बेकायदा व्यवसाय आढळल्यास वरिष्ठांवर कारवाई ; गृहमंत्रालयाचे निर्देश

आठवडाभरात थेट पोलीस महानिरीक्षक घालणार धाड 
मुंबई- राज्याच्या ग्रामीण भागातील बेकायदा दारु विक्री, मटका, वेश्‍याव्यवसायाला पायबंद घालण्यासाठी राज्याचे गृह राज्यमंत्री दिपक केसरकर “इन ऍक्‍शन’ झाले आहेत. अशा बेकायदा व्यवसायाला आळा बसावा यासाठी पोलीस महानिरिक्षकांना आठवडाभरानंतर त्यांच्या विभागात अचानक धाडी घालण्याचे निर्देश गृह राज्यमंत्र्यांनी दिले आहेत. या धाडीत गैरव्यवसाय आढळल्यास संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीसांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडून कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना ही माहीती दिली. राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमुळे राज्य सरकारची प्रतिमा मलिन होते. अनेकदा असामाजिक तत्वांकडून तोडफोड होते. मोटारी फोडल्या जातात. राज्यात शांतता कायम निर्माण करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्यातल्या पोलीस महानिरिक्षकांनी सात दिवसांनंतर त्यांच्या भागात अचानक तपासणी करून कोणताही बेकायदा व्यवसाय होत नाही याची खात्री करावी असे आदेश त्यांनी यावेळी दिले.
सात दिवसांत प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेकायदा दारु विक्री, मटका, वेश्‍याव्यवसाय बंद झाले पाहिजेत. सात दिवसांनी मात्र पोलीस निरिक्षकांनी अचानक भेटी देण्यास सुरवात करावी. या धाडींमध्ये एखाद्या विभागात बेकायदा व्यवसाय आढळून आल्यास संबंधित पोलीस ठाण्याच्या स्थानिक अधिका-यावर कारवाई होईल, असा इशारा दीपक केसरकर यांनी यावेळी दिला.
पोलीस महानिरिक्षकांनी स्वतः धाडी घालाव्यात किंवा त्यांनी टीम तयार करून त्यांच्यामार्फत अचानक धाडी घालाव्यात. आपण स्वतःही फिरणार आहोत. किती ठिकाणी अचानक तपासणी झाली याची माहितीही आपण घेणार आहोत, असे केसरकर म्हणाले.
नागरिकांनी थेट तक्रार करावी 
एखाद्या विभागात बेकायदा व्यवसाय सुरु असल्याची माहिती नागरिकांना असल्यास त्यांनी पोलिस महासंचालकांना थेट फोन करावा. तक्रारदाराची नावे गोपनीय ठेवण्यात येतील. अथवा थेट निनावी पत्र पाठवून तक्रार करावी असे आवाहनही केसरकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)