तयार न झाल्याने, मातीत हात घुसळून त्याच हाताने शाळेत जाऊन दिवसभराचा अभ्यासही करावा लागला! गस्तींनी त्याबद्दल सूडभावना मात्र बाळगली नाही. शिष्यवृत्ती होती, त्यामुळे गस्तींचं शिक्षण सुरू होतं. गस्ती अभियांत्रिकी परीक्षा उत्तीर्ण झाले, पदव्युत्तर पदवीही त्यांनी मिळवली. रशियात जाऊन संशोधन करीत पीएच.डी. झाल्यावर वैद्यकीय-औद्योगिक संशोधन संस्थेत भूभौतिक संशोधन केंद्रात संशोधक म्हणून नोकरीही मिळाली. पण आणीबाणीत अटक झाली आणि नोकरी गेली. पुन्हा नोकरी करायची नाही, असा निश्‍चय करूनच गस्ती तुरुंगाबाहेर पडले आणि त्यांनी बेरड तसेच देवदासी समाजाच्या उन्नतीसाठी स्वत:ला वाहून घेतलं. घरात देवदासी बनलेली बहीण आणि मेहुणी होती. त्यांच्या नशिबाचा फेरा गस्तींना अस्वस्थ करीत होता.

देवदासी प्रथा बंद व्हावी म्हणून त्यांनी आंदोलनाच्या, सत्याग्रहाच्या मार्गाने न जाता गस्तींनी त्या देवदासींना सक्षम बनवण्याचा उपक्रम हाती घेतला. गस्तींनी त्यांच्या मुलींना शिक्षण दिलं. विजापूर, बागलकोट, रायचूर, बेल्लारी, गुलबर्गा जिल्ह्यातील दोनेकशे मुली शिकल्या. मॅट्रिक झाल्या. पुढे शिकणं शक्‍य नसलेल्यांना त्यांनी शिवणकाम शिकवलं, कामही मिळवून दिलं. त्यातलीच एक मुलम्मा तहसीलदार बनली. पोटापाण्यासाठी पुण्या-मुंबईला पळून जाणाऱ्या देवदासींना वाचवा, अशी हाकाटी करीत आलेल्या तरुणांनाच गस्तींनी त्यांच्याशी विवाह करायला तयार केलं. तीस हजार देवदासींना गस्तींच्याच प्रयत्नातून पेन्शन मिळाली, घरकुलासाठी मदत, शेळ्यामेंढ्यांसाठी कर्ज मिळालं. त्यांची आरोग्य शिबिरं झाली, उपचार व्यवस्था झाली. बेरड, रामोशी समाजाच्या डोक्‍यावरचा गुन्हेगारीचा शिक्का जावा, यासाठी गस्तींनी प्रयत्न केले आणि त्यांची कर्नाटकच्या अनुसूचित जमातीत नोंद करून घेतली.

गस्तींची लेखणी खूप प्रभावी होती. शंभर टक्के समाजसेवक असणारे डॉ. गस्ती हे तेवढ्याच ताकदीने असामान्य साहित्यिक होते. तरुण भारत (बेळगाव) च्या रविवार अंकात चळवळीत घडलेल्या काही घटनांसंबंधी सलगपणे 12 लेख लिहिले. ज्येष्ठ समाजवादी नेते नानासाहेब गोरे, विजय तेंडुलकर यांसारख्यांनी ते वाचून त्यांना उत्तेजन दिले. डॉ. गस्ती यांनी “बेरड’ हे आत्मचरित्र लिहिलं, “आक्रोश’, “रानवारा’, “कौरव’ ही त्यांची अन्य पुस्तकंही गाजली. या पुस्तकांनी विक्रीचे उच्चांक गाठले, पुरस्कार मिळवले. गस्तींचं लेखन पाठ्यपुस्तकात समाविष्ट झालं. “बेरड’ हे त्यांचे आत्मकथन खूप गाजले. अनेक भाषांत त्यांची भाषांतरे झाली. अनेकांनी त्यावर पीएच. डी. केली. त्यांच्या तेलगू अनुवादाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. “आक्रोश’ हे त्यांचे चळवळीतील अनुभवांचे पुस्तक आहे. त्यांच्या जीवनानुभवावर आधारित कथा “सांजवारा’मध्ये आहेत. इतकं उत्तम लिहूनही ते अत्यंत प्रांजळपणे म्हणत की, “”मी समाजसेवक आहे, कार्यकर्ता आहे. लेखक नाही. मला कुणी लेखक म्हटले नाही तरी चालेल.” आपल्या साहित्यात त्यांनी सीमाभागातील कन्नड, मराठीमिश्रित ग्रामीण बोलीचा सढळ हाताने वापर करून मराठीला हजारो नवे शब्द दिले आणि “बेळगावी बोली’लाही प्रकाशात आणले. त्यांचे वक्तृत्वही साधे, सरळ, परंतु प्रभावी होते. चळवळीतील त्यांचे अनुभव ऐकताना श्रोते तल्लीन होत. त्यांच्या कार्याचा व्याप मोठा, पसारा प्रचंड, कार्येकर्ते असंख्य, मित्रपरिवारही खूप मोठा होता. ते प्रत्येक मित्राला प्रत्येक आठवड्याला एक-दोन तरी पत्रे नियमितपणे लिहीत. बेळगाव ह्या छोट्याशा खेड्यात राहूनही पु. ल. देशपांडे, विजय तेंडुलकर, विंदा करंदीकर, ग. प्र. प्रधान, नानासाहेब गोरे अशा मान्यवरांचा स्नेह त्यांना लाभला होता.

स्वत:साठी जगणारे अनेक असतात, मात्र गस्ती हे समाजासाठी जगले. अवहेलनेत आयुष्य घालवाव्या लागणाऱ्या समाजाच्या मनात गस्तींनी अग्नी चेतवला. त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न अनेकांनी केला, पण ते कुणाच्याही जाळ्यात अडकले नाहीत. “मी सर्वांचा आहे, पुरागामित्वाच्या बुरख्याआड जातीय डबकी नकोत,’ ही भूमिका त्यांनी जीवनभर जपली. बेरड-रामोशी समाजाची नोंद महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींत व्हावी यासाठीचा गस्तींना ध्यास होता. बेरड आणि रामोशी जात्याच निडर, त्यांचा योग्य उपयोग स्वतंत्र पलटण उभारून भारतीय लष्करानं करून घ्यावा, यासाठीही गस्ती धडपडत होते.

डॉ. गस्ती यांनी देवदासी महिलांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी आणि बेरड-रामोशी समाजाच्या विकासासाठी बेळगावमधील यमुनापूर येथे “उत्थान’ ही सामाजिक संस्था सुरू केली. या संस्थेच्या माध्यमातून डॉ. गस्ती यांनी बेरड समाजासह देवदासींसाठी केलेल्या कार्याची देश-विदेशात मोठी चर्चा होती. उपेक्षितांसाठी डॉ. गस्ती यांनी दिलेल्या अखंडित योगदानाबद्दल त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानाचे पुरस्कार प्राप्त झाले होते. त्यांच्या कामाचा विस्तार महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांमध्ये होता. पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी आणि स्व-रूपवर्धिनी या संस्थांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान या संस्थेचे ते अनेक वर्षे उपाध्यक्ष होते. डॉ. गस्ती यांच्या निधनामुळे बेळगावच्या सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

“आक्रोश’च्या प्रस्तावनेमध्ये डॉ. गस्ती लिहितात, “”भटक्‍या विमुक्‍त जाती-जमातींमध्ये तसेच इतर सामाजिक चळवळींमध्ये तळमळीने कार्य करणारे अनेक कार्यकर्ते आहेत. त्यांनीही चळवळीसाठी खूप कष्ट घेतलेले आहेत. तेव्हा जाणत्यांनी त्यांच्याकडेही दुर्लक्ष करू नये. त्यांनाही संधी द्यायला हवी. अशा कार्यकर्त्यांची उपेक्षा होऊ नये असे मला मनापासून वाटते.” यावरुन त्यांची समाजाविषयीची सच्ची तळमळ आणि निःस्पृहपणा दिसून येतो.

  • डॉ.गस्ती यांना मिळालेले पुरस्कार
    डॉ. अरुण लिमये पुरस्कार (जुलै 1989), कर्नाटक राज्य साहित्य पुरस्कार (मार्च 1990), गोदावरी गौरव पुरस्कार (2004), पंचगंगा सहकारी साखर कारखाना साहित्य पुरस्कार (सप्टेंबर 1989), बापूसाहेब विंधे वाङ्‌मय पुरस्कार (रत्नागिरी, मे 1989), महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार (नोव्हेंबर 1990), मुकादम साहित्य पुरस्कार (कराड, जानेवारी 1991), मुंबई मराठी साहित्य संघातर्फे बा. सी. मर्ढेकर साहित्य पुरस्कार (जानेवारी 1990), रत्नाप्पा कुंभार साहित्य पुरस्कार (कोल्हापूर, जून 1989), समता साहित्य पुरस्कार (बेळगाव, मार्च 1991), नवव्या समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, इत्यादी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)